रविवार, 22 जून 2025

दंडकारुण्य : जंगलनोंदीच्या वेदनेचा हुंकार









 - डॉ प्रभाकर शेळके,

 जालना 











कवीस्नेही सन्मित्र, मुक्त पत्रकार, आदिवासी-ग्रामीण विकास क्षेत्रात सामाजिक सृजनशील युवा कार्यकर्ते अविनाश पोईनकर यांची दंडाकारूण्य कविता वाचून या समकालीन वास्तवात आजही आदिवासींच्या जगण्याचं हे दंडकारण्य प्रचंड भयावह आहे. इथल्या श्रेयवादाचे भोगवाद्यांच्या मतांचे खंडण मंडण करीत ही कविता संयत खिन्नता पेरत येते. आदिवासींच्या आजच्या विकासाचे कागदीये भेंडोळे आपल्या तोंडावर फेकते. या गाभाडलेल्या व्यवस्थेला प्रश्नाकिंत जाब विचारणारी ही कविता आहे. तोंडावर एक पोटात मेख, जबानीला नेक अशी ही कविता निर्लेप नितळ व्यक्त होते. 


आदिवासी कवीश्रेष्ठ वाहरू सोनवणेभाऊ पाठराखणीत लिहितो, "अविनाश पोईनकर यांच्या कविता मानवी चेतना जागवणाऱ्या व आदिवासींच्या सुख समृद्धीचा ठेवा जपणाऱ्या आहेत. प्रस्थापित व्यवस्थेवर प्रहार करत त्यांची कविता अनेक जखमा घेऊन जगताहेत. या कवितेच्या पानोपानी जखमांचा चित्कार ऐकू येतो.आदिवासी जीवन किती भयावह आहे, याचं चित्र त्यांच्या कवितेतून स्पष्ट होतं. अशा जखमा घेऊन जगणारा हा आदिवासी या भारत देशाचा नागरिक आहे. प्रत्येक नागरिकाला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाने आपले जीवन जगण्याचा संविधानिक अधिकार आहे." ही अतिशय सखोल चिंतन दर्शवणारी गोष्ट आहे. आदिवासींच्या सर्वहारा वेदनेचा हुंकार आता या दंडकारूण्याच्या निमित्ताने बाहेर येतो आहे.


युगानुयुगांच्या आदिम जगण्याला अजून ही या प्रवाहात सामील होऊ दिले नाही. कसे जगावे कसे जगू नये हा प्रश्न आदिवासींचा नाहीच, ती जल-जंगल-जमीन यातचं आदिम होऊन राहावी. आदिवासींचे शोषण करणारी जमात ही जन्माला आलेली आहे. या भोगवादी घाणेरड्या प्रवृत्तीला ही कविता अतिशय ठणकावून कल्लोळीत करते. तर वंचित आदिवासींच्या जखमळलेल्या जगण्याचे प्रतिबिंब, जगण्या-मरणाचा आवाज कायमच दाबल्या गेलेला आहे. साहित्य या अंगाने थोडेच बारूद उठले. कंपुशाहीच्या बुजगावण्यात, कुणी दखल घेतलीच नाही. पण ही कविता अभुजमाड, दंडकारण्याची सम्यक विचारांची बांधिलकी ठेवून या मुक्त व्यक्त भटकंतीत या आदिवासींच्या जगण्याचा हक्क, त्या हक्काची गळचेपी, या दंडकारण्यातला दंडक राक्षस, आजचा काॅपर्रेट जगाचा भयकारी राक्षस आदिवासींचे दमन करतो आहे. जल-जंगल-जमीन यासाठीचे झगडे, आंदोलनाचे दिखाऊ पगडे, मग यात खोटे-नाटे गुन्हे दाखल करायचे आणि स्वार्थ साधून घेयाचा, बळाचा वापर करून खिरापत वाटावी अशी धेडगुजरी खैरात, आदिवासींचे विस्थापन ही खरी दुःखरी सल या कवितेने सखेद मांडली आहे. ती अशी;

