सोमवार, 21 मार्च 2022

युथाॅलाॅजी -१ : फोर्ब्सची तरुण पानं...

 


सध्याचा काळ तरुणाईची प्रचंड परीक्षा घेतोय. केवळ अस्वस्थता नांदतेय उरात. बेरोजगारीच्या खाईत लोटलेल्या तरुणांवर आशेची पांघरून टाकणारे हात किती शिल्लक आहेत समाजात ? संवेदनशील मनाची होळी करुन आपण मोकळे झालोत. आजची तरुण पार हातातून गेलीय, त्यांना कुठलेच भान नाही, सुसाट बोलू लागतो काहीच्या बाही. तसंही बोलायला काय लागतं ? मात्र यांच्या मनगटाची ताकद ओळखता आली तर तेच मागे बोलणाऱ्या हजारो लोकांच्या मनात परिवर्तनाची धग पेटवून निरंतर समाजाला संजिवनी देवू शकतात. स्वत:च्या कष्टावर विश्र्वास संपादन केला कि एकलव्यच सर्वोत्तम नेम साधतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा, स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा जागर करत विंदाची 'देणा-यांनी देत जावे, घेणा-याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे एक दिवस हात घ्यावे' ही कविता प्रेरणा वाटेतील मित्रांच्या कार्यकर्तृत्वांना चपखल लागू होते.

जागतिक स्तरावर ओळख असलेल्या 'फोर्ब्स' या मासिकाने देशभरात वयाच्या तिशीतील तीस प्रभावशाली तरुणांची यादी जाहीर केली. या यादित स्थान मिळालेल्या चंद्रपूरातील २६ वर्षीय सारंग कालिदास बोबडे या तरुणांचं सामाजिक काम बघितलं तर थक्क होतो. अनिल रेड्डी, संदीप शर्मा या तरुणांना सोबत घेऊन २०१७ साली देशभरातील सामाजिक संस्थांचा त्यांनी अभ्यास सुरू केला. सामाजिक संस्था म्हणजे एनजीओ यांना सहाय्य करणाऱ्या डोनरला खरोखरच संस्था पारदर्शक काम करतात का ? याची खात्री नसते. यावर अभ्यास करून वस्तू स्वरूपात गरज ओळखून सामाजिक संस्थांना पारदर्शक मदत करायची, हा संकल्प त्यांनी केला. 

सारंगला आयआयटीला प्रवेश मिळाला नाही, ही हुरहूर बाजूला सारून त्याने माटुंगातील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे प्रवेश घेतला. कॉलेजमधील 'मंजर फेस्टिवल'चा तो प्रमुख. यासाठी त्याने ५० ते ६० लाख रुपयांचा ऑनलाइन फंड रेस केला. २०१४ साली विविध स्टार्टअप संस्थापकांच्या स्टोरी वाचून तो झपाटला. आपण तंत्रज्ञानाचा उपयोग करून स्वतंत्र समाजाभिमुख कंपनी सुरू करून उद्योग करावा, हे ध्येय ठरले. फ्लिपकार्टच्या अभ्यासानंतर 'डोनेटकार्ड' ही संकल्पना त्यांना सुचली. एनजीओ साठीचं फ्लिपकार्ट म्हणजे 'डोनेटकार्ट' अशी सरळ सरळ या कंपनीची व्याख्या. याच नावाने या कंपनीची वेबसाइट आहे. 

सारंगच्या डोनेटकार्डला देशभरातील १००० सामाजिक संस्था जुळलेल्या आहेत. मागील पाच वर्षात १५० कोटी रुपयांचा फंड देश-विदेशातून रेस करून त्यांनी समाजातील गरजा ओळखून आवश्यक संस्थांना वस्तू स्वरुपात मदत केली. देश-विदेशातील १० लाख कंपनी व नागरिकांनी डोनेटकार्टला समाजोन्नतीसाठी आर्थिक सहकार्य केले. त्या आर्थिक मदतीतून देशभरात त्यांनी गरजा ओळखून संस्थांना कामासाठी मायेची फुंकर दिली. टेक्नॉलॉजीचा वापर करून सामाजिकता जिवंत ठेवायची, याचा परिचय सारंग देतो आहे. या तरुणांची ही सोशल चळवळ खुद्द बिल गेट्स यांना आवडली.

बरेच एनजीओ चांगले काम करतात, पण काही एनजीओच्या व्यवहाराने त्यातील विश्वासार्हता गमावली आहे. डोनेटकार्ट हे सामाजिक संस्थांना 'नीड बेस डोनेशन' या तत्त्वाने सहकार्य करते. या २६ वर्षीय तरुणांची ७० लोकांची टीम यात कार्यरत आहेत. 

