मंगलवार, 3 जून 2025

सुरजागडचे दंडकारुण्य

- इंद्रजीत भालेराव

•••



अविनाश पोईनकर या पस्तिशीतल्या तरुणाची सुरजागड आणि दंडकारूण्य ही दोन पुस्तकं नुकतीच हातात पडली. ही दोनही पुस्तकं आदिवासीविषयक आहेत. एकात विकासाच्या नावाखाली होणारं आदिवासींचं विस्थापन या विषयावरील विश्लेषणात्मक लेख आहेत, तर एकात आदिवासींच्या जगण्यातलं कारुण्य टिपणाऱ्या कविता आहेत. दोन्हीचा विषय एकच, लेखक एकच पण, एक पुस्तक तर्काच्या अंगानं पुढं जाणारं तर दुसरं पुस्तक भावनेच्या अंगान पुढं जाणारं. एकच लेखक या दोन्ही भूमिका इतक्या नेटकेपणानं साकार करू शकतो, याचं हे अलीकडच्या काळातलं एक उत्तम उदाहरण आहे. याआधी वाहारू सोनवणे यांनी आदिवासी जीवनावर समर्थ कविता लिहिली, पण विश्लेषणात्मक लेखन त्यांनी केलं नाही. ते स्वतः कार्यकर्ते होतेच. आमचा मित्र भुजंग मेश्राम याने उत्तम काव्य लिहिले पण प्रत्यक्ष कार्यकर्त्याची भूमिका पार पाडली नाही आणि वैचारिक लेखनही फारसं केलेलं नाही. पण अविनाश पोईनकर हे या दोन्ही बाबतीत सरस आहेत. परवा या दोन्ही पुस्तकावर टिपण लिहिताना एका आदिवासी कवयित्रीनं, आदिवासी नसलेला पण आदिवासींमध्ये आपला म्हणून लोकप्रिय झालेला हा तरुण आहे, असा पोईनकरांचा उल्लेख केला होता.


मी इथं प्रामुख्यानं दंडकारूण्य या पोईनकरांच्या कवितेच्या पुस्तकाविषयी लिहिणार आहे. दंडकारण्य या पौराणिक प्रदेशाला दंडकारूण्य अशा शब्दात परिवर्तित करून कवीने आपल्या विचारांची दिशा शीर्षकातच निश्चित केलेली आहे. या कवितासंग्रहाची सुरुवात ही फारशा प्रभावी कवितांनी झालेली नाही. त्यामुळे कवितासंग्रह वाचायला सुरुवात करताना सुरुवातीलाच वाचकाचा गैरसमज होऊ शकतो. पण हळूहळू पुढच्या कविता वाचकाची पकड घेतात आणि आपण झपाट्याने पुढे पुढे वाचत जातो. कविता अतिशय छोट्या आहेत. कवीने मनोगतात सांगितल्याप्रमाणे प्रतिमा, प्रतीकांच्या नादी न लागता केवळ भावनेच्या अंगानं कवीनं या कवितांची मांडणी केलेली आहे. अर्थातच सामाजिक विचार तिथं अद्याहृत आहेच. त्यातली भावना कवीला जास्त महत्त्वाची वाटते. त्यादृष्टीनं कवीनं आदिवासींच्या जगण्यातले असे काही छोटे छोटे परिणामकारक प्रसंग निवडून, त्यांची चार-पाच ओळींमध्ये मांडणी करून, या कवितांची रचना केलेली आहे. 


सुरुवातीच्या काही कवितांनंतर पुढं प्रामुख्यानं आदिवासींची व्यक्तीचित्रं छोट्या छोट्या कवितांतून उभी केलेली आहेत. त्यात आदिवासी नेता आहे, आदिवासी कार्यकर्ता आहे, सामान्य आदिवासी माणूस आहे, आदिवासी विद्यार्थी आहेत, आदिवासी शिक्षक आहेत, सोबतच विनोबा भावे आणि अरुंधती रॉय यासारखी आदिवासींचा विचार करणारी जंगलाबाहेरची माणसंही आहेत. या सगळ्या व्यक्तीचित्रणात्मक कवितातून खूप चांगल्या प्रकारे आदिवासी जीवन उभं राहतं. भुजंग मेश्राम यांच्या उलगुलान या पहिल्या संग्रहात अशीच छोटी छोटी व्यक्तीचित्रं आलेली होती. त्यातून आदिवासींचं जग जिवंतपणे उभं करण्यात आलेलं होतं. पुढं अभिजात कविता लिहिण्याच्या प्रयत्नात भुजंगची कविता समजायला कठीण होत गेली आणि सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरची झाली. पोईनकर मात्र आपली कविता साधी, सोपी ठेवतात. त्यामुळेच त्यातला अनुभवाचा जिवंतपणा तुमच्या काळजाला स्पर्शून जातो.


