बुधवार, 20 अगस्त 2025

दंडकारण्यातील आदिवासी बांधवाच्या जीवनाचं खरंखुरं धगधगत वास्तव : दंडकारुण्य

- राजू गरमडे, चंद्रपूर


कवीमिञ, मुक्तपञकार, सामाजिक युवा कार्यकर्ते, आदिवासी भागात जाऊन कार्य करणारे अविनाश पोईनकर एका कार्यक्रमामध्ये भेटले. त्यांनी त्यांची 'सुरजागड : विकास की विस्थापन?' आणि 'दंडकारुण्य' ही प्रकाशित झालेली दोन पुस्तके दिलीत. 'उजेड मागणारी आसवे' या कवितासंग्रहानंतर म्हणजेच २०१७ नंतर आलेली ही त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. तसेच 'विमल गाडेकर : व्यक्ती आणि वाड़मय' या ग्रंथाचे संपादन सुद्धा त्यांनी केलेले आहेत.


'दंडकारुण्य' हा कवितासंग्रह म्हणजेच आदिवासी भागामध्ये कार्य करीत असताना त्यांच्यासोबत राहून, त्यांचं आयुष्य जवळून पाहून जे त्यांना दिसलं, अनुभवता आलं, तेच त्यांच्या कवितेत उतरलेलं आहे. विकासाच्या कोसोदूर असलेला आणि कागदोपत्री असलेल्या विकासाच्या योजनांपासून अनभिज्ञ असलेला हा आदिवासी बांधव कायमच शासन आणि नक्षलवाद्यामध्ये पिचला गेलेला आहे. त्यांचे हक्क, अधिकार मिळविताना त्यांना संघर्षाशिवाय दुसरा मार्ग नाही. जंगल हे त्यांच्या जगण्याचं साधन. पण तेही आता विकासाच्या गोंडस नावाखाली तोडल्या जात असेल तर मग त्यांनी जगावं कसं? शिक्षण, वीज, नोकरी यापासून ते अजूनही दूरच आहे. हे त्यांचं वास्तव कवी अविनाश पोईनकर यांच्या कवितेमधून उजागर झालेलं आहे. त्यांची कविता ही आदिवासींच्या जगण्याचं प्रतिबिंब आहे. जो जगतो कसा, राहतो कसा, खातो कसा आणि भयाच्या दशहतीखाली राहतो की स्वतंत्र राहतो? हे त्यांची कविता वाचकांना सांगत आहेत.


एकून ७६ कविता या संग्रहात आहे. काही कविता ४-५ ओळीच्याच आहेत. पण आशयाने मात्र परिपुर्ण आहे. दीर्घ कवितेमधून अभिव्यक्त होणाऱ्या आशयापेक्षाही या कवितेमधून सामाजिक वास्तव आणि आदिवासी बांधवांचं जगणंच अधोरेखित होत आहे. वेदना, अन्याय आणि अत्याचाराने वेढलेला हा आदिवासी बांधव कवीने आपल्या कवितेमध्ये बंदिस्त केलेला आहे.


तुमच्या विकासासाठी आम्ही कट्टीबद्ध आहोत. तुमचा विकास करणे हे आमचे कर्तव्यच आहे. आम्ही तुमच्या प्रश्नांना शासनदरबारी मांडण्याचा प्रयन्न करु, असे आश्वासन या आदिवासी बांधवाना दर पाच वर्षानी मिळत असते. पण, निवडणूका झाल्या की सगळं काही शांत होऊन जातं, पुढल्या पाच वर्षापर्यंत. हेच होऊन राहिले आहे त्यांच्याबाबतीत. कित्येक वर्षापासून...