हल्ली लोक काम कमी आणि गाजावाजा जास्त करतात. पुन्हा बरंच काम करायचंय, समस्यांची रांग उभी आहे, ही भावना सारंग व्यक्त करतो. भविष्यात संस्थांना सामाजिक प्रकल्प करण्यासाठी अर्थसहाय्य करण्याचा विचार तो करतोय. तरुणाईमध्ये कामाबाबत स्पष्टता नाही. त्यांना सगळंच करायचंय, पण नेमकं काय करायचंय ? यातील 'का?' चा शोध घेणे महत्वाचे आहे. मोहम्मद यूनिस आणि वर्गीस क्यूरिन या लेखकांच्या पुस्तकांनी सामाजिक उद्योग उभारण्याची प्रेरणा दिली, असे तो सांगतो.

सारंगसोबतच 'फोर्ब्स' या मासिकाने बुलढाण्यातील पिपरी खंदारे या छोट्याशा गावातील राजू केंद्रे या एकलव्याची देखील दखल घेतली. सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना उच्च शिक्षण घेण्यासाठी तो मार्गदर्शन करतोय. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क, अजीम प्रेमजी, आयआयटी, आयआयएम, जेएनयू या मोठ्या विद्यापीठात राजूच्या एकलव्य फाउंडेशनमुळे शेकडो सर्वसामान्य कुटुंबातील मुले शिक्षण घेत आहेत. चंद्रपूरातील नांदेड या छोट्याशा गावातील दादाजी खोब्रागडे या तिसरा वर्ग शिकलेल्या कोरडवाहू संशोधक शेतकऱ्यांची देखील फोर्ब्सने २०१० साली दखल घेतली. त्यांनी एचएमटीसह ९ धानाच्या प्रजाती शोधून काढल्या. या तरुणांच्या समाज बदलांच्या कामाकडे बघितलं की तरुणांत असणाऱ्या जगाला जिंकणाऱ्या ताकदीचा अंदाज येतो. 

सारंगची सामाजिक झेप बघितली तर तरुणाईला प्रेरणा देणारे, तंत्रज्ञान युगात समाजाला दिशा देणारे अनेक युवक-युवती अवती-भवती दिसतात. तरुणांच्या सकारात्मकतेला बळ देणे गरजेचे आहे. कमालीचे सामाजिक रसायन असणाऱ्या या तरुण व्यक्तिमत्त्वांना सलाम !


- अविनाश पोईनकर




युथाॅलाॅजी -२ : कृषी विकासाचं 'अमीत' पाऊल..


'शेती म्हणजे आयुष्याची माती' असा काहीसा सूर सध्या आहे. 'शेतकरी नवरा नको ग बाई' हे बोचरे वास्तव सतत मनाला डिवचतात. सव्वाशे एकर जमीन असणारे यवतमाळातील चिलगव्हाणचे साहेबराव पाटील कुटुंबासह आत्महत्या करतात, पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून त्यांची नोंद होते, यातून शेती निष्ठावंताच्या वेदना अधोरेखित होते. शेतकऱ्यांना आता त्यांचा मुलगा शेतकरी व्हावा असे सहसा वाटत नाही. जगाच्या पोशिंद्याबाबत असं का व्हावं ? अस्मानी-सुलतानी संकटात शेतकऱ्यांच्या होरपळीचे नवे नवे दृष्टांत पुढे येतात, तेव्हा अस्वस्थतेचे ढग कोरडे ठप्प होतात. या समग्र चिंतनात एक आशेचा सूर काही शेतकरीपुत्र मातीला अन् माणसांना जगवण्याला देताहेत, 'कृषी विकास' हे त्यातलंच एक सकारात्मक पाऊल ! 

अमित दिलीपराव नाफडे हे तरुण व्यक्तिमत्व. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधून समाजकार्याचे शिक्षण घेतलेल्या या तरूणाने आपली माती आपली माणसं जवळ केली. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील तळणी हे त्यांचं गाव. कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमाने त्यांनी सन २००० पासून प्रत्यक्ष जमिनी स्तरावर शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी स्वतःला झोकून दिले. शेतकऱ्यांना काळानुसार योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण उपलब्ध करून दिले व त्यांच्या भक्कम पाठीशी उभे राहिले तर त्यांचे मानसिक खच्चीकरण होणार नाही, यातून सकारात्मक कामाला गती येईल, यावर त्यांचा विश्वास आहे. पहिल्या टप्प्यात संस्थेचा स्वयंसेवक ते सीईओ असा त्यांचा प्रवास आहे. दुसऱ्या टप्प्यात सेंद्रिय शेती, बचत गट आणि जलसंवर्धन यावर प्रकल्प राबवायला त्यांनी सुरुवात केली. तिसऱ्या टप्प्यात शेतकरी उत्पादन कंपनी मजबूत करण्यावर भर दिला. कृषी विकासच्या माध्यमातून महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यात शेतीविषयक नवे तंत्रज्ञान व शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचे ते काम करत आहेत. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश व गुजरात या राज्यातही त्यांचे काम विस्तारले. एक लाखांपेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांसोबत या संस्थेच्या माध्यमातून ते प्रत्यक्ष काम करतात. यासाठी २५० पूर्णवेळ कार्यकर्त्यांची त्यांची टीम कार्यरत आहे. 

