रविवार, 17 अगस्त 2025

दंडकारुण्य : समकालीन जगण्याच्या अस्वस्थ जंगलनोंदी














• आशिष वरघणे, वर्धा


मराठी कवितेच्या समकालीन प्रवाहात विदर्भातून येणारे कवी म्हणजे अविनाश पोईनकर. त्यांचा २०१७ साली 'उजेड मागणारी आसवे' हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. अभावग्रस्ततेत सोसलेल्या, भोगलेल्या यातनांची अभिव्यक्ती या त्यांच्या संग्रहातून उजागर झाली. आणि अलिकडे मार्च २०२५ मध्ये लोकवाङ्मय गृह, मुंबई कडून आलेला दुसरा कवितासंग्रह म्हणजे 'दंडकारुण्य’. या कवितासंग्रहाने मराठी साहित्यात एक अस्वस्थ करणारी पण अत्यंत आवश्यक अशी जागा निर्माण केली आहे. ही कविता केवळ अभिव्यक्ती नाही, तर ती एक साक्षीदार आहे, निसर्गाच्या विध्वंसाची, आदिवासींच्या शोषणाची, आणि भांडवलशाहीच्या भस्मासुरत्वाची. ‘दंडकारुण्य’ ही केवळ एक भौगोलिक संज्ञा नाही, तर ती पोईनकर यांच्या कवितांमध्ये एक प्रतिरोधाचे प्रतीक आहे. आदिवासींच्या दुःखांचा, जल-जंगल-जमीन खचवणाऱ्या प्रगतीच्या कल्पनांचा, आणि विस्थापितांच्या वेदनांचा जळता दस्तऐवज आहे. 


मध्य भारतातील अभूजमाड-दंडकारण्य भागात कामानिमित्ताने केलेली त्यांची मुक्त भटकंती, जवळून अनुभवलेले जंगलविश्व, हक्क आणि अधिकाराची होणारी गळचेपी, कॉर्पोरेट युगाचे आदिवासींच्या अधिवासावर होत असलेले अतिक्रमण, तेथील नैसर्गिक श्रीमंती आणि कार्यकर्ता म्हणून बसणारे चटके अनुभवून या भागातील उलथापालथीच्या नोंदी म्हणून त्यांनी या जंगलनोंदी टिपल्या. दंडकारुण्य या कवितासंग्रहात एकूण ७६ कविता असून त्या शीर्षक नसलेल्या आहेत. शिवाय शीर्षक नसलेल्या कविता हेच या कवितासंग्रहाचे पहिले आणि महत्वाचे वैशिष्ट्ये आहेत. कारण आदिवासी, विस्थापित, भटके व वंचित यांच्या जगण्याला समकाळात शीर्षक नाही. त्यांच्या जगण्याला अर्थ नाही. त्यांच्या हक्काची मूल्ये असूनही त्यांची फरफट अस्वस्थ करणारी आहे. हेच शीर्षक न ठेवण्याचे कारण असावे. याचे उत्तम उदाहरण कवी पुढील कवितेत मांडतो.


"आम्ही जंगलाचे राजे 

आताशा झालोय बैल 

इथल्या व्यवस्थेने 

काळोख पेरलाय शेकडो मैल"


कवी अविनाश पोईनकर यांच्या कवितेचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे आदिवासी माणसाचा आत्मसन्मान. त्यांच्या कविता कोणत्याही सहानुभूतीच्या भावनेवर आधारलेल्या नाहीत. त्या ‘दया’ किंवा ‘दुराव्याच्या’ वरचढ आहेत. त्या एक भोगलेल्या अनुभवाचे अस्सल दस्तऐवजीकरण आहेत. म्हणूनच कवी स्वाभिमानाने म्हणतो,


"पेट्रोल,

डिझेल 

गाडीच पिते 

माणूस प्यायला असता 

तर सुरू झालं असतं 

जागतिक महायुद्ध!

बरं झालं 

आमचं जंगल 

आहे शाबूत 

आणि 

पाणी आहे शुद्ध"


‘दंडकारुण्य’ हा संग्रह थेट भूमिका घेणारा संग्रह आहे. यात प्रकल्प, कॉर्पोरेट्स, सरकार, मीडिया अशा सगळ्या संस्थांना त्यांनी वेळोवेळी प्रश्न केलेला आहे. विकासाच्या नावाखाली होणारी जंगलतोड, जलसंपत्तीवर नियंत्रण, जमीन हस्तांतरण आणि विस्थापन यावर त्यांनी धारदार भाषेत सवाल केला आहे.


