बुधवार, 28 मई 2025

दंडकारण्यातील कुरूपकांड : ‘दंडकारुण्य’






- डॉ.प्रमोद मुनघाटे

जेष्ठ समीक्षक, नागपूर 

मोब. 7709012078





‘दंडकारुण्य’ हा अविनाश पोईनकर यांचा कवितासंग्रह. ‘दंडकारण्य’वरून ‘दंडकारुण्य’. दंडकारण्य हे भारतातील एका प्राचीन सांस्कृतिक संघर्षाचे प्रतीक आहे. उत्तरेकडील आर्यावर्त आणि दक्षिणेकडील दंडकारण्य यांच्यातील प्राचीन संघर्ष आजही नव्या स्वरूपात आहे. या संघर्षाचीच किती तरी रूपे पोईनकर यांच्या या संग्रहातील कवितांमधून प्रकट झाली आहेत.    


दंडकारण्य आणि ‘आर्यावर्त’ या संघर्षाचे वर्णन आजच्या वैचारिक भाषेत ‘डावे विरुद्ध उजवे’ असेही करता येईल. ‘उजव्या’ या विशेषणात ज्या धार्मिक कट्टरतेच्या, असहिष्णुतेच्या आणि वांशिक भेदभावाच्या छटा आहेत, त्या इथे अभिप्रेत आहेतच. आणि ‘डाव्या’ मध्ये या देशातील शोषित-पीडिताच्या बाजूने लढणाऱ्या संघटना, वर्गसंघर्षावरील त्यांचा विश्वास आणि अंतिम क्रांती याही गोष्टी जशाच्या तशा गृहीत आहेतच.        

        

भारताच्या मध्यभागातील दंडकारण्य (बस्तर आणि अबूझमाडदेखील) हे दक्षिणेचे प्रवेशद्वार. दंडकारण्यावर एकेकाळी रावणाचे राज्य होते. संशोधकांच्या मते, रामायणातील राम-रावण संघर्ष म्हणजे उत्तरेतील आर्य आणि दंडकारण्यातील आदिवासी यांच्यातील संघर्ष होय. रामाच्या रूपाने अनार्यांनी दंडकारण्यात अतिक्रमण केले आणि आपले साम्राज्य प्रस्थापित केले. दंडकारण्यात आजही आदिवासी जमातींकडून रावणाचे पूजन केले जाते. रावणाची मंदिरे आहेत. तो त्यांचा प्राचीन राजा म्हणून आजही त्याची कीर्ती गातात. रामायणात आर्यांसोबत राक्षस, वानर, निषाद, शबर, यक्ष, या जमातींचा उल्लेख येतो. या जमातींचे दंडकारण्यातील आजच्या आदिवासींशी कोणते नाते आहे, हेही मानववंशशास्त्रज्ञ सांगतात. त्यामुळे राम-रावण असे संघर्षाचे एकरेशीय स्वरूप बदलून गुंतागुंतीचे झाले आहे. ही गुंतागुंत ‘दंडकारुण्य’ संग्रहातील कवितांमधून अविनाश पोईनकर व्यक्त करू पाहतात.


दंडकारण्यातील भामरागड-सुरजागडमध्ये आज कॉर्पोरेट कंपनीच्या लोखंडखाणीशी तेथील आदिवासींचा संघर्ष सुरू आहे. प्राचीन काळात आर्यांच्या आक्रमणात क्षत्रियांसोबत ऋषीमुनी होते. आज कॉर्पोरेट कंपनीशी राजकीय सत्ता आहे. यामुळे संघर्ष सोपा नाही. प्राचीनकाळी धार्मिक पुराणे आदिवासींच्या कुरूपतेचे काव्य रचत असत, वर्तमानकाळात ती जागा वेबसाईट आणि कॉफीटेबल बुक्सनी घेतली आहे. आदिवासींजवळ काय आहे? काहीही नाही. शहरी नक्षलवादी म्हणून तोंड बंद झालेले विचारवंत आणि पत्रकार आहेत. नक्षल्यांचे खबरे म्हणून पकडले जाण्याच्या भयाची टांगती तलवार आहे. बाकी काही नाही.       

              

असलेच तर अविनाश पोईनकर सारख्या कवींच्या कविता आहेत. त्याच्या कवितेत दंडकारण्यातील आदिवासींच्या करुण कहाण्या आहेत, म्हणून त्याच्या संग्रहाचे नाव ‘दंडकारुण्य’ आहे. या कवीच्या कविता म्हणजे त्याचे स्वगत आहेत; किंवा विचारलेले प्रश्न. पण त्या प्रश्नांच्या उत्तराची हा कवी अपेक्षाही करीत नाही. कारण त्या प्रश्नोत्तरांची एक्सपायरी डेट कधीचीच संपली आहे. तो विचारतो, 


“दंडकारण्यातील

सागाने

ऐटीत नटलेय 

लंडनचे महाल. 

अयोध्येत

साकारलेय दिव्य राम लल्ला मंदिर

आणि कवाडांना सुटलाय सुगंध

याच मातीतील लाकूडफाटांचा. 

संसद भवनात

प्रवेश करताना नमन व्हावंच लागतं 

आमच्या संपदेतून साकारलेल्या दरवाजांपुढे. 

