मंगलवार, 24 अगस्त 2021

एकविसाव्या शतकालाही ‘भानामती’ पोखरतेय..

 







एकविसावे शतक विज्ञान-तंत्रज्ञानासोबत आधुनिक विचारधारा रुजवणारे, मानवी प्रगतीचे विश्व व्यापक करणारे असल्याचे ढोल आपण पिटतो. समाज हा अनिष्ट रूढी-प्रथा-परंपरा बाजूला सारून वैज्ञानिक दृष्टीकोण जोपासणारा, कार्यकारणभाव समजून घेणारा होत असल्याचे सुशिक्षितांच्या ओठावर सहज येते. आपण जागतिकीकरणाच्या मोहजाळात फसले जात असतांना गाव-गाड्यातूनच शहरी विकासाची प्रक्रिया होत असल्याचे का विसरतो ? स्वत:ला सुशिक्षित समजणारे ग्राम प्रबोधनाला किमान एक टक्का देखील सामाजिक दायित्व देवू शकत नसेल तर भानामतीचे भूत पिढ्यानपिढ्या मानगुटीवर बसून लचके तोडत राहील, यात नवल असे काही नाही.     

चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम जिवती तालुका हा कायम तसा दुर्लक्षितच. तालुक्यापासून १२ कि.मी अंतरावरील वणी खुर्द गावात शनिवार २१ आगष्टला माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. गावात अचानक दोन महिलांच्या अंगात देवी येते आणि काही लोकांनी जादूटोणा-भानामती केल्याची बतावणी करून गावातील ७ लोकांची स्पष्ट नावे घेते. नंतर गांव एकत्र येवून त्या सातही लोकांचे गावातील चौकात दोरखंडाने हात पाय बांधले जाते. गावात होणाऱ्या अघोरी प्रकाराला जबाबदार समजून जीवघेणी मारहाण केली जाते. हा प्रकार सुरू असतांना गावातील सभ्य लोक मूकदर्शक बनून बघत असतात, कुणीही या प्रकाराला भीतीने विरोध करण्याची हिम्मत करत नाही. विशेषत: इतकी मोठी व भयावह घटना चक्क दोन दिवसानंतर उजेडात येते. नेमकं काय चाललंय ?

राहायला एकदाचे घर नसेल तरी चालेल पण स्मार्ट फोन आता प्रत्येक कुटुंबात आला. माहितीची आदान-प्रदानता काही सेकंदात शेकडो लोकांपर्यंत पोहचते. मात्र या घटनेची माहिती पोलिस विभागाकडूनही गुप्त ठेवण्यात आली. पुरोगामी महाराष्ट्रात कुटुंबांना वाळीत टाकणं, गावाच्या बाहेर काढणं हे प्रकार नवे नाहीत. यात जीवतीतील वणी खुर्दच्या प्रकाराने यात अधिक भर घातली. हा प्रकार केवळ एका जाती-धर्मापुरता मर्यादित नाही तर एकविसाव्या शतकाला वाकुल्या दाखवत समस्त माणुसकीला काळिमा फासणारा आहे.