"आदिवासी 

आम्ही साधन झालोय

सरकार आणि संस्थांसाठी

आम्ही संशोधन विषय 

विद्यापीठ आणि प्राध्यापकांसाठी

आम्ही प्रयोगभूमी 

शासकीय योजनांसाठी

आम्ही मागास बिचारे

शहरातल्या भांडवलदारांसाठी

आम्ही अडगळ 

कंपन्या उद्योगपतींसाठी

आम्ही जंगलाचे राजे

आताशा झालोय बैल

इथल्या व्यवस्थेने 

काळोख पेरलाय शेकडो मैल" (पृ.१२)


हा आदिवासींच्या दुःखाचा आत्महुंकार आहे. अविनाश पोईनकर यांनी आपल्या सृजनशील आत्मानुभूतीनी हे जगणं अनुभवलं. या कवितेचा मर्मग्राही अनुबंध म्हणजे आत्मिक समाजभान देणारी ही कविता. स्वातंत्र्यापुर्वी अनादी अनंत यातना भोगल्या. जंगलाने जगणे शिकविले. भाषेत शिव्या नाहीत ओव्या आहेत. संस्कृतीची नाळ तुटू देत नाही. याच संस्कृतीचा या व्यवस्थेने भांडवल केले. सारं काही निसर्गाला मागितले. याचं पिठ माग्यानेच भिक मागीतली आमच्या संस्कृतीची.


"आम्ही निसर्गाशिवाय

कधीच मागीतलं नाही काही कुणाकडे

मुठभर दानत दाखवून

आम्हाला कोण करू पाहतोय विभक्त?(पृ.१३)


या कवितेचा आगाज हा अतिशय मौलिक अधिष्ठान प्राप्त करून देणारा, लक्षवेधी ठरणारा आहे. आजच्या ग्लोबल युद्धात सर्वहारा सामान्य आदिवासींच्या जगण्याला मुखर करताना, टु-व्हीलर, फोर व्हीलर, बंगल्यावर बंगला, गावं खेड्यात स्मिटाळले रस्ते, त्यांच्या डोंगर वस्तीला अजून ही साधी रानवाट नाही. साऱ्याच सुखाच्या मखमली वर्दळी. तरीही आदिवासींच्या जमिनींवर अतिक्रमणीय चटका मारणारी ही भांडवलशाही अर्थव्यवस्था यामुळे त्यांना अजूनही सुखाचा घास नाही. कुणी त्यांची कदर करत नाहीत. बकऱ्या, कोंबड्या, लाहूरी तितरं, घोरपडी, ससे, डुक्कर, मोर त्यांच्या अंगणात आहे. दारा-बांधावर गोरगा, ताडीची झाडं आहेत. ही त्यांच्या श्रीमंतीची गोष्ट आहे. ज्या मातीत ते जन्मले त्या मातीशी इमान राखून ते जगतात. मातीशी बेईमानी नाही. पण आज त्यांच्या शेती-मातीवर डोळा ठेवून त्यांच्या वाटाचं बंद करत आहेत. हे वास्तव ही कविता सांगून जाते. दिवसा ढवळ्या त्यांच्या 

माय-बहिणीवर अत्याचार करणारे मोकाट वळूगत सुटून येत आहेत. त्यांच्या मुक्त जगण्याची दमकोंडी उजागर करणारी ही कविता संयत मनोभूमिकेतून येते.


"जंगलाच्या भरोशावर 

शहरे विकसित झाली

अन् मुलनिवासींच्या वाट्याला आलं 

पिढ्यानपिढ्याचं मागासलेपण"


या कवितेत माणसात मिसळा, वेदनेचा हंबरडा, संस्कृतीचा खोल डोह, निसर्गात दंग झालेले हे वारकरी, दुःखाच्या दारिद्र्याचं आदिम जंगल, जंगल स्वांतत्र्याची लढाई.. म्हणून कवी म्हणतो,


"इथल्या श्रीमंतीची तुलना

होऊ शकतं नाही

कुठल्याही फोर्ब्स यादीतील अब्जाधीशांशी!"