शेतकऱ्यांच्या शेती पद्धती, पीक लागवड, त्यांच्या मालाची गुणवत्ता, आधारभूत भाव, मार्केट उपलब्धता, पाण्याची मुबलक सुविधा, कृषीपूरक व्यवसाय यासाठी विविध उपाययोजना आखणे, प्रशिक्षणातून शेतकऱ्यांना सन्मानाने जगायला दिशादर्शक पाठबळ देणे, यासाठी आपलं कार्यकर्तृत्व समर्पीत करणे हीच त्यांची खरी ओळख. वातावरण बदलानुसार शेतीतील मातीचे परीक्षण करून कोणते पीक कधी घ्यावे? त्याचे मार्केट लिंकेज कसे करावे ? याबाबत दक्षतेने ते काम करतात. यासाठी प्रत्यक्ष ग्राउंडवर राबणारा हा तरुण आहे. सोलापुरातील सुरुडी गाव पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत राज्यात प्रथम आले. त्यासाठी प्रत्यक्ष जलसंजीवनी प्रकल्पातून पानलोटाचे काम कृषी विकासने केले. त्याचा परिणाम या गावाला नुकताच राष्ट्रीय जलशक्ति पुरस्कार मिळाला. 

शेतकऱ्यांचा विकास हा शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून होऊ शकतो, यासाठी प्रत्यक्ष पुढाकार त्यांनी घेतला. जवळपास ७५ शेतकरी कृषी उत्पादक कंपन्यांची त्यांनी महाराष्ट्रात स्थापना केली. यासाठी मॉडेल म्हणून त्यांनी स्वतः जय सरदार कृषी विकास शेतकरी उत्पादन कंपनीला पुढे केले. याद्वारे ते प्रत्यक्ष शेतमाल खरेदी करतात. मालाची गुणवत्ता ठरवतात. या कंपनीद्वारे शेतकऱ्यांना पहिल्यांदाच बोनस दिला गेला. हा देशातला पहिला प्रयोग ठरला. १ जाने २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकरी कृषी उत्पादन कंपनींना १४ कोटीचे प्रोत्साहन अनुदान दिले. यात १ कोटींचे प्रोत्साहन अनुदान कृषी विकास संस्थेने स्थापन केलेल्या शेतकरी उत्पादक कंपनींना दिले. हे त्यांच्या निरंतर कार्याचे फलित आहे. खुद्द पंतप्रधानांनी त्यांच्या 'मन की बात' कार्यक्रमात अमित नाफडे व त्यांच्या कृषी विकास टीमच्या कामाची ओळख देशवासीयांना करून दिली. हैद्राबादची मॅनेज इन्स्टिट्यूट तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाद्वारे शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यवस्थापन अभ्यासक्रम पदविका पहिल्यांदाच या संस्थेमार्फत महाराष्ट्रात अमीत नाफडे या तरुण कर्तृत्वाच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. ही खरे तरुणाईतील प्रवाही उर्जा आहे. 

अमित नाफडे हे स्वतः शेतकरी आहेत. आपल्या शिक्षणाचा उपयोग नवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन 'विकेल ते पिकेल' यावर भर देणे ते महत्त्वाचे मानतात. शेतकरी केवळ शेतीवर जगू शकत नाही, त्याला जोडधंदा हवा यासाठी शासकीय योजनांसह विशेष प्रकल्पातून ते डेअरी, पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देतात. आज कृषी विकासमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची गुणवत्ता स्वतः तपासता येते. त्यांची फसवणूक होणार नाही याचं लोकशिक्षण त्यांना प्राप्त झालं. यात प्रत्यक्ष हजारो महिलांचा सहभाग वाढला. शेतीमधील बदलांचे प्रात्यक्षिक आता शेतकरीच अनुभवतात. खरे तर ही आधुनिक क्रांती आहे. 

कृषी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची चळवळ सक्षम करण्याची गरज ते अधोरेखित करतात. आज लाखो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या शेतीतील प्रयोगामुळे, मार्गदर्शनामुळे समाधानाचे गाणे तरळत असते. कृषी विकासावर काम करणा-या या संस्थेचा अग्रक्रमाने देशपातळीवर नामोल्लेख होतो. कृषी क्षेत्रातील त्यांच्या परिवर्तनात्मक कामाला राज्य व राष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे, यामागे त्यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा आहे. जागतिकीकरणाच्या अंदाधुंदीत मातीत राबणाऱ्या कष्टकऱ्यांचे हात येणारा काळ निश्चितच मजबूत करेल. त्या हातावरच्या रेषेत अमित नाफडे आणि कृषी विकास हे नाव कायम गोंदलेले राहील.


- अविनाश पोईनकर




दंडकारण्यातील आदिवासी बांधवाच्या जीवनाचं खरंखुरं धगधगत वास्तव : दंडकारुण्य

- राजू गरमडे, चंद्रपूर कवीमिञ, मुक्तपञकार, सामाजिक युवा कार्यकर्ते, आदिवासी भागात जाऊन कार्य करणारे अविनाश पोईनकर एका कार्यक्रमामध्ये भेटले....