आमच्या दंडकारण्यातील 

कारुण्याची 

तुम्ही कशी ठरवू शकता किंमत?”


हे एकीकडे आणि दुसरीकडे चित्र पुढीलप्रमाणे आहे:


“साहेब, 

रिकाम्या हाताने आले 

जाताना ट्रकभर सामान घेऊन गेले.

साहेबाला नसतो कुठलाच नाका आणि टी. पी. 

मंगरूने तोडली 

खाटेसाठी एक सागाची डेर 

अन तस्कर आरोपात त्याचा आरपार बी. पी.” 


‘दंडकारुण्य’मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील जंगलातील आदिवासींच्या शोषणाची चित्रे आहेत. त्यांच्या जखमा आणि वेदनांची अनेक रूपे आहेत. तेथील आदिवासींचे जीवन त्यांचे उरले नाही, ते नक्षलवादी, पोलीस, सरकार, नेते, माध्यमे आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या हातातील खेळणे झाले आहे. त्यांच्या जीवघेण्या खेळात तेथील गोंड-माडियांचा श्वासच कोंडला गेला आहे. विकासाचे जोखड आदिवासींच्या जन्मावरच उठले आहे. कवी लिहितो, 


“बुकलू 

तुझ्या जन्माची गोष्ट 

तू नाही विसरू शकत.

तेव्हाही तुझी नाळ 

दगडाने ठेचली होतीस 

आता 

तुझा जन्मच ठेचला जातोय.”


किंवा 


“जणू 

भयभीत 

देहाचीच झालीय लाकडं 

आणि

जो तो पेटव पाहतोय 

आमची होळी”


आदिवासींच्या आजच्या लोकमानसाची ही वेदना आहे. त्यांच्या भोवतालचे ‘व्यवस्थे’चे जाळे इतके गुंतागुंतीचे आहे की कोण आपला आणि कोण शत्रू हेही त्यांना ओळखता येत नाही, आणि फिर्यादही कुठे करता येत नाही.  


“जीव मुठीत कैद असतो 

मांडू शकत नाही फिर्याद 

मागू शकत नाही दाद  

सभोवताल विणलंय खबऱ्यांचं जाळं 

यात अडकलाच 

कोणी निरपराध  

तर हातात बेड्या ठोकतील 

किंवा 

नसांतून उडतील लालभडक फव्वारे.”


ही फिर्याद कशाची आहे? आदिवासींचे अस्तित्वच संपल्याची. आज गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथील डोंगरं लाल-लाल माती आणि चिखलाने विद्रूप आणि कुरूप झाले आहेत. त्या लाल लाल रक्ताने तेथील आदिवासींच्या वस्त्यांना वेढा घातला आहे. कवी लिहितो, 


“खदाणीत 

अख्खा डोंगर गेला आमचा 

पूर्वज दैवतांच्या जागा, झाडं, कंदमुळं 

अहो पोट गेले आमचं 

रानोमाळ भटकणारे 

खदाणीच्या खड्ड्यात 

करतील उदरनिर्वाह?

आदिम जगण्याच्या नोंदी 

जर टिपता आल्या तुम्हाला 

तर सांगावं,

आमचं वैभव भकास करून 

खदाणीने जगात विकास कुठे झाला ?”    


एकूण ‘विकास’ हा या दंडकारण्यातील आजचा कळीचा मुद्दा आहे. आदिवासींना विकास हवा की नको कोणी विचारत नाहीत. सरकार आणि सत्ताधारीच ठरवतात विकासाची आवश्यकता आणि रुपरेषा. त्या निमित्त केलेल्या ‘इव्हेंट’मध्ये आदिवासींच्या मुली फक्त स्वागतगीतासाठी नाचवल्या जातात. त्याचे फोटो सर्वत्र प्रसिद्ध होतात. पण खाणींच्या विरोधात तीनशे दिवस उपोषण करणाऱ्या आदिवासींची दखल कोणतेच माध्यम घेत नाही आणि कोणताच पुढारी तिथे जात नाही. म्हणूनच अविनाश पोईनकर यांच्या ‘दंडकारुण्य’ला महत्त्व आहे. या कवितांचे महत्त्व वाङ्मयीन नसून राजकीय आणि सामाजिक आहे. कारण ‘दंडकारुण्य’च्या केंद्राचा अवकाश राजकीय आणि सामाजिकच आहे. कोणतेही वाङ्मय हे एक प्रकारे राजकीय कृतीच असते, या अर्थाने ‘दंडकारुण्य’हे संपूर्ण राजकीय कृतीच आहे. 


            

 ००      

‘दंडकारुण्य’: अविनाश पोईनकर

लोकवाङ्मय गृह, मुंबई, मार्च-२०२५

मुखपृष्ठ : सरदार जाधव 

किंमत २०० रु. संपर्क : ८४५४०४९०३६

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

दंडकारण्यातील आदिवासी बांधवाच्या जीवनाचं खरंखुरं धगधगत वास्तव : दंडकारुण्य

- राजू गरमडे, चंद्रपूर कवीमिञ, मुक्तपञकार, सामाजिक युवा कार्यकर्ते, आदिवासी भागात जाऊन कार्य करणारे अविनाश पोईनकर एका कार्यक्रमामध्ये भेटले....