शांताबाई भगवान कांबळे(वय ५३), शिवराज कांबळे(वय ७४), साहेबराव एकनाथ हुके(वय ४८), धम्मशीला सुधाकर हुके(वय ३८), पंचफुला शिवराज हुके(वय ५५), प्रयागबाई हुके(वय ६४), एकनाथ हुके(वय ७०) ही भानामतीच्या आरोपातील निरपराध पिढीत लोक. सर्व याच गावातील रहिवासी. वर्षानुवर्षे गावात राहणाऱ्या माणसांची ओळख गावकऱ्यांना असते. मात्र कुणाच्यातरी अंगात देवी येणे आणि तिने सदर लोकांनी करणी केल्याचे सांगितल्यावर सर्व गावांचाच विश्वास बसणे हे सर्वात भयाण आहे. जर पिढीत सातही लोक अशा प्रकारचे भानामतीचे प्रयोग करत असल्याचे पुरावे असतील तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई झाली पाहिजे. मात्र सामूहिक गावाने केलेली अशी घृणास्पद शिक्षा कायद्याला अनुसरून नाही. या पिढीतावर गावकऱ्यांनी जो सामूहिक अन्याय केला त्याची भरपाई कुणीही करू शकणार नाही. शिवाय वयाने जेष्ठ असलेल्या मंडळींना इतक्या क्रूर पद्धतीने खांबाला दोरीने हात-पाय बांधून चौकात जबर मारहाण करणे ही आपली संस्कृती नाही. मानवी मनावर संपूर्ण गावाने केलेला हा आघात पचवून आता हे लोक गावात सन्मानाने राहू शकतील ? कितीही समुपदेशन केले तरीही मनाचे घाव भरून निघातील ? या ७ लोकांपैकी ५ जणांना गंभीर दुखापत झाली आहे. काहीची हाडे मोडली आहेत. हा हादरवणारा प्रकार पोलिसांनी वेळीच आवरला नसता तर याचे परिणाम किती तीव्र झाले असते, याची केवळ कल्पनाच केलेली बरी. महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील या गावाच्या घटनेने समाजमन हादरले असले तरीही हे सामाजिक अपयश आपणा सर्वांचे आहे, हे स्वीकारून प्रबोधनाचा लोकजागर करण्याची जवाबदारी देणारे आहे. 

समाजात भूतबाधा होणे, जादूटोणा करणे असे प्रकार ग्रामीण भागात नित्याचेच आहे. अभ्यासक्रमातही काळी जादू, पांढरी जादू शिकवली जाते. मात्र यावर प्रबोधनाचे पाठ शालेय स्तरावर गिरवण्यात शासनही नापास आहे. इग्नू विद्यापीठाने तर ज्योतिषशास्त्राला विद्याशाखा म्हणून मान्यता देवून कहर केला. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आपल्यापरीने या सर्व बाबीवर काम करून ढोंगी पितळ उघडे करत असले तरीही प्रबोधनाचा ठेका केवळ या चळवळीच्या लोकांनीच घेतला आहे का ? समाजातील घटक म्हणून सर्वसामान्य माणसाची कुठलीच भूमिका नाही ?  

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदा अंमलात आणावा यासाठी १६ वर्ष संघर्ष केला, मात्र त्यांच्या हत्येनंतरच सरकारला जाग येवून कायदा लागू करावा लागला, हे पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्भाग्य आहे. “महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अघोरी व दुष्कर्मी प्रथा अन काळा जादू अधिनियम २०१३”  या कायद्यातील कलमानुसार भूत उतरवण्याच्या बहाण्याने चमत्काराचा प्रयोग, गुप्तधन, करणी-भानामती या नावाने अमानुष, अनिष्ट, अघोरी कृत्य करणे, नरबळी देणे, एखादी व्यक्ती करणी करते, जादूटोणा करते, भूत लावते, अपशकुनी आहे, शैतान आहे असे जाहीर करणे, भूत-पिशाच्च यांना आवाहन करून घबराहट निर्माण करणे, स्वत:मधे अलौकिक शक्ती आहे अथवा आपण कोणाचे तरी अवतार आहोत असा दावा करणे अशा प्रकारवर बंदी आहे.  मात्र तरीही जिवती तालुक्यात घडलेला हा प्रकार महाराष्ट्रात ग्रामीण भागात छुप्या पद्धतीने धगधगत असल्याचा पुरावा आहे.