बोट कधीचेच कापून टाकलयं आम्ही

आता बोटावरच्या शाईवर

उरला नाही विश्वास

ऐनवेळी अरण्यात येतात

महाभंयकर विविधांगी पूर

अन् निघतात गुदमरलेले सूर


विकासाच्या योजना 

धगधगत असतीलच चुलीत

तर द्या शिजवून

कोसरी किंवा धानाचा भात

तसंही दर पाच वर्षाने ठरलेलाच असतो

आमचा घात


जंगल हे जगण्याचं साधन. त्यांचं रक्षण करणे, संवर्धन करणे ही आजच्या काळाची गरज आहे. पण, जिथे जंगलाच्या रक्षकालाच जीव मुठीत घेऊन जगावे लागते, तिथे जंगल तरी सुरक्षित राहणार का ? 


वनरक्षकाला कोंबलं जंगलात

अन् मारलं

मांडी फुटेस्तोवर

लंपास केलं

त्याच्या ड्युटीचं साहित्य

'पुन्हा दिसलास तर जीव गमावशील' 

या धमक्यांचा आवाज

गगनभेदी होतोय

कळते पण वळत नाही

नेमकं जंगल कोण खातोय ?


अन्याय, अत्याचाराने पिचलेला आदिवासी बांधव जगतोच मुळी भीतीच्या सावटाखाली. कुणाकडे करावी तक्रार? दाद मागण्याचा अधिकारच नाही मुळी त्यांना. कित्येक निरपराध आदिवासी नाही केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत आहे.


जीव मुठीत कैद असतो

मांडू शकत नाही फिर्याद

मागू शकत नाही दाद

सभोवताल विणलयं खबर्‍यांच जाळं

यात अडकलाच

कोणी निरपराध

तर हातात बेड्या ठोकतील

किंवा

नसांतून उडतील लालभडक फव्वारे


आदिवासी हा जगंलात राहतो. तेच त्यांचं घर. शिक्षणाच्या प्रवाहापासून कोसोदूर. दवाखान्यात जाण्यासाठी धड रस्तेही नाही. नदी-नाले पार करुन उपचारासाठी, प्रसूतीसाठी जावे लागते. त्यांच्या मूक वेदनांचा आवाज शासनदरबारापर्यत कधी पोहोचणार का ? 


शांती,

नदी - नाल्यांच्या अरण्यातून

तीस कि.मी.खाटेवर उचलून नेऊन

तुझं झालं ' सिझर '

आता गावात तुझे दोर झाले सैल

वाहतेय त्यातून रक्त - पाणी

तुझ्या रडण्याचा आवाज

पोहोचू शकत नाही इस्पितळापर्यंत

तुझ्या पोटातील धागे

तुझ्यासकट झाले गायब


आदिवासींच्या जगण्याला, त्यांच्या संघर्षाला, त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराला अनेक कवी, लेखकांनी वाचा फोडली. कुणी कविता केल्या तर कुणी कथा लिहिल्या. पुस्तके काढली. अभिमानाने कवी म्हणून मिरविले. पुरस्कारही मिळाले. ते सारं काही ज्यांच्यामुळे मिळाले त्यांच्या घरापर्यंत तरी ते गेले आहेत? की, एसी मध्ये बसून त्यांच्या वेदनांचा बाजार मांडला. त्यांचं जगणं समजून न घेता. त्यांच्या पाठीला तरी त्यांचे लिहिणारे हात लागले असतील काय? तरीही आपण त्यांचा उदोउदो करायला लागतो.


लिहिल्या कविता

काढली पुस्तके

भराभर डझनभर झालीत पुस्तके

शेकडोंनी घेतले पुरस्कार

अकादमी, ज्ञानपीठापर्यंत

मारली मजल दर - मजल

ज्यांच्या वेदनांचा मांडला बाजार

ज्यांच्या दारात ना कधी पडली सावली

बेदखल झालेल्या आक्रोशाचे

ना कधी झालात भाग

तरीही आम्ही

तुमच्या लेखनीचे गुणगाण गातोय


आदिवासींचं जगणं मांडणारी ही कविता म्हणजे त्यांचं धगधगत वास्तव मांडणारी आणि त्यांच्या मागे लागलेल्या दडपशाहीची कर्मकहाणीच आहे.