(पृ १६)


ही कविता इतकी प्रखरतेने बोलते, आपण या माणुसकीचे देणे लागतो. आपण ही माणसं जपली पाहिजे. ते अज्ञानी आडानी शि‌क्षणापासून कोसो मैल दूर. त्यात या दंडकारण्याला नक्षलवादींनी काबिज केले आहे. अबुजमाड दंडकारण्याचा भाग असल्याने माओवाद्यांचा तो गडकोट आहे. सर्वहारा आदिवासी जमात फुकट मारल्या जाते आहे. निष्पांपाचा बळी जातांना ही कविता मनाला बोचणारी, टोचणारी सल म्हणजे ही जंगलाच्या रक्तबंबाळ आदिमांचा टाहोच आहे. रामायणापासून आजतागायत जटायूची जशी अवस्था झाली होती तशीच अवस्था आज आदिवासींची आहे. भारताचा दक्षिण भूभाग, सीमावर्ती भागातील घनदाट जंगल म्हणजे दंडकारण्य. उच्च प्रतीचे खनिजे व नैसर्गिक साधनसंपत्ती हा धनाड्याचा उद्योजकीय ठेवा. विश्व भारताचे अमेझाॅन जंगल म्हणजे दंडकारण्य, ही उत्पत्तीची श्रीमंत शृंखला असल्याने या आदिवासींच्या छळवादांचा कुणी विचार करणार आहेत का? फक्त संशोधक, अभ्यासक म्हणूनच मिरवणार आहात?


या रानटी अदिमांना आम्ही सारं शिकवलं. खायला, हागायला, मुतायला, नागड्या अंगावर खपल्या नेसल्या. आता ह्यांना कपडे घालायला शिकवले. असे काही जणू प्रदर्शनच भरवून भरवून आदिवासींचं भांडवल करणारी व्यवस्थाही आहे. या साऱ्या राष्टानात आमचे पारंपरिक प्रवाह मुळासकट वाहून गेले, ही खंत कवीने व्यक्त केली आहे.

विकासाच्या नावाखाली इथं बेमालूम बेईमानी चालू आहे.


"विकास कुणाच्या भरोशावर कुणाचा ? 

सारेच वितळून नेतील असा पुतळा मेनाचा

कोपा गावळेचा रस्ता

कागदावर हसतो आहे

बिनविषारी धामण 

इथे नागासारखी डसते आहे " (पृ.४८) 


दगडाने नाळ ठेचून जन्म देऊन कामाला लागलेली माय माऊली जन्मभर मरण यातना ठेचते आहे. आम्हाला तुमची पुरणपोळी नको, या नक्षल्यांच्या गोळी पासून वाचवा. बुकलू, अनिता, रमेश, शांती यांच्या व्यथा-वेदनेचा मलम होऊन जागर उजागर केला आहे. सायबी, सांगतो होऊन गेलेल्या कथा पण व्यथा संपल्या नाहीत.. कुणी इव्हेंट मॅनेजर येतो राजधानीतून, करपलेल्या अगतिक पोटाचा सौदा, विकास, उध्दाराच्या घोषणा अन् ठळक फोटो त्यांचे. यावर कुणीच बोलत नाही. असा हा लोकशाहीचा चौथा स्तंभ चोथा झालेला. हे आदिवासीचे जीवनदर्शन नाही तर हा भंयकर व्यथा, वेदनांचा टाहो आहे. कवी अविनाश पोईनकर प्रचंड निर्लेप नितळ अभिव्यक्तीने मनोगत व्यक्त करतात, 'मी ही कविता स्वानंद सुखासाठी लिहिली नाही. माझ्या स्वतःच्या मतलबापुरती ती मर्यादित राहू नये. भावगर्भ वास्तव सोडून वृत्त-छंदाच्या खिलवाडात बंदिस्त होऊ नये. गाथा ते ग्रामगीता संतांनी जो मानवतावाद पेरला ते जर आपल्या कवितेतून तसूभरही उगवतं नसेल तर आपण काय सामाजिक चिंतन करतो? प्रत्येक कवी आणि कवितेची 