नरेंद्र दाभोळकर व माधव बागवे यांनी लिहिलेल्या काळी जादू अर्थात भानामती या पुस्तकात ते अधोरेखित करतात की ‘गेल्या २५ वर्षात हे प्रकार कमी झालेले आहेत; परंतु बंद झालेले नाहीत. १० मे २०११ रोजी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौव्हाण यांच्या कराड तालुक्यातील कराडपासून अवघ्या ११ किमीवर असलेल्या धोंडेवाडी या गावात अचानकपणे भानामतीचे प्रकार घडू लागले. टाकीतील पाणी तांबळे होणे, बंद कपाटातील वस्तु आपोआप बाहेर येणे, कपडे फाटणे व जळणे अशा स्वरूपाच्या या भयचकित करणाऱ्या गूढ घटना होत्या. ही भानामती आपला ५ वर्षाचा नातू करतो हे देवऋषीचे म्हणणे प्रमाण मानून भानामतीचे प्रकार थांबवण्यासाठी सख्ख्या आजीने गळा दाबून ५ वर्षाच्या नातवाचा बळी घेतला. त्याच्याच दुसऱ्या दिवशी ११ मे २०११ ला रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात मुंबईहून काही काळासाठी घरी आलेल्या तरुणाने लग्नानंतर चार वर्षे आपल्याला मुलबाळ नाही, याचे कारण आपल्या चुलत बहिणीने करणी केलेली आहे, हे भगताचे म्हणणे खरे मानून थंड डोक्याने बहिणीच्या डोक्यात काठी मारून तिचे आयुष्य संपवले. तर १३ मे २०११ ला नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात धाकट्या जावेने आपल्यावर करणी-भानामती केली या संशयाने थोरल्या जावेने धाकटी जाऊ व तिचे एक महिन्याचे मूल यांचे जीवन संपवण्यासाठी त्यांना विष पाजले. परंतु त्यापासून बोध एवढाच घ्यावयाचा की, एकविसाव्या शतकात विज्ञानाचा सूर्य माथ्यावर आला असतांनाही भानामतीची झापडे लावून माणसे आपले जीवन जगत आहेत.’

जिवती हा आदिवासीबहुल मागास तालुका आहे. या तालुक्याच्या विकासाच्या अनुशेषाबाबत सारेच गप्प आहेत. अजूनही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातदेखील बऱ्याच गावात जायला रस्ते नाहीत. दळण-वळणाच्या सुविधा, वीज, नेटवर्क नाहीत. या ग्रामीण भागातील लोकांचे अठरा विश्व दारिद्रयात परंपरागत जगणे अजूनही सुरू आहे. यांच्या जोरावर काम करणारे संधीसाधू मात्र गब्बर झालेत. शासनाच्या योजना कितपत प्रभावी ठरत असतील, हे अशा प्रकरणावरून लक्षात येते. 

हा घडलेला प्रकार अत्यंत संतापजनक आहे. गावाच्या इतिहासाला छेद देणारा आहे. खरेतर जादूटोणा कायद्याने अंगात देव येण्याचे सोंग घेवून निरपराध कुटुंबांना भानामती करत असल्याचा आरोप करणाऱ्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे.  असे प्रकार अंधश्रद्धेतून किंवा पूर्ववैमनस्यातून होत असल्याचे अंनिसने बऱ्याचदा उघड केले. तरीही समाजमन जागृत होण्याचे प्रमाण समाधानकारक नाही. प्रत्येक गावात यंत्रणा असते. हा प्रकार घडला तेव्हा गावातील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते, सुशिक्षित, जेष्ठ व प्रतिष्ठित नागरिक नेमके काय करत होते ? त्यांनी प्रकाराला आळा घालण्यासाठी पुढाकार का घेतला नाही ? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने अनुत्तरित राहतात. हे सामाजिक अंध:पतनाचे लक्षण आहे.   

भारत हा सुधारणावादी विचारांचा देश आहे. त्यातही महाराष्ट्राला प्रबोधनकारी विवेकशील व तर्कनिष्ठ संतांची परंपरा आहे. संत तुकाराम महाराजा पासून तर संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी विचारांनी गावे जागवली. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी भजन, कीर्तनातून प्रबोधनाचा रथ पुढे नेला. याच महाराष्ट्रात भानामतीच्या कारणाने असे प्रकार घडत असतील तर प्रबोधनाची चळवळ गावखेड्यात नव्याने व्यापक व  सशक्त उभी करण्याचे हे मोठे आव्हान आहे. केवळ अंधश्रद्धा निर्मूलन समिती व शासनच नव्हे तर सर्वसामान्य माणसांनी एकत्र येवून अश्या अंध-विचारांचे उच्चाटन करणाऱ्या परांपरांना छेद देण्याची गरज आहे.   