ते येतात

जाळपोळ करतात

निघून जातात

इथला

आदिवासी

जळतच राहतो

निरंतर....


बुकलू.. अनिता.. शांती.. विनोबा.. प्रकाश पुसू विडपी.. अरुंधती राॅय.. महेश राऊत.. मालू कोपा बोगामी.. संगीता जोगा मडावी.. मंगला.. यांच्याही वेदनाची दखल कवीने घेतली आहे.


'दंडकारुण्य' या कवितासंग्रहातील कविता ही आदिवासींच्या जगण्याचे कंगोरे ऊलगडणारी आणि जसं जीवन ते जगतात, ज्या गोष्टींचा त्यांना पदोपदी सामना करावा लागत आहे, ती वास्तविकता मांडणारी आहे. शिवाय कवीची आंतरिक तळमळ आणि प्रामाणिक भाव कवितेमधून व्यक्त झालेला आहे. आदिवासी बांधवाच्या कल्याणासाठी, विकासासाठी, न्यायासाठी, तन-मन-धनाने काम करीत असलेल्या या कवीच्या कवितेची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जाईलच, यात तीळमात्रही शंका नाही.


लोकवाड्मय गृह, मुंबई या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या या कवितासंग्रहाला लाभलेलं सरदार जाधव यांचं मुखपृष्ठही खुप बोलकं आणि लक्षवेधी आहे. सामाजिक कार्यकर्ते, आदिवासी कवी व विचारवंत वाहरू सोनवणे यांनी कवितेची पाठराखण केलेली आहे. अविनाश पोईनकर हे एक कवी आणि एक सच्चा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून घेत असलेल्या कष्टाला, प्रयन्नाला यश प्रात्त होत राहो, अशी प्रार्थना करतो. आणि शुभेच्छा देतो.

•••



कवितासंग्रह    :- दंडकारुण्य

कवी               :- अविनाश पोईनकर

प्रकाशक         :- लोकवाड्मय गृह,मुंबई.

प्रथमावृत्ती       :- मार्च २०२५

मुखपृष्ठ           :- सरदार जाधव

पाठराखण      :- वाहरू सोनवणे

पृष्ठ                 :- ९१

मूल्य               :- ₹ २००/-


रविवार, 17 अगस्त 2025

दंडकारुण्य : आदिम वेदनेचा समकालीन कवितेतील स्वर

 













(ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या हातात 'दंडकारुण्य' कवितासंग्रह)



- डॉ.राजेंद्र मुंढे, वर्धा


अविनाश पोईनकर यांचा 'दंडकारुण्य' हा कवितासंग्रह म्हणजे आदिवासी जीवनाच्या विस्थापनाच्या, अस्मितेच्या आणि संघर्षाच्या विविध पैलूंना कवितेतून भिडवणारा दस्तऐवज आहे. ही कविता केवळ प्रखर राजकीय विधान किंवा भावना-आवेशाच्या उबळीतून साकारलेली नाही. ती प्रत्यक्ष अनुभवांच्या खाचखळग्यांतून जन्मलेली आणि जगण्यातूनच उमटलेली आहे. मध्य भारतातील दंडकारण्य या प्रदेशात कवीने सामाजिक कार्यकर्त्याच्या भूमिकेतून केलेले वास्तवाचे निरीक्षण आणि त्या निरीक्षणातून निर्माण झालेला संवेदनशील काव्यप्रपंच म्हणजे हा संग्रह आहे.


