भूतलावर सर्वात बुद्धिमान समजला जाणारा मानव तंत्रज्ञानाच्या दिशेने सतत आगेकूच करत आहे. 'हम किसीसे कम नही' हे सिद्ध करण्यात माणसाने कुठेही कसर सोडली नाही. मानवी उत्क्रांतीच्या कालखंडापासून आजतागायत 'माणूस' म्हणून केलेली प्रगती जगाला दिशादर्शक ठरली. आधुनिक कालखंडात जगतांना पुढच्या शंभर वर्षाचे भाकीत आज सहज वर्तवणे मानवी बुद्ध्यांकाला कठीण नाही. सारं काही 'डिजीटल' होत असताना जगाला एकसंध जोडणाऱ्या संवादसेतूंना जन्म देऊन माणूस 'स्मार्ट' झाला आणि त्याचे 'व्हिजन' देखील 'स्मार्ट' झाले.
जंगलात झाडाच्या खांद्याचे घर्षण झाले किंवा दगडाला दगडांचे घर्षण केले की त्यातून 'अग्नी' तयार होतो, ही समज मानव सृष्टीला कलाटणी देणारी ठरली. माणूस प्रयोगशील झाला. काळानुसार बदलत राहिला. अत्यावश्यक साधनांना अशाच प्रयोगातून मूर्त रूप देत गेला. परिणामी याच माणसात 'शास्त्रज्ञाचा' जन्म झाला. हळूहळू जमिनीपासून अवकाशापर्यंत बदलचक्र सुरू झाले. या बदलचक्रातून आपण आजचे नवे विश्व अनुभवत आहोत.
इंटरनेटच्या माध्यमातून झालेली संगणक क्रांती आश्चर्यकारक ठरली. माणूस हा नवनिर्मितीचा केंद्रबिंदू ठरला. नवनिर्मितीच्या आविष्कारात हल्ली जग जोडणाऱ्या संवादसेतूत प्रत्येकाला एक चेहरा मिळाला तो लोकप्रिय 'फेसबुक'मुळे. फेसबुकवर नसणारा माणूस तसा विरळच. मार्क झुकरबर्ग यांनी निदान प्रत्येक माणसाला ५००० मित्र या माध्यमातून जोडण्याचे सहज साधन उपलब्ध करून दिले. शहरात माणूस माणसाला ओळखत नाही. एकाच अपार्टमेंटमध्ये राहून शेजार्यांचे दार शेजा-यांसाठी नेहमी बंद असते. समोर माणूस असला तरी एकमेकांशी फारसा संवाद होत नाही. या अवस्थेत माणसाच्या मनाची दारे सोशल मीडियावर उघडी झाली.
देशात ८० टक्के पेक्षा जास्त लोक 'स्मार्टफोन' वापरतात. एकाच कुटुंबातील सर्वच सदस्यांकडे देखील ब-याच ठिकाणी 'स्मार्टफोन' आहेत. पहिल्या वर्गापासून कॉन्व्हेंट, जिल्हा परिषद शाळेतसुद्धा संगणकाचे धडे विद्यार्थ्यांना मिळत असल्याने हा स्मार्टफोन लहान मुलांचा 'आवडीचा मित्र' झाला. आई वडील शिकवायच्या अगोदरच मुलाला 'स्मार्टफोन' समजतो. शाळेची शैक्षणिक माहिती व अभ्यासक्रम मुलांना स्मार्टफोनमध्ये वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध होत असल्याने पुस्तकांपेक्षा स्मार्टफोनचे आकर्षण त्यांना अधिक महत्त्वाचे वाटते. स्पर्धापरीक्षेची तयारी करणारी मुले यावरच बराच वेळ रोज 'जनरल अपडेट' होतात. बऱ्याच ठिकाणी नोकरी करणारे, व्यवसाय करणारे आपापल्या पद्धतीने कामे स्मार्टफोनवर घरबसल्या करतात.
कुठल्याही विषयाची माहिती आपल्याला हवी असेल तर लगेच आपण 'गुगल सर्च' करतो. आजची देशात महत्त्वाची घटना काय? जाणून घ्यायचे असेल तर 'ट्वीटर' खोलले की लगेच आपल्याला 'नोटिफिकेशन' मिळते. 'व्हाट्सअॅप'मुळे समाज जीवनाचा धागा प्रत्येक माणसाला गवसला. युट्युबवर प्रत्येक विषयावर जगभरातील व्हिडिओ सहज पाहता येतात. लींकेड, ई-मेल, इंस्टाग्राम, ब्लॉगर यामुळे प्रत्येक माणसाशी आपल्याला संपर्क साधता येतो. व्यक्तीची माहिती मिळवता येते. प्रत्येकाच्या वैयक्तिक, सार्वजनिक, व्यवहारिक जीवनात बदलत्या काळाने आमूलाग्र बदल घडवून आणला. विज्ञान-तंत्रज्ञानाचा हा महाचमत्कार वगैरे मी म्हणणार नाही पण मानवी संवेदनेच्या प्रगल्भतेचा हा अविष्कार आहे, असे नक्कीच म्हणेल.