- अविनाश पोईनकर

   बिबी, जि.चंद्रपूर

   संपर्क – ७३८५८६६०५९

   avinash.poinkar@gmail.com


•••••••••

बुधवार, 18 अगस्त 2021

एक सांकव फळू दे






माझ्या हाताची ताकद

तुझ्या हाताला जुळू दे

दोन तिराच्या काठाला

एक सांकव फळू दे...


खाचखळग्याची वाट

दिली जन्माने आंदण

बरसातीच्या दिसात

दिसे तुडुंब पांदण...


नदी नाले बारमाही

पशु पक्ष्यांची खदान

थडीपल्ह्याड पोचून

कसे काढायचे धान.. ?


असे दुरच्या गावात

मला माझी प्रिय शाळा

दोन गावाच्या हिताला

दोन थेंब घाम गाळा...


श्रम संस्कृती विशाल

तसे मन आभाळाचे

याहो पेरमा-भुमीया

गाव गावाला जोळाचे...


बांबू अन् ताटव्यांचे

जणू लाकडांचे फुलं

दरसाल जन्म घेतो

दोन गावांमध्ये पूल...


- अविनाश पोईनकर

ओल्या डोळ्यात तिरड्या







तेंदूपाने तोडायाला, माय लेक गेली दूर

घनदाट जंगलात, पोटापाण्याचा रे सूर


नाही घराला आधार, भूक पेटली बेजार

ऐन हंगामाच्या वेळी, कुणा सांगावा आजार


माय वनवन फिरे, एका एका पानासाठी

पुळे बांधता बांधता, लेक असायची पाठी


लख्ख उन्हात तापली, धरणीची मृदू काया

दिस झाकोळण्याआधी, परतल्या सा-या बाया


शेकड्याच्या पुळक्याला, मिळे शेकडोचा दाम

वनपट्याच्या मातीला, कसण्याला येई घाम


माय विचारात होती, लेक धाळीन शाळेला

पाठमोरा वाघ होता, दिली झडप मानेला


माय रडलीही नाही, माय राबत राहीली

एक ठिणगी विझली, माय धापत पाहीली


अशा किती तेंदव्यात, बाया विझल्या कोरड्या

लेकी साठवत गेल्या, ओल्या डोळ्यात तिरड्या


- अविनाश पोईनकर

लेकी

 






तीन बहिणीच्या हाती

नांगराचे झुले सळे

हाकताहे विरांगणा

तुतारीने रेडे भोळे..


रोवणीच्या हंगामाला

पाणी बरसला नाही

हरसालाचे दुखणे

रांगताहे दारी काही..


रानवाटेच्या पल्ह्याड

माणसांच्या पुढे बाई

शेत शिवारात गाणे

धान पेरणीचे गाई..


आधुनिक तंत्रज्ञान

असो कुणा लखलाभ

पोट जगतील असे

दाणे भरतील नभ..


लेकी मोठ्या गुणवान

झोपडीत लावी दिवा

माती हिरवी नटते

हिच्या हाती रानमेवा.. 


- अविनाश पोईनकर

हेमलकसा, १९ जुलै २०२१

गावं कशी झालीत गायब नकाशावरुन ?







भुगोलाच्या तासाला

मास्तर घेवून यायचे वर्गात 

गोलाकार फिरणारं जग

सांगायचे जगाच्या नकाशावरचे रहस्य !


'पृथ्वी गोल आहे'

मास्तरांनीच शिकवलं तेव्हा.