दंडकारण्य हा केवळ एक भौगोलिक भूभाग नाही. तो आदिवासींच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक अस्तित्वाचा केंद्रबिंदू आहे. छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि ओडिशाच्या सीमांवर पसरलेल्या या घनदाट जंगलात माडिया-मुरिया यांसारख्या अनेक आदिम जमाती आजही आपल्या भाषा-संस्कृतीसह जगत आहेत. परंतु या जीवनप्रणालीवर भांडवलशाही आणि विकासाच्या नावाखाली सुरू झालेल्या आक्रमणाचा विळखा घट्ट होत चालला आहे. खाणी, धरणं, महामार्ग, पोलिस-नक्षलवाद संघर्ष या सर्वांच्या कात्रीत आदिवासी जीवनपद्धतीच्या मूलगामी प्रश्नांची धग अविनाश पोईनकर यांच्या कवितेत स्पष्टपणे जाणवते.


'आदिवासी आम्ही साधन झालोय' ही कविता आदिवासींच्या वस्तुनिष्ठ शोषणाची नेमकी मांडणी करते. संशोधन, योजना, नोंदी आणि विकास प्रकल्पांच्या नावाने आदिवासी समाजाच्या मुळावर उठलेली ही यंत्रणा केवळ त्यांना उपेक्षित करत नाही, तर त्यांच्या स्वातंत्र्यालाही गिळंकृत करते. पोईनकर लिहितात 

"आम्ही जंगलाचे राजे

आताशा झालोय बैल 

इथल्या व्यवस्थेने 

काळोख पेरलाय शेकडो मैल". 

ही केवळ शोकात्म अभिव्यक्ती नाही, तर व्यवस्थेच्या मूलभूत असंवेदनशीलतेवर केलेला मर्मभेदी प्रहार आहे.


या कवितांमध्ये एक विशिष्ट 'जाणिवेची सातत्यशीलता' आहे. ही जाणीव फक्त सामाजिक अस्मितेपुरती मर्यादित नसून ती सांस्कृतिक, नैतिक आणि निसर्गाशी असलेल्या जैव संबंधांपर्यंत पोहोचते. 

"आम्ही आमची भाषा बोलतो 

त्यात शिव्या नाहीत 

ओव्या आहेत केवळ प्रेमाच्या" 

अशा पंक्ती आदिवासी संस्कृतीचे सभ्यतेचे परिमाणच बदलून टाकतात. ही कविता केवळ आदिवासी जीवनाचे निरीक्षण नाही, तर जीवन जगण्याचा ठाम आग्रह आहे. त्यामुळेच ती उथळ सहवेदना किंवा साहाय्याच्या वरपांगी भूमिकेतून लिहिलेली वाटत नाही.


या संग्रहातील कविता कधीकधी विनोदी उपरोधाच्या पातळीवर जातात. 'माझ्याकडे आहे / मला उपाशी ठेवणार नाही इतकी माती' ही कविता आर्थिक तुलनांमधून उद्भवणाऱ्या समृद्धीच्या संकल्पनांनाच छेद देते. यातून नुसती सामाजिक टीका होत नाही, तर 'अर्थ' या संकल्पनेचं पुनर्मूल्यांकन सुरू होतं. शहरी विकास, मुख्य प्रवाह आणि यंत्रणांचा भाष्यात्मक विनोद कवीने ओढून ताणून आणलेला नाही, तो अनुभवलेला आहे.


'दंडकारूण्य' हा संग्रह वाचताना वाहरू सोनवणे, भुजंग मेश्राम, व्यंकटेश आत्राम, उषाकिरण आत्राम, कुसुम आलाम, विनायक तुमराम आणि प्रभू राजगडकर यांच्यासारख्या आदिवासी कवींच्या कवितांची आठवण प्रकर्षाने होते. या साऱ्यांच्या लेखनात आपापल्या मातृभूमीचा, बोलीभाषेचा, परंपरेचा आणि विस्थापनाच्या भीषणतेचा सूर आहे. या परंपरेशी पोईनकरांची कविता थेट संवाद साधते. विशेषतः प्रभू राजगडकर यांच्या कवितांतील प्रतीकात्मकता, आदिवासी जीवनातील अंतःस्थ संघर्ष आणि आत्मप्रतिमांच्या पुनर्रचनेचा पदोपदी जाणवणारा प्रयत्न 'दंडकारूण्य'मध्येही दिसून येतो. राजगडकर जसे 'वाटेवरची पालखी' म्हणताना संपूर्ण विस्थापनाचा आत्मनिवेदनातून वेध घेतात, तसाच आत्मा पोईनकर यांच्या 'जंगलनोंदी'त आहे.