उत्तरदायित्वाची भूमिका असते. हे जगणे, भोगणे व अनुभवणे हे समाजभान ठेवून म्हणून कवी, लेखकांने कुणाच्याच गुलामीत व भयग्रस्तेत असता कामा नये' (पृ. ७) ही ठाम भूमिका घेऊन एका नैतिक जबाबदारीने ही कविता दंडकारण्यातलं आजचं वास्तव मांडते. आपल्या समाजमनावर हा काळोखी विळखा भंयकर होणार, याचं

जणू भाकित ही कविता निडरपणे करते आहे. जसे,


"धाक बंदुकीचा | दंडकारण्यात |

कोणत्या युद्धात | कोण आहे |

कधीही कुणाला | बोलू नये काही |

मुकी लोकशाही | चिरडते |

आदिमांचे जग | समजेना कुणा |

अन्यायाने माना | चिरडल्या | (पृ.५४)


असा सखेद प्रश्न विचारत ही कविता संयत भंयकर इशारा देऊन जाते. ही कविता ठळक घटनेच्या नोंदी देते. अनामिक आदिवासींना बेछुटपणे मारल्या जाते. बेदखल होऊन जातात हे रानाची पाखरं.. "दंडकारूण्यमधील कविता एका अलक्षित आणि दुर्लक्षित समाजघटकांच्या जीवनस्थरांचा उद्गार आहे. रोजच्या जगण्यात येणाऱ्या असंख्य अडचणी आणि त्याचा शासन आणि नक्षलवाद यांच्याशी दुतर्फा करावा लागणार जीवघेणा संघर्ष या कवितेमधून उजागर झालेला आहे." हा अभिप्राय कवीच्या मनाची तळमळ व्यक्त करतो. लोकवाड्मयगृहाने जाणीवेने नोंद घेतली. सरदार जाधव यांचे मुखपृष्ठ अतिशय चिंतन आशय देऊन जाणारे. ही कविता म्हणजे बेदखल झालेल्या आक्रोशाचे आक्रंदन आहे. कवी अविनाश पोईनकर यांना मनस्वी शुभेच्छा.


•••


∆ दंडकारूण्य : कवी अविनाश पोईनकर 

∆ प्रकाशक : लोकवाड्मय गृह, मुंबई 

∆ प्रथमावृती : मार्च २०२५

∆ मुखपृष्ट : सरदार जाधव 

∆ किंमत : २०० रूपये 

∆ पुस्तक परिचय : डॉ प्रभाकर शेळके, जालना 

∆ मोबाईल : 9975137337


•••


दै. आधुनिक केसरी, २२ जून २०२५

मंगलवार, 3 जून 2025

सुरजागडचे दंडकारुण्य

- इंद्रजीत भालेराव

•••



अविनाश पोईनकर या पस्तिशीतल्या तरुणाची सुरजागड आणि दंडकारूण्य ही दोन पुस्तकं नुकतीच हातात पडली. ही दोनही पुस्तकं आदिवासीविषयक आहेत. एकात विकासाच्या नावाखाली होणारं आदिवासींचं विस्थापन या विषयावरील विश्लेषणात्मक लेख आहेत, तर एकात आदिवासींच्या जगण्यातलं कारुण्य टिपणाऱ्या कविता आहेत. दोन्हीचा विषय एकच, लेखक एकच पण, एक पुस्तक तर्काच्या अंगानं पुढं जाणारं तर दुसरं पुस्तक भावनेच्या अंगान पुढं जाणारं. एकच लेखक या दोन्ही भूमिका इतक्या नेटकेपणानं साकार करू शकतो, याचं हे अलीकडच्या काळातलं एक उत्तम उदाहरण आहे. याआधी वाहारू सोनवणे यांनी आदिवासी जीवनावर समर्थ कविता लिहिली, पण विश्लेषणात्मक लेखन त्यांनी केलं नाही. ते स्वतः कार्यकर्ते होतेच. आमचा मित्र भुजंग मेश्राम याने उत्तम काव्य लिहिले पण प्रत्यक्ष कार्यकर्त्याची भूमिका पार पाडली नाही आणि वैचारिक लेखनही फारसं केलेलं नाही. पण अविनाश पोईनकर हे या दोन्ही बाबतीत सरस आहेत. परवा या दोन्ही पुस्तकावर टिपण लिहिताना एका आदिवासी कवयित्रीनं, आदिवासी नसलेला पण आदिवासींमध्ये आपला म्हणून लोकप्रिय झालेला हा तरुण आहे, असा पोईनकरांचा उल्लेख केला होता.