आम्ही अंडाकृती फिरत्या जगाला

न्याहाळून पहायचो

उभ्या माणसाची आकृती

'इंडीया'ला शोधायचो.


उष्ण-दमट-थंड आवर्तनं

वेगवेगळे देश आणि अफाट समुद्र

सारं काही निळंशार..

एकोणतीस टक्के भुभागावर

मानवी वस्तीच्या प्रदेशावर, संस्कृतीवर

मास्तर बोलत रहायचे आतून

नकाशावर असलेल्या इंडीयाला पाहून

आमचाही उर यायचा दाटून...


पुढे हाती आला देशाचा नकाशा

प्रदेश आणि आपली आसपासची गावं

दिसू लागलीत ठळक.

जीपीएसने आपलं गाव आणि घर

अधोरेखित झालंय

मास्तरने शिकवलेल्या गोष्टीचं

समजून आलं वलय.


मास्तर,

काळाच्या पुढची भयावह आकृती

हळूहळू होत चाललीय पुसट

जाणवू लागला

वर्तमानाच्या भाषेचा

जंगलातच कोंडमारा




पहाडीवरुन अनवाणी 

उतलेल्या वस्तीचे भाग

कधीतरी येतात

आणि परततात अंधातरी


शेकडो गावं

अबुजमाडच्या टेकडीवरची

कशी झालीत गायब

जगाच्या नकाशावरुन ?


- अविनाश पोईनकर

लढाई








डांबरी रस्त्याने पोहोचता येते शहरापर्यंत

गावात जायला पायवाटा

कंबरभर निळ्याशार पाण्याचे नाले

चढ उतार

सभोवती घनदाट जंगल..


जंगलाच्या भरोवशावर

शहरे विकसित झाली

आणि मुलनिवासींच्या वाट्याला आलं

पिंढ्यानपिढ्याचं मागासलेपण


दुर्लक्षित राहीलेल्या जगाला

अतिदुर्गम म्हणून केलं शिक्कामोर्तब

आणि अतिरिक्त पगार घेवून

सेवेच्या गुंतागुंतीच्या कसे करतो बाता ?


कधीतरी गावात या

एकमेकांत मिसळा

वेदनेचा हंबरडा सहज ऐकू येईल

संस्कृतीच्या खोल डोहात

गौणउपजातील जीवनसत्वात

दुरवर

देवाजी, लालसू, कन्नाचा

समृद्ध आवाज ऐकू येईल...


निसर्गात दंग झालेले वारकरी

दु:खाच्या दारिद्र्यरेषेतील आदीम

जंगल स्वातंत्र्याची लढताहेत लढाई !


इथल्या श्रीमंतीची तुलना

होवू शकत नाही

कुठल्याही फोर्ब यादीतील अब्जोधिशांशी !


- अविनाश पोईनकर

तीन दिवसाची ओली बाळंतीण









तीन दिवसाची ओली बाळंतीण

चिमुकल्याला घेवून निघाली बांधावर

झाडाला चिंध्यांचा बांधला पाळणा

विस्कटलेलं शरीर तसंच सैरभैर

पोटात रिचवलेली घोटभर आंबील

स्तनातून दूध कसं पाझरवेल बाहेर..


बाळंतपणाच्या वेदनांनी जितकं सोललं शरीर

त्याहून दुप्पट रोजनिशी सलत राहते 

कुरुप झालेल्या पायात खंडीभर काटे

रस्ते हरवलेले पाय आपोआप फसतात रोवणीत

तेव्हा कुणीच ठेवत नाहीत तोंडावर बोट

जिंदगाणीच्या परिक्षेतून अशाच पासआऊट झालेल्या बाया


दरवेळी लेकराच्या रडण्याचा आवाज ऐकून

रोवणीच्या चिखलातच झिरपते थेंब

नजरअंदाज करुन ती ही घुसळते स्वरात सर

नाचगाण्यात साजरा होतो तीचा मुक्याटाचा चिखलोत्सव.