या कवितांमध्ये लयबद्धता किंवा पारंपरिक छंद रचनेचा आग्रह नाही. कविता जशी आहे, जशी उमटली आहे, तशीच ठेवण्याची भूमिका कवीने घेतली आहे. त्यामुळेच ती कृत्रिमतेपासून मुक्त आहे. 'बोट कधीचेच कापून टाकलंय आम्ही / आता बोटावरच्या शाईवर उरला नाही विश्वास' या ओळींमध्ये निवडणूक प्रक्रिया, लोकशाही आणि विकास यांचा अनास्थेने आलेला कंटाळा आहे. पण हा कंटाळा हतबलतेचा नाही; तो प्रश्न विचारणाऱ्या, पिचलेल्या पण अजूनही सामर्थ्यशाली असलेल्या जमातीचा आहे. 'अरुंधती रॉय' आणि 'महेश राऊत' यांच्यावर लिहिलेल्या कविता ही कवितेतील एक वेगळीच वैचारिक परिपक्वता दर्शवतात. सामाजिक कार्यकर्त्यांविषयी असलेला आदर आणि व्यवस्थेच्या दडपशाहीविरुद्ध असलेला संताप या दोन्ही गोष्टी येथे समांतरपणे नोंदल्या जातात. या कविता फक्त कारुण्यावर आधारित नाहीत; त्यात तीव्रता, रोष आणि जगण्यासाठी आवश्यक असलेली विवेकपूर्ण संवेदना आहे.


कवीची भूमिका आणि संपादकीय नोंदी यामधून पोईनकरांच्या कवितेचा प्राण अधिक स्पष्ट होतो. ही कविता म्हणजे गोंदण आहे, वेदनेचं, अस्मितेचं आणि जिवंतपणाचं. 'दंडकारूण्य' केवळ वाचायचं नसून जगायचं आहे. ही कविता आपल्याला जंगलात घेऊन जाते, तिथल्या आवाजाशी जोडते आणि शहरात बसलेल्यांना आपला नैतिक आधार तपासायला लावते. अशा कविता आपल्या कवितेच्या व्याप्तीत आदिवासी आवाजासाठी जागा निर्माण करतात. त्या कवितेला एका नैतिक आणि भौगोलिक सीमारेषेपलीकडे घेऊन जातात. म्हणूनच 'दंडकारूण्य'चा आवाज ऐकणं, समजून घेणं आणि त्याच्या प्रतिध्वनीवर चिंतन करणं ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. 