मी इथं प्रामुख्यानं दंडकारूण्य या पोईनकरांच्या कवितेच्या पुस्तकाविषयी लिहिणार आहे. दंडकारण्य या पौराणिक प्रदेशाला दंडकारूण्य अशा शब्दात परिवर्तित करून कवीने आपल्या विचारांची दिशा शीर्षकातच निश्चित केलेली आहे. या कवितासंग्रहाची सुरुवात ही फारशा प्रभावी कवितांनी झालेली नाही. त्यामुळे कवितासंग्रह वाचायला सुरुवात करताना सुरुवातीलाच वाचकाचा गैरसमज होऊ शकतो. पण हळूहळू पुढच्या कविता वाचकाची पकड घेतात आणि आपण झपाट्याने पुढे पुढे वाचत जातो. कविता अतिशय छोट्या आहेत. कवीने मनोगतात सांगितल्याप्रमाणे प्रतिमा, प्रतीकांच्या नादी न लागता केवळ भावनेच्या अंगानं कवीनं या कवितांची मांडणी केलेली आहे. अर्थातच सामाजिक विचार तिथं अद्याहृत आहेच. त्यातली भावना कवीला जास्त महत्त्वाची वाटते. त्यादृष्टीनं कवीनं आदिवासींच्या जगण्यातले असे काही छोटे छोटे परिणामकारक प्रसंग निवडून, त्यांची चार-पाच ओळींमध्ये मांडणी करून, या कवितांची रचना केलेली आहे. 


सुरुवातीच्या काही कवितांनंतर पुढं प्रामुख्यानं आदिवासींची व्यक्तीचित्रं छोट्या छोट्या कवितांतून उभी केलेली आहेत. त्यात आदिवासी नेता आहे, आदिवासी कार्यकर्ता आहे, सामान्य आदिवासी माणूस आहे, आदिवासी विद्यार्थी आहेत, आदिवासी शिक्षक आहेत, सोबतच विनोबा भावे आणि अरुंधती रॉय यासारखी आदिवासींचा विचार करणारी जंगलाबाहेरची माणसंही आहेत. या सगळ्या व्यक्तीचित्रणात्मक कवितातून खूप चांगल्या प्रकारे आदिवासी जीवन उभं राहतं. भुजंग मेश्राम यांच्या उलगुलान या पहिल्या संग्रहात अशीच छोटी छोटी व्यक्तीचित्रं आलेली होती. त्यातून आदिवासींचं जग जिवंतपणे उभं करण्यात आलेलं होतं. पुढं अभिजात कविता लिहिण्याच्या प्रयत्नात भुजंगची कविता समजायला कठीण होत गेली आणि सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरची झाली. पोईनकर मात्र आपली कविता साधी, सोपी ठेवतात. त्यामुळेच त्यातला अनुभवाचा जिवंतपणा तुमच्या काळजाला स्पर्शून जातो.


याआधी लोकवाङ्मयने अनिल साबळे यांचा टाहोरा हा आदिवासींचे जीवनचित्रण करणारा कवितासंग्रह प्रकाशित केला होता. त्यातही आदिवासी जीवनाविषयी सखोल मांडणी करण्यात आलेली होती. त्या कविताही मला खूप आवडलेल्या होत्या. पण अनिल साबळे यांचे विश्व प्रामुख्यानं आदिवासी शिक्षणाशी संबंधित असल्यामुळे त्यात ते विषय जास्त आलेले होते. पण अविनाश पोईनकर हे प्रामुख्यानं आदिवासींमध्ये काम करणारे कार्यकर्ते असल्यामुळे त्यांनी आदिवासींचं सर्वांगीण जीवनदर्शन या कवितेत घडवलेलं आहे. आणि त्यात ते यशस्वी झालेले आहेत. 