आशा, नर्स, अंगणवाडीबाईच्या छातीत भरली धडकी

डोक्यावर हात ठेवून करु लागल्या काळजीवाहू आटापिटा

चिमणीच्या पोटातच नाही दाणा पाणी

तर कसं ऐकवायचं चिऊंना खाऊंच्या गोष्टी


चिमुकल्याने मान टाकली खांद्यावर

तीन दिवसाची ओली बाळंतीण

चिमुकल्याला घेवून निघाली बांधावर


- अविनाश पोईनकर

झेंडामास्तर




  




आदिम वस्तीत

कधीतरी उगवेल सोनेरी पहाट

इथल्या मातीतून

हरित क्रांतीच्या हाकुमीची होईल गर्जना

परिवर्तनाची अ,आ,इ,ई

गिरवली जाईल को-या पाटीवर

या आशेने मी वाट पाहतोय

गोटूलात जोरजोरात ढोल पिटण्याची..


ओस पडलेल्या शाळेत

खुशाल नांदताहेत गुरं-ढोरं

आता नाही ओळखायला येत 

ज्ञानमंदिराची उघडी कवाडं

आपला धुळका काळाकुट्ट फळा 

तसाच आहे शाबूत

पांढ-या खडूची वाट पाहत...


मास्तर

दंडकारण्यात

मोजून दोनच दिवस

तुम्हाला पाहतोय झेंडा फडकवतांना

गोंगलू, बुकलू, मोड्डीला

माहीत नसणा-या कुठल्याशा सणाला

चाॅकलेटचा प्रसाद देताना...


- अविनाश पोईनकर

शुक्रवार, 6 अगस्त 2021

वनहक्क व्यवस्थापनाचा 'सोसोखेडा पॅटर्न' !


'मेळघाट म्हणजे कुपोषण' सहसा अशीच चर्चा असते. त्यापलिकडेही ब-याच सकारात्मक बाबी येथे आहेत. अफाट नैसर्गिक सौंदर्य सातपुडा पर्वतरांगानी या परिसराला बहाल केले. स्थानिक आदिवासी कोरकू समाजाचं पारंपारिकत्व अजूनही येथील ग्रामीण भागात जिवंत आहे. त्यातच वनहक्क कायद्याने मेळघाटाला बळ दिले. जल, जंगल, जमीनीने येथील आदिवासींना खरे स्वातंत्र बहाल केले. यातून काही गावे प्रगतीच्या मार्गावर रुढ झालीत.


सोसोखेडा हे त्यातीलच एक गाव. १०१ कुटुंबाची वस्ती. अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात जवळपास ६०० लोकसंख्येचं हे पुर्णत: आदिवासी गाव आहे. अनुसुचित जमाती व ईतर पारंपरिक वन निवासी कायदा २००६, नियम २००८ आणि सुधारित नियम २०१२ अंतर्गत २०१२ मध्ये या गावाला सामुहिक वनहक्क प्रदान करण्यात आला. वन खंड क्र.१२८८ मध्ये ४०५.३९ हेक्टर वनजमीनीची मालकी ग्रामसभेला मिळाली.

२०१२ मध्ये केंद्र शासनाने सामुहिक वनहक्क तर बहाल केला पण त्यानंतर यावर फारशी अंमलबजावणी झाली नाही. हे चित्र काही अपवाद वगळता देशभराचे आहे. २०२० पर्यंत सामुहिक वन हक्क काय व कशासाठी गावाला दिला ? हे देखील गावातील वन हक्क समिती सोडून इतर गावक-यांना माहिती नव्हती. गडचिरोलीत लेखामेंढा येथे सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा व मोहन हिराबाई हिरालाल यांच्या नेतृत्वात वनहक्क व्यवस्थापनाचं माॅडेल उभं झालं. व्यवस्थापनातून गावांना रोजगार तर उपलब्ध झालाच मात्र करोडो रुपयांची बांबू, तेंदू व जैवविविधतेतून उलाढाल झाली. त्यापुढे एक पाऊल टाकत चंद्रपूर जिल्ह्यातील पाचगाव गावाने व्यवस्थापनाची दमदार अंमलबजावणी विजय देठे या कार्यकर्त्याच्या मार्गदर्शनात करुन ग्रामसभा व गावाला सक्षम केले. खरेतर सामुहिक वनहक्काने आदिवासींच्या जगण्याला व अभिव्यक्तीला दिलासा देणारे हे दिपस्तंभासारखे उदाहरणे ठरली.