दंडकारूण्य । अविनाश पोईनकर 

पाने : ९२ । किंमत : २००/-

मुखपृष्ठ : सरदार जाधव

लोकवाड्मय गृह प्रकाशन, मुंबई 


••••



दंडकारुण्य : समकालीन जगण्याच्या अस्वस्थ जंगलनोंदी














• आशिष वरघणे, वर्धा


मराठी कवितेच्या समकालीन प्रवाहात विदर्भातून येणारे कवी म्हणजे अविनाश पोईनकर. त्यांचा २०१७ साली 'उजेड मागणारी आसवे' हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. अभावग्रस्ततेत सोसलेल्या, भोगलेल्या यातनांची अभिव्यक्ती या त्यांच्या संग्रहातून उजागर झाली. आणि अलिकडे मार्च २०२५ मध्ये लोकवाङ्मय गृह, मुंबई कडून आलेला दुसरा कवितासंग्रह म्हणजे 'दंडकारुण्य’. या कवितासंग्रहाने मराठी साहित्यात एक अस्वस्थ करणारी पण अत्यंत आवश्यक अशी जागा निर्माण केली आहे. ही कविता केवळ अभिव्यक्ती नाही, तर ती एक साक्षीदार आहे, निसर्गाच्या विध्वंसाची, आदिवासींच्या शोषणाची, आणि भांडवलशाहीच्या भस्मासुरत्वाची. ‘दंडकारुण्य’ ही केवळ एक भौगोलिक संज्ञा नाही, तर ती पोईनकर यांच्या कवितांमध्ये एक प्रतिरोधाचे प्रतीक आहे. आदिवासींच्या दुःखांचा, जल-जंगल-जमीन खचवणाऱ्या प्रगतीच्या कल्पनांचा, आणि विस्थापितांच्या वेदनांचा जळता दस्तऐवज आहे. 


मध्य भारतातील अभूजमाड-दंडकारण्य भागात कामानिमित्ताने केलेली त्यांची मुक्त भटकंती, जवळून अनुभवलेले जंगलविश्व, हक्क आणि अधिकाराची होणारी गळचेपी, कॉर्पोरेट युगाचे आदिवासींच्या अधिवासावर होत असलेले अतिक्रमण, तेथील नैसर्गिक श्रीमंती आणि कार्यकर्ता म्हणून बसणारे चटके अनुभवून या भागातील उलथापालथीच्या नोंदी म्हणून त्यांनी या जंगलनोंदी टिपल्या. दंडकारुण्य या कवितासंग्रहात एकूण ७६ कविता असून त्या शीर्षक नसलेल्या आहेत. शिवाय शीर्षक नसलेल्या कविता हेच या कवितासंग्रहाचे पहिले आणि महत्वाचे वैशिष्ट्ये आहेत. कारण आदिवासी, विस्थापित, भटके व वंचित यांच्या जगण्याला समकाळात शीर्षक नाही. त्यांच्या जगण्याला अर्थ नाही. त्यांच्या हक्काची मूल्ये असूनही त्यांची फरफट अस्वस्थ करणारी आहे. हेच शीर्षक न ठेवण्याचे कारण असावे. याचे उत्तम उदाहरण कवी पुढील कवितेत मांडतो.


"आम्ही जंगलाचे राजे 

आताशा झालोय बैल 

इथल्या व्यवस्थेने 

काळोख पेरलाय शेकडो मैल"


कवी अविनाश पोईनकर यांच्या कवितेचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे आदिवासी माणसाचा आत्मसन्मान. त्यांच्या कविता कोणत्याही सहानुभूतीच्या भावनेवर आधारलेल्या नाहीत. त्या ‘दया’ किंवा ‘दुराव्याच्या’ वरचढ आहेत. त्या एक भोगलेल्या अनुभवाचे अस्सल दस्तऐवजीकरण आहेत. म्हणूनच कवी स्वाभिमानाने म्हणतो,


"पेट्रोल,

डिझेल 

गाडीच पिते 

माणूस प्यायला असता 

तर सुरू झालं असतं 

जागतिक महायुद्ध!

बरं झालं 

आमचं जंगल 

आहे शाबूत 

आणि 

पाणी आहे शुद्ध"


‘दंडकारुण्य’ हा संग्रह थेट भूमिका घेणारा संग्रह आहे. यात प्रकल्प, कॉर्पोरेट्स, सरकार, मीडिया अशा सगळ्या संस्थांना त्यांनी वेळोवेळी प्रश्न केलेला आहे. विकासाच्या नावाखाली होणारी जंगलतोड, जलसंपत्तीवर नियंत्रण, जमीन हस्तांतरण आणि विस्थापन यावर त्यांनी धारदार भाषेत सवाल केला आहे.


"खदाणीत

अख्खा डोंगर गेला आमचा 

पूर्वज, दैवतांच्या जागा, झाडं, कंदमुळं 

अहो पोट गेलंय आमचं....