याआधी लोकवाङ्मयने अनिल साबळे यांचा टाहोरा हा आदिवासींचे जीवनचित्रण करणारा कवितासंग्रह प्रकाशित केला होता. त्यातही आदिवासी जीवनाविषयी सखोल मांडणी करण्यात आलेली होती. त्या कविताही मला खूप आवडलेल्या होत्या. पण अनिल साबळे यांचे विश्व प्रामुख्यानं आदिवासी शिक्षणाशी संबंधित असल्यामुळे त्यात ते विषय जास्त आलेले होते. पण अविनाश पोईनकर हे प्रामुख्यानं आदिवासींमध्ये काम करणारे कार्यकर्ते असल्यामुळे त्यांनी आदिवासींचं सर्वांगीण जीवनदर्शन या कवितेत घडवलेलं आहे. आणि त्यात ते यशस्वी झालेले आहेत. 


अविनाश पोईनकर यांना स्वतःतल्या कवीपेक्षा स्वतःला कार्यकर्ता जास्त महत्त्वाचा वाटतो. पण खरंतर त्यांच्यातला कार्यकर्ता जेवढा तळमळीचा आणि प्रामाणिक आहे, तितकाच त्यांच्यातला कवी प्रतिभावंत आहे, हे त्यांनी विसरू नये. नाहीतर मराठी कवितेवर अन्याय होईल. कारण पुढं पोईनकर कवितेकडं दुर्लक्षही करतील. ते त्यांनी करू नये म्हणजे मराठी कवितेचे नुकसान होणार नाही. पोईनकर यांच्या कवितेत सखोल जीवनदर्शनाचा गाभा आहे, विद्रोह आहे आणि नव्या मांडणीची अपेक्षाही आहे. खालील काही प्रतिनिधिक कवितांमधून पोईनकरांच्या कवितेची प्रकृती वाचकांच्या लक्षात येईल. आणि पोईनकरांच्या कवितेचे महत्त्वही वाचक समजून घेतील. म्हणून त्यांच्या ह्या काही कविता,


१.


आदिवासी 

आम्ही साधन झालोय 

सरकार आणि संस्थांसाठी.

आम्ही संशोधन विषय 

विद्यापीठ आणि प्राध्यापकांसाठी.

आम्ही प्रयोगभूमी 

शासकीय योजनांसाठी.

आम्ही मागास, बिचारे 

शहरातल्या भांडवलदारांसाठी.

आम्ही अडगळ 

कंपन्या-उद्योगपतींसाठी 

आम्ही जंगलचे राजे 

आकाशा झालोय बैल 

इथल्या व्यवस्थेने 

काळोख पेरलाय शेकडो मैल


२.


आम्ही पूजतो 

नद्या, नाले, डोंगरांना. 

आम्ही पूजतो 

पाने-फुले-फळे-झाडांना.

आम्ही पूजतो 

आम्हास जगवणाऱ्या ऋतुचक्रांना.

आम्ही पुजतो 

निर्मिकाच्या सजीव सृष्टीला.

आम्ही पुजतो 

दैवत म्हणून आमच्या पूर्वजांना.

आमच्या श्रद्धा-अंधश्रद्धांवर 

सारेच बोलत सुटले विचारवंतांसारखे.

कधीतरी आमच्यातून निसटून चाललेल्या 

माय आणि मातीवर बोला 

आम्हाला कळतंय 

तुम्ही भाग पाडणारच आहात 

तुमच्या निर्जीव दगडांना पुजायला


३.


अबूझमाड 

उतरत आलाय खाली 

खांद्यावर कावड घेऊन 

आदिम श्रावणबाळ 

बनवून आणलेत 

रेखीव टिकाऊ झाडू 

गाडगंभर 

ताडी... बोरगा... 

लाल मुंग्यांची चटणी 

दूरच्या डोंगरातलं 

जैविक धन 

मिळेल त्याला 

कवडीमोल भावात 

आणि 

चवीसाठी घेतलं केवळ मीठ. 

कुणास ठाऊक 

कोणत्या व्यवस्थेची 

दरवेळी लागत असावी दीठ ?


४.


बुकलू , 

तुझ्या जन्माची गोष्ट 

तू नाही विसरू शकत.