अविनाश पोईनकर यांना स्वतःतल्या कवीपेक्षा स्वतःला कार्यकर्ता जास्त महत्त्वाचा वाटतो. पण खरंतर त्यांच्यातला कार्यकर्ता जेवढा तळमळीचा आणि प्रामाणिक आहे, तितकाच त्यांच्यातला कवी प्रतिभावंत आहे, हे त्यांनी विसरू नये. नाहीतर मराठी कवितेवर अन्याय होईल. कारण पुढं पोईनकर कवितेकडं दुर्लक्षही करतील. ते त्यांनी करू नये म्हणजे मराठी कवितेचे नुकसान होणार नाही. पोईनकर यांच्या कवितेत सखोल जीवनदर्शनाचा गाभा आहे, विद्रोह आहे आणि नव्या मांडणीची अपेक्षाही आहे. खालील काही प्रतिनिधिक कवितांमधून पोईनकरांच्या कवितेची प्रकृती वाचकांच्या लक्षात येईल. आणि पोईनकरांच्या कवितेचे महत्त्वही वाचक समजून घेतील. म्हणून त्यांच्या ह्या काही कविता,


१.


आदिवासी 

आम्ही साधन झालोय 

सरकार आणि संस्थांसाठी.

आम्ही संशोधन विषय 

विद्यापीठ आणि प्राध्यापकांसाठी.

आम्ही प्रयोगभूमी 

शासकीय योजनांसाठी.

आम्ही मागास, बिचारे 

शहरातल्या भांडवलदारांसाठी.

आम्ही अडगळ 

कंपन्या-उद्योगपतींसाठी 

आम्ही जंगलचे राजे 

आकाशा झालोय बैल 

इथल्या व्यवस्थेने 

काळोख पेरलाय शेकडो मैल


२.


आम्ही पूजतो 

नद्या, नाले, डोंगरांना. 

आम्ही पूजतो 

पाने-फुले-फळे-झाडांना.

आम्ही पूजतो 

आम्हास जगवणाऱ्या ऋतुचक्रांना.

आम्ही पुजतो 

निर्मिकाच्या सजीव सृष्टीला.

आम्ही पुजतो 

दैवत म्हणून आमच्या पूर्वजांना.

आमच्या श्रद्धा-अंधश्रद्धांवर 

सारेच बोलत सुटले विचारवंतांसारखे.

कधीतरी आमच्यातून निसटून चाललेल्या 

माय आणि मातीवर बोला 

आम्हाला कळतंय 

तुम्ही भाग पाडणारच आहात 

तुमच्या निर्जीव दगडांना पुजायला


३.


अबूझमाड 

उतरत आलाय खाली 

खांद्यावर कावड घेऊन 

आदिम श्रावणबाळ 

बनवून आणलेत 

रेखीव टिकाऊ झाडू 

गाडगंभर 

ताडी... बोरगा... 

लाल मुंग्यांची चटणी 

दूरच्या डोंगरातलं 

जैविक धन 

मिळेल त्याला 

कवडीमोल भावात 

आणि 

चवीसाठी घेतलं केवळ मीठ. 

कुणास ठाऊक 

कोणत्या व्यवस्थेची 

दरवेळी लागत असावी दीठ ?


४.


बुकलू , 

तुझ्या जन्माची गोष्ट 

तू नाही विसरू शकत.

तेव्हाही तुझी नाळ 

दगडाने ठेचली होतीस 

आता 

तुझा जन्मच ठेचला जातोय


५.


अनिता, 

काय डेंजर निघालीस तू 

रातच्या दोन वाजता सायकल काढलीस 

घेऊन निघालीस दोन मैल इस्पितळात 

किर्र जंगलातल्या गर्भात वेदना 

चिरत निघालीस मर्दानी 

तिचं बाळ रडलं 

आणि 

गुत्तो वाचली 

मी मनातच तुझी 'आशा' पुजली.


