आव्हानांना इच्छाशक्तीने दिले उत्तर..
___________________________________________
मला लहानपणापासूनच सामाजिक चळवळीचा वारसा कुटूंबात मिळाला. चंद्रपूर येथे महिला सक्षमीकरणासाठी मी धडपडत होते. यातच मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात ग्रामपरिवर्तक म्हणून निवड झाली. सक्षम व स्वयंपुर्ण गाव निर्मीतीच्या उद्देशातून मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 1000 गावांचे परिवर्तन आदर्श गावात व्हावे या संकल्पनेने हे अभियान सुरु केले. मी ही या अभियानात काम करित असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. मी चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालूक्यापासून 3 कि.मी. अंतरावर असलेल्या गट ग्राम पंचायत काटवन येथे मागील 9 महीण्यापासून ग्रामपरिवर्तक म्हणून काम करित आहे. गाव म्हटलं कि ब-याच समस्या. गावातल्या सभेत एकही महिलांचा सहभाग दिसायचा नाही. ग्राम पंचायत मध्ये महिला फिरकायच्या देखील नाही. त्यातल्या त्यात मी तरुणी. गावात सकारात्मक बदल घडवायचा. मी खंबीर होते. आव्हानांना इच्छाशक्तीनेच उत्तर दिले आणि सुरु झाली ग्राम विकासाची नवी वाटचाल !
काटवन या गट ग्रामपंचायत गावाची लोकसंख्या 794. काटवन, करवन, करवन टोला व चिचोली या चार महसुली गावाचा समावेश या ग्रामपंचायत अंतर्गत येतो. बफर झोन मध्ये गाव येत असल्याने सभोवताली जंगल व वन्यप्राण्यांची रेलचेल गावकरी व मी ही अनुभवते. गावातल्या लोकात गाव विकासासाठी आत्मीयता निर्माण करायची असेल तर गावातच रहावे लागेल हे समजून आले. मी थेट गावात जावून राहू लागली. लोकांच्या अडचणी समजून घेवू लागली. चार ही गावात रोज नियमीत जावून त्यांच्या वैयक्तिक व सार्वजनिक गरजांचा अभ्यास करुन त्या नोंदी स्वत:कडे ठेवत असे.
ग्रामसभा म्हणजे काय ? हे ब-याच लोकांना अजून माहीत नव्हते. लोकांअभावी ग्रामसभा ही वारंवार तहकुब होत असायच्या. असाच एक प्रसंग. ग्रामसभेची वेळ झाली होती, तेवढ्यात शारदा महिला मंडळाची शारदा विसर्जन मिरवणूक ग्रामपंचायत जवळून जात होती. मला विचार आला कि ग्रामसभा तहकुब होण्यापेक्षा या महिलांना आपण ग्रामसभेत आणून ग्रामविकासाचे नियोजन करायचे. मी थेट मिरवणूकीत जावून त्या महिलांना ग्रामविकासासाठी प्रेरीत करुन ग्रामसभेचे महत्व पटवून दिले. मग ती मिरवणूक काही वेळासाठी थांबून थेट ग्रामसभेत आली. मी तयार केलेला ग्रामविकास आराखडा व त्यात घेतलेली कामे यांची माहीती दिली. आराखडा महिलांच्या उपस्थित ग्रामसभेत मंजूर झाला आणि यासोबतच ग्रामसभा सक्षमीकरणाला येथूनच गती मिळाली. आता प्रत्येक ग्रामसभेला महिला येतात. विकासासंबंधी विचारणा करतात.
मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून मिळालेली निधी चार ही गावात समान देवून कामाचे नियोजन केले. यामुळे लोकांना पहिल्यांदाच दिलासा मिळाला. एक महिला तर चक्क तुम्ही काहीच करु शकत नाही म्हणून मी राहत असलेल्या खोलीवर येवून भांडून गेल्या. मी प्रचंड अस्वस्थ झाले. गावातल्या लोकांना उदरनिर्वाहाचे साधन नव्हते, हे ही त्याचे एक कारण होते. मी महिला बचत गटांची बैठक घवून माहीती जाणून घेतली. पशुधन विभागाच्या अभियानातून 30 महिलांना कुक्कूटपालनासाठी कोंबड्या व साहित्य मिळवून दिले. आता ती महिला सुद्धा समाधान व्यक्त करतांना मी पाहते आहे.
गावात शिक्षणाचे प्रमाण फारच कमी. गावात दळणवळणाची साधनेही नाही. आदिवासीबहूल दुर्लक्षीत व आर्थीकदृष्ट्या खालावलेला परीसर असल्याने येथे साधे वर्तमानपत्रही येत नाही. मी ठरवलं की आपण शिक्षणाविषयी चांगलं वातावरण तयार करायचं. गावातल्या महिलांना एकत्र करुन रात्री एक तास शिकवायचे ठरवले. त्यासाठी रात्रशाळा दिवाबत्तीच्या उजेडात सुरु केली. मी रोज 8 ते 9 या वेळात रात्री येवून वर्ग भरवून महिलांना साक्षरतेचे धडे देवू लागली. गावातील अंगणवाडी सेविकेला या कामात नंतर पुढाकार घेण्यासाठी प्रेरीत केले. 'संडे स्कुल' ची संकल्पना राबवली. या सर्व बाबीचा परिणाम म्हणजे गावातील मुलांना स्पर्धा परिक्षेचे वेध लागले. आता अभ्यासिका व ग्रंथालयाचे काम गावात सुरु केले.
गावातल्या लोकांना गावाविषयी प्रेम व आत्मीयता निर्माण करणे हे महत्वाचे आव्हान आपल्या कर्तुत्वावरच अवलंबून आहे, हे लक्ष्यात आले. यात स्वत: मा. जिल्हाधिकारी व संपुर्ण प्रशासन पाठीशी असल्याने गावात विकास प्रक्रियेला चालना मिळत आहे. गावात महिलांसाठी 'कापडी पिशवी लघुउद्योग' सुरु केला आहे. महिलांना योग्य प्रशिक्षण दिले आहे. याचा परिणाम असा कि गावातील 30 महिलांना रोजगार मिळाला असून स्वावलंबनाकडे त्यांची वाटचाल सुरु आहे. गाव क्रिडा क्षेत्रात पुढे यावा यासाठी क्रिडांगणाचे काम प्रगतीपथावर आहे. दोन अंगणवाडी केंद्रांना जागा उपलब्ध करुन देवून बांधकाम पुर्ण होत आहे. शाळा व अंगणवाडीच्या भिंती बोलक्या करण्यात आल्या असून रंगरंगोटी ही केली आहे. गावातील 2 अंगणवाडी केंद्र ISO नामांकनासाठी पात्र ठरल्या आहेत. युवक रोजगाराच्या संदर्भात कौशल्य विकासाचे कार्यक्रम सुरु आहेत. नागरीकांच्या आरोग्यासाठी नियमीत आरोग्य तपासणी शिबीर गावात केली जाते. प्रशस्त व्यायामशाळा गावातल्या युवकांसाठी तयार करण्यात आली आहे. विशेषता गावात एकोपा व सलोख्याचे वातावरण तयार व्हावे यासाठी गावातील सर्व घरांना बाहेरून पिवळा रंग देण्यात येत असून या सर्व बाबतीत करावा लागणारा संघर्ष हा खडतर असला तरी प्रचंड इच्छाशक्तीपुढे हे सर्व थीटे आहे एवढं खरं !
====================
शब्दांकन : अविनाश पोईनकर
====================