मेळघाटाचा अभ्यास दौरा म्हणून या परिसरात फेरफटका करतांना सोसोखेडा या गावाला भेट दिली. याआधी मुख्यमंत्री ग्रामविकास फेलो म्हणून गडचिरोलीत प्रयोगशील कामाची चमक दाखवणारा स्वामी डुरके हा तरुण समाज प्रगती सहयोग संस्थेअंतर्गत वनहक्क व्यवस्थापनावर काम करतोय. स्वामी हा मुळचा गडचिरोलीतील सिरोंचा तालुक्यातल्या. त्यामुळे आदिवासी आणि जंगल हे विषय त्याला नवे नाहीत. अतिशय विनम्र, शांत आणि अभ्यासू स्वभावाने तो या गावात रुळला. येथील लोकात विश्वासाची ज्योत पेटवली आणि वनहक्क व्यवस्थापनाचा 'सोसोखेडा पॅटर्न' यशस्वी केला.

डोंगर टाका मका, ढा टाका !
ढा टाका मका, आबुन टाका !
(जंगल आहे तर पाणी आहे. जंगल आणि पाणी आहे तर आपण आहोत.) हा आदिवासी कोरकू समाजाचा नारा सोसोखेड्यात यंदा बुलंद झाला. अख्खं गाव एकत्र आलं आणि ५००० वृक्षांची लागवड सामुहिक वनहक्काच्या जागेवर श्रमदानातून केली. रोजगार हमी कायद्याची अंमलबजावणी करुन येथेच गावक-यांना पहिल्यांदा काम मिळाले. कामासाठी स्थलांतरित झालेले लोक पुन्हा गावात परतले. गावक-यात प्रचंड विश्र्वास निर्माण झाला. जंगल संवर्धनातून श्वाश्वत विकासाचे उद्दिष्ट नजरेसमोर आले. उपविभागीय अधिकारी कार्यालयाने स्वामी डुरके या तरुणाचे प्रयत्न व गावक-यांचे सहकार्य लक्षात घेतले. अधिका-यांनी गावांना भेटी देवून वनविभागाला सत्कार्यास सुचना दिल्या. समाज प्रगती सहयोग संस्था, वन विभाग व सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समीती सोसोखेडा यांनी वन संवर्धनाचा आदर्श पुढे रेटला.

मेळघाटातील परिसरात शिक्षणाचे वातावरण अजूनही फारसे नाही. ग्रामीण भागात तर उच्चशिक्षित फार मोजक्या प्रमाणात दिसतात. वर्षभरापासून या गावात वनहक्क काय ? त्यापासून आपल्याला काय मिळेल ? याबाबत अभ्यासगटासारखी विधायक चर्चा गावक-यात झाली. या अगोदरच्या यशस्वी गावांच्या कहाण्या व चित्रफिती गावातील ग्रामभेने बघितल्या. यातून लोकांत जनजागृतीचा आशावाद तयार झाला. सामुहिक वनहक्क व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला. वनजमीनीचा संशोधन नकाशा काढण्यात आला. सिमांकन करण्यात आले. आराखड्यात रोजगार हमी योजनेच्या कामाला प्राधान्य देण्यात आले. गावक-यांना रोजगार उपलब्ध होईल, हा यामागचा शुद्ध हेतू. डोंगरभाग असल्याने समतल व विलग चरचे काम ७५ हेक्टरात केले. यातून ४५ दिवस गावक-यांच्या हाताला काम मिळाले. कामांचा पहिल्या दिवशी ११२ लोक मजूर म्हणून होते. बघता बघता चौथ्या दिवशी २२७ लोक कामावर आले. जे लोक कामासाठी बाहेरगावी गेले होते ते परत येवून गावातच रोजगार हमीच्या कामात गुंतले. यातून गावाचे रोजगारासाठीचे स्थलांतरण थांबले. कामांच्या माध्यमातून लोक जुडत गेले. जे काम आधी झाले नाही, असे काम होऊ लागल्याने गावक-यांचा वनहक्काबाबत विश्वास वाढू लागला.