"खदाणीत

अख्खा डोंगर गेला आमचा 

पूर्वज, दैवतांच्या जागा, झाडं, कंदमुळं 

अहो पोट गेलंय आमचं....

रानोमाळ भटकणारे 

खदाणीच्या खड्यात 

करतील उदरनिर्वाह?

आदिम जगण्याच्या नोंदी 

जर टिपत्या आल्या तुम्हाला 

तर सांगावं,

आमचं वैभव भकास करून 

खदाणीने 

जगात विकास कुठे झाला ?


विकास ही संकल्पना म्हणून सद्यस्थितीत शंका घेण्यासारखे आहे. याची वास्तव उकल त्यांनी कवितेतून केलेली आहे. त्यामुळे अविनाश पोईनकर हे केवळ कवी नाहीत, आदिवासींमध्ये काम करणारे केवळ कार्यकर्ते नाहीत तर विचारवंतही वाटतात. विदर्भातील आदिम माडिया, कोलाम, आदिवासी संस्कृती विषयीची कळवळ पोईनकर यांनी अगदी प्रभावीपणे मांडली. त्यामुळे कविता अधिक प्रामाणिक वाटते. 


"आम्ही पुजतो 

दैवत म्हणून आमच्या पूर्वजांना.

आमच्या श्रद्धा-अंधश्रद्धांवर 

सारेच बोलत सुटले विचारवंतांसारखे.

कधी तरी आमच्यातून निसटून चाललेल्या 

माय आणि मातीवर बोला 

आम्हाला कळतंय 

तुम्ही भाग पाडणारच आहात 

तुमच्या निर्जीव दगडांना पूजायला"


या ओळींमधून स्थानिक माणसाची एक आंतरिक समज, भावनिक नातं, आणि निसर्गाशी असलेली जोड व्यक्त केली. जी शहरी माणसाच्या कल्पनेच्या बाहेरची आहे. या संग्रहातील कविता प्रतिकाराचे सूक्ष्म प्रकटन करढा-या आहेत. दंडकारुण्य मधील अनेक कविता उघडपणे व्यवस्थेविरोधात बोलत नाहीत, पण त्यांचा स्वभावच विद्रोही आहे. त्या व्यवस्थेला प्रश्न विचारतात, विकासावर शंका घेतात.


"विकास 

कुणाच्या भरोशावर कोणाचा ?

सारेच वितळवून नेतील 

असा पुतळा मेणाचा 

कोपा गावळेचा रस्ता 

कागदावर हसतो आहे 

बिनविषारी धामण 

इथे नागासारखी डसते आहे"


आदिवासी स्त्रीयांची व्यथा आणि स्त्रीप्रधान संस्कृती अतिशय प्रभावीपणे त्यांनी कवितेतून मांडली. यातल्या आदिवासी स्त्रीयांची व्यथा कवीने प्रखर शब्दात अधोरेखीत करून त्या परस्परांना सावधही करायला विसरत नाही. याचेही भान या असुरक्षित स्त्रियांना आहे. म्हणून त्या मोजक्याच स्त्रियांना सावध करत नाहीत तर त्यांचा स्वर प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे. पितृसत्ताकइंगळ्या विरुद्ध आहे. आणि या सर्व महिला प्रत्येक क्षेत्रातल्या स्त्रियांच्या प्रभावी प्रतिमा देखील म्हटले तर वावगे होणार नाही.


"दुर्गी 

बिजूला 

गुत्तो

जन्नी 

गोई 

आता असायला हवं आपण सावध 

समृद्ध काळाला 

चावा घेताहेत आतल्याआत इंगळ्या 

जंगलभर पसरताहेत विष 

मातृसत्तेच्या हातात

हवीय गोफन, तिरकामटा 

आणि 

कोणी भिडलाच तर

विजयाचा चीत्कार फोडायला हाकुमी"


अनिता, शांती, सायबी, बिनागुंडा, मंगले, संगिता जोगा मडावी, १३ एप्रिल २०२२, मालू कोपा बोगामी, तीन दिसांची ओली बाळंतीण, नदीमाय आदी कविता नुसत्या स्त्रीचित्रणात्मक नसून आजच्या स्त्रियांचे जळजळीत वास्तव आहे.