तेव्हाही तुझी नाळ 

दगडाने ठेचली होतीस 

आता 

तुझा जन्मच ठेचला जातोय


५.


अनिता, 

काय डेंजर निघालीस तू 

रातच्या दोन वाजता सायकल काढलीस 

घेऊन निघालीस दोन मैल इस्पितळात 

किर्र जंगलातल्या गर्भात वेदना 

चिरत निघालीस मर्दानी 

तिचं बाळ रडलं 

आणि 

गुत्तो वाचली 

मी मनातच तुझी 'आशा' पुजली.


६.


विनोबा, 

तुझ्या नावाची आश्रमशाळा 

तग धरून उभे आहे दंडकारण्यात.

कोणत्याच हौसे-गवसे साहेबांचा फेरफटका 

होत नाही कधी चुकूनही

मास्तर तितके शांत आणि संयमी झालेत आता. 

डाळ-भातात लेकरं खुश 

शाळेच्या भिंतीआत 

दाटलाय गच्च अंधार 

जणू कोठडीतच कोंबलीय मुले 

दप्तरातील पुस्तकातून 

उमलून यावीत रानमाळ फुले


७.


रस्ता 

चकाकतो आहे 

डांबराने 

केल्या मोकळ्या पायवाटा 

चढ-उताराच्या खेळात 

घसरला रोलर खाईत 

इथे ब्रेक नसतो कुणालाही 

नोंद करा रे वहीत


८.


हे गड, या पहाडी 

सारेच कसे निसटून जाताहेत 

हातातून 

आणि 

तू 

गावातून शिकून सवरलेला 

चिडीचूप बसला आहेस 

कुठल्याशा शहरी फ्लॅटच्या कोपऱ्यात.


९.


दंडकारण्यातील 

सागाने 

ऐटीत नटले 

लंडनचे महाल 

अयोध्येत साकारले दिव्य रामलल्ला मंदिर 

आणि कवाडांना सुटलाय सुगंध 

याच मातीतील लाकूडफाट्याचा. 

संसद भवनात 

प्रवेश करताना नमन व्हावंच लागतं 

आमच्या संपदेतून साकारलेल्या दरवाजांपुढे.

आमच्या दंडकारण्यातील 

कारुण्याची 

तुम्ही कशी ठरवू शकता किंमत ?


वरील कवितांतून आदिवासींचं करूण वास्तव आणि त्यांच्या काळजात दाटलेला विद्रोह आपल्या सहज लक्षात येतो. पोईनकरांच्या कवितेची काही रचनावैशिष्ट्येही आपल्या लक्षात येतात. पोईंकर प्रतिमा, प्रतीक, रूपक आणि यमक यांच्या फारसे नादी लागत नाहीत. पण कवितेच्या शेवटच्या चार ओळींमध्ये एकाआड एका ओळीला ते यमक साधताना दिसतात. अर्थातच ते मुक्तछंदातलं यमक आहे. अविनाश पोईनकरांनी काही अष्टाक्षरी आणि षडाक्षरी रचनाही केलेल्या आहेत. पण त्या तितक्याशा प्रभावी वाटत नाहीत.


सरदार जाधवच्या इथल्या मुखपृष्ठावर सरदारनेच याआधी केलेल्या हनुमान व्हरगुळे यांच्या कवितासंग्रहाच्या मुखपृष्ठाची सावली असली तरी रंगछटा पूर्णपणे बदलल्यामुळे या संग्रहाला हे मुखपृष्ठ अत्यंत अनुरूप वाटते. हिरव्या जंगलाच्या काळजातला लाव्हा सरदारने चित्रात नेमका पकडल्यामुळे अविनाश पोईनकर यांची कविताच चित्ररूप घेऊन मुखपृष्ठावर आलेली आहे, असे वाटते. लोकवाङ्मयची निर्मिती नेहमीसारखीच उत्तम आहे. त्यामुळे संग्रह हातात घेऊन कुरवाळावासा वाटतो. पुस्तकातील कवितांची संख्या ७६ असून पुस्तकाची पृष्ठसंख्या ९२ आहे, तर पुस्तकाची किंमत २०० रुपये आहे.


•••

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

दंडकारण्यातील आदिवासी बांधवाच्या जीवनाचं खरंखुरं धगधगत वास्तव : दंडकारुण्य

- राजू गरमडे, चंद्रपूर कवीमिञ, मुक्तपञकार, सामाजिक युवा कार्यकर्ते, आदिवासी भागात जाऊन कार्य करणारे अविनाश पोईनकर एका कार्यक्रमामध्ये भेटले....