अक्षय नावाचा माझा गावातील २० वर्षाचा एक तरुण मित्र आहे. तो मोटार लाईनमध्ये आला, पट्ट्याने कार घेतली. ओला, उबेर या कंपन्यांमध्ये पुण्या-मुंबईतील शहरात त्याची कार धावते. मात्र त्याचे वाहन कुठे आहे? व्यवसाय किती झाला? हे त्याला घर बसल्या मोबाईलवरच कळते. असे कित्येक व्यवसाय आज ऑनलाईन झालेत. आर्थिक विश्वसनीयता वाढली.
आपण रोजच्या जीवनमानाकडे एक नजर टाकली की बरेच काही बदलले वाटते. आपल्या आजी-आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी बदलल्या. शेती-माती, घर, चलनातील नोटा देखील बदलल्या. या बदलाला आपण स्वीकारले आहे, अर्थात आपण डिजिटल झालो आहे. आपले गाव देखील 'स्मार्ट' होण्याची तयारी करीत आहे. चौकाचौकात नजर ठेवण्यासाठी डिजिटल कॅमेरे आपल्याला सहज दिसतात. पाचव्या, सातव्या वर्गात शिकणारा पोरगा उन्हाळ्याच्या सुट्टीत 'कॅम्प्युटर क्लासला' जातो असे सांगतो तेव्हा ग्लोबल जगाचा अशिक्षित आई-वडिलांना देखील अंदाज येतो.
आजच्या स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या जीवनात प्रत्येक माणूस स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपड करीत आहे. समाजकारण, राजकारण, कला, क्रीडा आदी क्षेत्रात टिकायचे असेल तर इतरांपेक्षा आधी स्वतःशी स्पर्धा, संघर्ष करून सोशल मीडियातून समाजाभिमुख व्हावे लागेल. माहितीचा प्रसार व प्रचाराची साधने उपलब्ध असल्याने जग जिंकण्याची ताकद कित्येकात संचारली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे बराक ओबामा ही नावे जेवढ्या सन्मानाने ज्या त्या देशात घेतली जातात त्यापेक्षा जास्त जगभरात चर्चेत असतात. डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून असाध्य ते साध्य | करिता सायास || ही संत तुकोबांची ४०० वर्षापूर्वीची भविष्यवाणी माणसाने खरी ठरवली आहे.
डिजिटल क्रांती ही कुठल्याही एका प्रवाहापुरती मर्यादित राहिलेली नाही. प्रशासकीय कामाला गतीशील वळण देणारी ठरली. शेतीत अमुलाग्र प्रयोग करून उत्पन्नवाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरली. अवकाशातील वातावरणाचा अंदाज, भूगर्भातील हालचाली टिपण्यास सक्षम पर्याय ठरली. ग्राहम बेल, थॉमस एडिसन यांनी हजारदा प्रयोग करून 'व्हिजन' गाठणारी ठरली. 'प्रयत्नांती परमेश्वर' शिकविणारी, मानवी मनाचा विचार सर्वदूर पसरविणारी टेक्नॉलॉजी शेवटी मानवी मनाच्या मेंदूतून बाहेर पडल्याने सकारात्मकतेचा विचार पेरणारी ठरली.
एकंदरीत सर्व समाज माध्यमाने जगाला, समाजाला जवळ आणले. 'व्हिजन' ठेवून काम करण्यास भाग पाडले. वेळ वाचला. मनुष्यबळ कमी झाले. कामे हलकी झाली. यातून मानवी गरजांना आवश्यक साधनांचा विकास झाला असला तरी त्याचे दुष्परिणाम नाकारता येत नाही. या सर्व बाबींबर बारकाईने लक्ष ठेवून याचे 'सोशल ऑडिट' प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. हल्लीच्या जमान्यात प्रत्येकाने आपले 'व्हिजन' नक्कीच ठरवावे. मात्र व्हिजन अधिक 'स्मार्ट' होण्यासाठी या जग जोडणाऱ्या 'डिजिटल संवादसेतू' शिवाय पर्याय नाही एवढे नक्की !
-अविनाश पोईनकर, चंद्रपूर
मोबा. ७३८५८६६०५९
ई-मेल- avinash.poinkar@gmail.com
======================