वनहक्काच्या जंगल क्षेत्रात गौणवनोपज नसले तरी वृक्षारोपन करुन वनौपज मिळवू शकतो, हे अभ्यासातून ग्रामसभा व वनहक्क व्यवस्थापन समीतीच्या लक्षात आले. श्रमदानातून ५००० वृक्षारोपण करुन संवर्धन करण्याचे गावाने ठरवले. कुटुंब संख्येनूसार प्रत्येक कुटुंबाने ५० खड्डे खोदायचे व रोपांची लागवड करायची, असे नियोजन केले. विविध मिश्र प्रजातींची रोपटे वनविभागाने उपलब्ध करुन दिली. १६ जुलै हा महाश्रमदानाचा दिवस ठरवला. पहिल्याच दिवशी १७० लोक जमले. तीन दिवसात ५००० खड्डे प्रमाणानूसार खोदून पूर्ण केले. या गावाला तत्कालीन सहायक जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी मिताली सेठी (भा.प्र.से) व वैभव वाघमारे (भा.प्र.से) यांनी भेटी देवून वृक्षारोपण केले. छोट्याशा गावात मोठे अधिकारी आल्याने गावक-यांना उर्जा मिळाली. पावसाच्या वातावरणातच २०० पेक्षा जास्त गावक-यांनी वृक्षलागवड व सिड्स बाॅल टाकण्याचा कार्यक्रम हाती घेतला. गावातील महिलांनी घर बसल्या साधारणता २००० सीड्स बॉल बनवून वनजमीनीत टाकले. सामुहिक वनहक्क मिळालेल्या क्षेत्रात कु-हाडबंदी व चराईबंदीचा निर्णय ग्रामसभा व वनहक्क व्यवस्थापन समीतीने घेवून त्यांची अंमलबजावणी केली. ग्रामसभा व वनहक्क वनहक्क व्यवस्थापन समीतीचे नारायन मावस्कर, राधा बेटेकर, कृष्णा कळके, कुंजीलाल सावरकर, सोनाली सावरकर, मनाजी सावरकर, संतुलाल बेटेकर, बिसराम सावरकर, साबूलाल मवस्कर व ग्रामस्थांनी परिश्रमातून मेळघाटात सोसोखेड्याचा व्यवस्थापनाचा पॅटर्न हिरवा केला.

मेळघाटातील आदिवासी कोरकू समाजात प्रचंड सामर्थ्य आहे. ते ओळखून त्यांना त्यांच्या हक्क व अधिकाराची जाणिव करुन दिली तर स्वावलंबनाची क्रांती दूर नाही. स्वामी डुरके या तरुणाने या गावाला दाखवलेली दिशा व गावक-यांना परिश्रमाचा झालेला साक्षात्कार उद्याच्या उज्ज्वल सोसोखेड्याची नांदी आहे, एवढे निश्र्चित !


- अविनाश पोईनकर
संपर्क - ७३८५८६६०५९
avinash.poinkar@gmail.com

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
  

दंडकारण्यातील आदिवासी बांधवाच्या जीवनाचं खरंखुरं धगधगत वास्तव : दंडकारुण्य

- राजू गरमडे, चंद्रपूर कवीमिञ, मुक्तपञकार, सामाजिक युवा कार्यकर्ते, आदिवासी भागात जाऊन कार्य करणारे अविनाश पोईनकर एका कार्यक्रमामध्ये भेटले....