![]() |
बोलत राहणा-यांच्या मुसक्या आवळणारा हा भयावह काळ. या काळात पिढी घडवणाऱ्या शिक्षकांवरही दडपणाची छाया तशी गडद झाली आहे. वाचणे-लिहीणे-बोलणे यावरही बंधनांची टांगती तलवार सज्ज आहे. आनंदवन-वरोरा या सेवेच्या पंढरीतील आदर्श शिक्षक कवी पंडित लोंढे यांनी आपली अभिव्यक्ती कवितेच्या माध्यमातून उजागर केली. 'वळण' हा त्यांचा नुकताच प्रकाशित झालेला कवितासंग्रह. त्यांच्या ज्ञानमार्गाच्या परिमळाची पेरणी समाजात करण्यासाठी दाखल झाला आहे.
नागपूरच्या साई ज्योती प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या संग्रहात एकुण ६० कवितांचा समावेश आहे. कवीचा हा पहिलाच संग्रह असल्याने नवेपणाच्या ब-याच जागा यात आढळतात. रचनेतील गुणदोषापेक्षा अनुभवाच्या पातळीवर जगण्याची नोंद कवी शब्दबद्ध करतो; अर्थात बोलत-लिहत राहण्याचे आव्हान स्विकारतो, हे जास्त महत्त्वाचे आहे. पूर्व विदर्भात नव्या पिढीत झाडीबोली चळवळ सशक्त करण्याचे काम जे खंदे समर्थक करत आहेत, त्यात कवी पंडित लोंढे यांची तळमळीची भूमिका आहे.
मालवणी, व-हाडी, कोकणी, झाडी
मराठीसह बोलीभाषा अनेक
रमती साऱ्या भगिनी येथे
सदा वर्तती साथीने नेक
'महाराष्ट्रभूमी' या कवितेत विविध बोलींना कवी 'भगिनी' म्हणून संबोधतात. सर्वत्र नैराश्येच्या वातावरणात लढण्याचा वसा प्रत्येकांनी घेण्याचा आशादायी विचार मांडतात. समतेच्या शोधात स्त्री-पुरुष एकात्मतेची भावना अधोरेखित करतात. वास्तवाच्या विस्तवातून कवी डोळसपणे समाजाकडे पाहतो. त्यांना मानवतावाद रुजवणारे महात्मा गांधी, डॉ.आंबेडकर, सावित्री-ज्योतिबा, बिरसा मुंडा यांच्या विचारांची प्रतिक्रांती हवी असल्याची नोंद करतो. कवीच्या वैचारिकतेचे हे बलस्थान असल्याने कवीने अभिव्यक्त होतांना प्रतिमा, प्रतिकांपेक्षा लोकभावनेचा तळ अधिक गाठल्याची प्रचिती येते.
सत्तेच्या सारीपाटात
केली चिरफाड नीतीची
साऱ्या लबाडांच्या खेळात
हद्द झाली त्यांच्या मतीची
राजकारणाचे वेळोवेळी बदलणारे संदर्भ, जनतेला विकासाचे लॉलीपॉप दाखवत खेळले जाणारे डाव कवीने अचूक मांडले आहे. या पार्श्वभूमीवर बुद्धिवादी थोरांच्या व्यवस्थेचे वारकरी व्हावे, ही चेतना कवी कवीतेतून देतो. समाजाचा आरसा असणा-या पुस्तकांची महती गाता गाताच कवी कष्टकरी, शेतकऱ्यांच्या श्रमाला वंदन करतो. 'जग जिंकूया, शांततेला जपून, शब्द मापून' अशा हायकू तून तत्वज्ञानासह शब्दसामर्थ्याचे दर्शन घडवतो.
कवी पंडित लोंढे हे आदर्श शिक्षक आहे. 'कोवळ्या कळ्यामाजी, लपले ज्ञानेश्वर, रवींद्र शिवाजी' ही ग्रामगीतेतील शिकवण ते विसरत नाहीत. विद्यार्थ्यांवर सुसंस्काराचे प्रयोग करून आदर्शवाद रुजवण्यासाठी ते प्रयोगशील धोरणांची अंमलबजावणी करतात. खरे तर त्यांची कविता ही मुलांना सजग करण्याचं टाॅनिक आहे. आशय आणि अभिव्यक्तीच्या अंगानेही 'गुरुजी' या कवितेत त्यांनी विद्यार्थ्यांचं भावविश्व त्यांच्या अंतरंगात शिरून चितारले आहे.
आमच्या पाठीवरी थाप द्या, हातामध्ये पेन द्या
गुरुजी मला आता तरी, अक्षर अक्षर गिरवू द्या
अनुकरण आम्हास तुमचे सर्वठायी करू द्या
असे व्यक्तिमत्व कायम आदर्शचि असू द्या
कवीने माणूसपण या मूल्यांच्या अवतीभवतीचा अवकाश घेऊन त्या अनुषंगाने अनेक विषयांचा परामर्श कवितांतून घेतला आहे. पहिला व घाईगर्दीचा प्रयत्न असूनही कवितेशी त्यांनी जिव्हाळ्याचे नाते जोडले आहे, असे कवीचे गुरु प्रसिद्ध साहित्यिक आचार्य ना.गो.थुटे यांनी या संग्रहाला प्रस्तावनासम आशीर्वाद नमूद केले. सतत वाचन व चिंतन करीत आपल्या कवितेची अभिव्यक्ती करण्यात सातत्य राखले तर झाडीबोली चळवळीकरिता एक उत्तम कवी या कवितासंग्रहाने दिला, असे म्हणावे लागेल. कवी पंडित लोंढे यांनी हे सातत्य कायम ठेवून आमचा विश्वास पूर्ण करावा अशी पाठराखण झाडीबोलीचे पितामह हरिश्चंद्र बोरकर यांनी या संग्रहाच्या निमित्ताने केली, ही विश्वासार्हता पुढील आश्वस्त प्रवासाला कवीसाठी निश्र्चितच उर्जादायी राहील.
ग्रामीण मातीशी नाळ जुळून, गाव खेड्यातील चिखलात पाय गाडून परिस्थितीला 'वळण' देणारा हा कवी आणि त्यांची कविता आहे. समकालीन जाणिवांचा वेध घेत हिरव्या रानातून त्यांची कविता मनतरंगाचे थवे होते. संस्काराची बीजे पेरणा-या शब्दांना पुढील काळाच्या वळणावर गच्च हिरवी पालवी फुटेल, ही भावगर्भ आशा आहे.
- अविनाश पोईनकर, चंद्रपूर
avinash.poinkar@gmail.com
संपर्क - ७३८५८६६०५९
••••
कवितासंग्रह - वळण
कवी - पंडीत लोंढे
साई ज्योती पब्लीकेशन, नागपूर
मुल्य - १३० रु.
••••