६.


विनोबा, 

तुझ्या नावाची आश्रमशाळा 

तग धरून उभे आहे दंडकारण्यात.

कोणत्याच हौसे-गवसे साहेबांचा फेरफटका 

होत नाही कधी चुकूनही

मास्तर तितके शांत आणि संयमी झालेत आता. 

डाळ-भातात लेकरं खुश 

शाळेच्या भिंतीआत 

दाटलाय गच्च अंधार 

जणू कोठडीतच कोंबलीय मुले 

दप्तरातील पुस्तकातून 

उमलून यावीत रानमाळ फुले


७.


रस्ता 

चकाकतो आहे 

डांबराने 

केल्या मोकळ्या पायवाटा 

चढ-उताराच्या खेळात 

घसरला रोलर खाईत 

इथे ब्रेक नसतो कुणालाही 

नोंद करा रे वहीत


८.


हे गड, या पहाडी 

सारेच कसे निसटून जाताहेत 

हातातून 

आणि 

तू 

गावातून शिकून सवरलेला 

चिडीचूप बसला आहेस 

कुठल्याशा शहरी फ्लॅटच्या कोपऱ्यात.


९.


दंडकारण्यातील 

सागाने 

ऐटीत नटले 

लंडनचे महाल 

अयोध्येत साकारले दिव्य रामलल्ला मंदिर 

आणि कवाडांना सुटलाय सुगंध 

याच मातीतील लाकूडफाट्याचा. 

संसद भवनात 

प्रवेश करताना नमन व्हावंच लागतं 

आमच्या संपदेतून साकारलेल्या दरवाजांपुढे.

आमच्या दंडकारण्यातील 

कारुण्याची 

तुम्ही कशी ठरवू शकता किंमत ?


वरील कवितांतून आदिवासींचं करूण वास्तव आणि त्यांच्या काळजात दाटलेला विद्रोह आपल्या सहज लक्षात येतो. पोईनकरांच्या कवितेची काही रचनावैशिष्ट्येही आपल्या लक्षात येतात. पोईंकर प्रतिमा, प्रतीक, रूपक आणि यमक यांच्या फारसे नादी लागत नाहीत. पण कवितेच्या शेवटच्या चार ओळींमध्ये एकाआड एका ओळीला ते यमक साधताना दिसतात. अर्थातच ते मुक्तछंदातलं यमक आहे. अविनाश पोईनकरांनी काही अष्टाक्षरी आणि षडाक्षरी रचनाही केलेल्या आहेत. पण त्या तितक्याशा प्रभावी वाटत नाहीत.


सरदार जाधवच्या इथल्या मुखपृष्ठावर सरदारनेच याआधी केलेल्या हनुमान व्हरगुळे यांच्या कवितासंग्रहाच्या मुखपृष्ठाची सावली असली तरी रंगछटा पूर्णपणे बदलल्यामुळे या संग्रहाला हे मुखपृष्ठ अत्यंत अनुरूप वाटते. हिरव्या जंगलाच्या काळजातला लाव्हा सरदारने चित्रात नेमका पकडल्यामुळे अविनाश पोईनकर यांची कविताच चित्ररूप घेऊन मुखपृष्ठावर आलेली आहे, असे वाटते. लोकवाङ्मयची निर्मिती नेहमीसारखीच उत्तम आहे. त्यामुळे संग्रह हातात घेऊन कुरवाळावासा वाटतो. पुस्तकातील कवितांची संख्या ७६ असून पुस्तकाची पृष्ठसंख्या ९२ आहे, तर पुस्तकाची किंमत २०० रुपये आहे.


•••

दंडकारण्यातील आदिवासी बांधवाच्या जीवनाचं खरंखुरं धगधगत वास्तव : दंडकारुण्य

- राजू गरमडे, चंद्रपूर कवीमिञ, मुक्तपञकार, सामाजिक युवा कार्यकर्ते, आदिवासी भागात जाऊन कार्य करणारे अविनाश पोईनकर एका कार्यक्रमामध्ये भेटले....