रानोमाळ भटकणारे 

खदाणीच्या खड्यात 

करतील उदरनिर्वाह?

आदिम जगण्याच्या नोंदी 

जर टिपत्या आल्या तुम्हाला 

तर सांगावं,

आमचं वैभव भकास करून 

खदाणीने 

जगात विकास कुठे झाला ?


विकास ही संकल्पना म्हणून सद्यस्थितीत शंका घेण्यासारखे आहे. याची वास्तव उकल त्यांनी कवितेतून केलेली आहे. त्यामुळे अविनाश पोईनकर हे केवळ कवी नाहीत, आदिवासींमध्ये काम करणारे केवळ कार्यकर्ते नाहीत तर विचारवंतही वाटतात. विदर्भातील आदिम माडिया, कोलाम, आदिवासी संस्कृती विषयीची कळवळ पोईनकर यांनी अगदी प्रभावीपणे मांडली. त्यामुळे कविता अधिक प्रामाणिक वाटते. 


"आम्ही पुजतो 

दैवत म्हणून आमच्या पूर्वजांना.

आमच्या श्रद्धा-अंधश्रद्धांवर 

सारेच बोलत सुटले विचारवंतांसारखे.

कधी तरी आमच्यातून निसटून चाललेल्या 

माय आणि मातीवर बोला 

आम्हाला कळतंय 

तुम्ही भाग पाडणारच आहात 

तुमच्या निर्जीव दगडांना पूजायला"


या ओळींमधून स्थानिक माणसाची एक आंतरिक समज, भावनिक नातं, आणि निसर्गाशी असलेली जोड व्यक्त केली. जी शहरी माणसाच्या कल्पनेच्या बाहेरची आहे. या संग्रहातील कविता प्रतिकाराचे सूक्ष्म प्रकटन करढा-या आहेत. दंडकारुण्य मधील अनेक कविता उघडपणे व्यवस्थेविरोधात बोलत नाहीत, पण त्यांचा स्वभावच विद्रोही आहे. त्या व्यवस्थेला प्रश्न विचारतात, विकासावर शंका घेतात.


"विकास 

कुणाच्या भरोशावर कोणाचा ?

सारेच वितळवून नेतील 

असा पुतळा मेणाचा 

कोपा गावळेचा रस्ता 

कागदावर हसतो आहे 

बिनविषारी धामण 

इथे नागासारखी डसते आहे"


आदिवासी स्त्रीयांची व्यथा आणि स्त्रीप्रधान संस्कृती अतिशय प्रभावीपणे त्यांनी कवितेतून मांडली. यातल्या आदिवासी स्त्रीयांची व्यथा कवीने प्रखर शब्दात अधोरेखीत करून त्या परस्परांना सावधही करायला विसरत नाही. याचेही भान या असुरक्षित स्त्रियांना आहे. म्हणून त्या मोजक्याच स्त्रियांना सावध करत नाहीत तर त्यांचा स्वर प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे. पितृसत्ताकइंगळ्या विरुद्ध आहे. आणि या सर्व महिला प्रत्येक क्षेत्रातल्या स्त्रियांच्या प्रभावी प्रतिमा देखील म्हटले तर वावगे होणार नाही.


"दुर्गी 

बिजूला 

गुत्तो

जन्नी 

गोई 

आता असायला हवं आपण सावध 

समृद्ध काळाला 

चावा घेताहेत आतल्याआत इंगळ्या 

जंगलभर पसरताहेत विष 

मातृसत्तेच्या हातात

हवीय गोफन, तिरकामटा 

आणि 

कोणी भिडलाच तर

विजयाचा चीत्कार फोडायला हाकुमी"


अनिता, शांती, सायबी, बिनागुंडा, मंगले, संगिता जोगा मडावी, १३ एप्रिल २०२२, मालू कोपा बोगामी, तीन दिसांची ओली बाळंतीण, नदीमाय आदी कविता नुसत्या स्त्रीचित्रणात्मक नसून आजच्या स्त्रियांचे जळजळीत वास्तव आहे.