गाव, शेतीमाती आणि निसर्ग या घटकाकडे देखील कवीने पाठ केलेली दिसत नाही. जल, जमीन, जंगल या बरोबर कवीला गाव, शेतीमाती आणि निसर्गही तेवढाच महत्वाचा वाटतो. पण कंत्राट, पोलिस दादा, भांडवलदार यांनी या महत्वाच्या घटकाचीच होळी पेटवायला सुरुवात केलीय. त्यात सर्वसामान्य माणूस भयग्रस्त झाला. आणि त्यांना वाटू लागले, 


"किती तरी पसरलेत रंग

आमच्या नकाशाबाहेर 

तरीही 

आमच्या वाट्याला येतो

एकच रंग 

कित्येक सजीवांच्या मानगुटीतून

वाहणारा

'लालभडक...'


घनदाटपणाला लागलेलं पोलीस-नक्षल संघर्षाचं बिरूद हे स्थानिक आदिवासींसाठी जीवघेणे ठरणारे आहेत. जीव मुठीत कैद करून घनदाट जंगलातला माणूस आपली फिर्याद कोणाकडे करू शकत नाही. कारण

"आरोपी कोण अन् अडवतो कोण

वर्षानुवर्षे व्यवस्था का सोडत नाहीत मौन?"

हा सवाल त्यांच्या ओठावर नेहमी येत असतो. पण शेवटी

"ते येतात

जाळपोळ करतात 

निघून जातात 

इथला 

आदिवासी 

जळतच राहतो 

निरंतर..." 


आणि मग काय ? रस्त्यावर कितीही न्यायासाठी मांडले बस्तान तरी आंदोलनाला संशयीत आग लागते. अखेर त्याचा ठरलेला परिणाम उलट होतो. तो परिणाम कवी रोखठोकपणे कवितेतून मांडतो, 


"यहा बोलना मना हैं"

तरीही 

बोलत राहिलोच क्रांतीची भाषा 

तर 

तुम्ही कधीही होऊ शकता देशद्रोही" 


या परिणामांच्या चक्रव्यूहात पिचल्या जाणा-या आदिवासींच्या बाजूने कोण आहेत? तर कुणीच नाही. हे केवळ गडचिरोली किंवा दंडकारण्यापुरते मर्यादित नाही तर जागतिक पातळीवर आदिवासींची हीच उपेक्षा आहे. कवितासंग्रहाच्या पहिल्याच कवितेत सुरुवातीला कवी पहिल्यांदाच मोठा प्रश्न करून वाचकाला अंतर्मुख करून सोडतो. 


"काही वर्षांनी बदललाच अभ्यासक्रम 

तर

एफ फॉर फाईट 

आणि 

आर फॉर राईट

हे येईल का आमच्या अभ्यासक्रमात?"


दंडकारुण्य या संग्रहाचे महत्त्व इतकेच नाही की त्याने आदिवासी समाजाचे दु:ख सांगितले, तर त्याहून अधिक महत्त्वाचे हे आहे की या दु:खाला त्याने काव्यात्मक भाषेत विचाराचे आणि प्रतिकाराचे सामर्थ्य दिले. ही केवळ जंगलातील लोकांची कविता नाही; ही शहरात राहणाऱ्या प्रत्येक संवेदनशील माणसाच्या अंतर्मनात उमटणाऱ्या प्रश्नांची कविता आहे. अविनाश पोईनकर यांच्या कवितेला केवळ साहित्य म्हणून न पाहता, ती एक सामाजिक आणि राजकीय कृती आहे, हे लक्षात घेणं आवश्यक आहे.




‘दंडकारुण्य’: अविनाश पोईनकर

लोकवाङ्मय गृह, मुंबई, मार्च-२०२५

मुखपृष्ठ : सरदार जाधव 

किंमत २०० रु. संपर्क : ८४५४०४९०३६


••••


1 टिप्पणी:

दंडकारण्यातील आदिवासी बांधवाच्या जीवनाचं खरंखुरं धगधगत वास्तव : दंडकारुण्य

- राजू गरमडे, चंद्रपूर कवीमिञ, मुक्तपञकार, सामाजिक युवा कार्यकर्ते, आदिवासी भागात जाऊन कार्य करणारे अविनाश पोईनकर एका कार्यक्रमामध्ये भेटले....