गाव, शेतीमाती आणि निसर्ग या घटकाकडे देखील कवीने पाठ केलेली दिसत नाही. जल, जमीन, जंगल या बरोबर कवीला गाव, शेतीमाती आणि निसर्गही तेवढाच महत्वाचा वाटतो. पण कंत्राट, पोलिस दादा, भांडवलदार यांनी या महत्वाच्या घटकाचीच होळी पेटवायला सुरुवात केलीय. त्यात सर्वसामान्य माणूस भयग्रस्त झाला. आणि त्यांना वाटू लागले, 


"किती तरी पसरलेत रंग

आमच्या नकाशाबाहेर 

तरीही 

आमच्या वाट्याला येतो

एकच रंग 

कित्येक सजीवांच्या मानगुटीतून

वाहणारा

'लालभडक...'


घनदाटपणाला लागलेलं पोलीस-नक्षल संघर्षाचं बिरूद हे स्थानिक आदिवासींसाठी जीवघेणे ठरणारे आहेत. जीव मुठीत कैद करून घनदाट जंगलातला माणूस आपली फिर्याद कोणाकडे करू शकत नाही. कारण

"आरोपी कोण अन् अडवतो कोण

वर्षानुवर्षे व्यवस्था का सोडत नाहीत मौन?"

हा सवाल त्यांच्या ओठावर नेहमी येत असतो. पण शेवटी

"ते येतात

जाळपोळ करतात 

निघून जातात 

इथला 

आदिवासी 

जळतच राहतो 

निरंतर..." 


आणि मग काय ? रस्त्यावर कितीही न्यायासाठी मांडले बस्तान तरी आंदोलनाला संशयीत आग लागते. अखेर त्याचा ठरलेला परिणाम उलट होतो. तो परिणाम कवी रोखठोकपणे कवितेतून मांडतो, 


"यहा बोलना मना हैं"

तरीही 

बोलत राहिलोच क्रांतीची भाषा 

तर 

तुम्ही कधीही होऊ शकता देशद्रोही" 


या परिणामांच्या चक्रव्यूहात पिचल्या जाणा-या आदिवासींच्या बाजूने कोण आहेत? तर कुणीच नाही. हे केवळ गडचिरोली किंवा दंडकारण्यापुरते मर्यादित नाही तर जागतिक पातळीवर आदिवासींची हीच उपेक्षा आहे. कवितासंग्रहाच्या पहिल्याच कवितेत सुरुवातीला कवी पहिल्यांदाच मोठा प्रश्न करून वाचकाला अंतर्मुख करून सोडतो. 


"काही वर्षांनी बदललाच अभ्यासक्रम 

तर

एफ फॉर फाईट 

आणि 

आर फॉर राईट

हे येईल का आमच्या अभ्यासक्रमात?"


दंडकारुण्य या संग्रहाचे महत्त्व इतकेच नाही की त्याने आदिवासी समाजाचे दु:ख सांगितले, तर त्याहून अधिक महत्त्वाचे हे आहे की या दु:खाला त्याने काव्यात्मक भाषेत विचाराचे आणि प्रतिकाराचे सामर्थ्य दिले. ही केवळ जंगलातील लोकांची कविता नाही; ही शहरात राहणाऱ्या प्रत्येक संवेदनशील माणसाच्या अंतर्मनात उमटणाऱ्या प्रश्नांची कविता आहे. अविनाश पोईनकर यांच्या कवितेला केवळ साहित्य म्हणून न पाहता, ती एक सामाजिक आणि राजकीय कृती आहे, हे लक्षात घेणं आवश्यक आहे.




‘दंडकारुण्य’: अविनाश पोईनकर

लोकवाङ्मय गृह, मुंबई, मार्च-२०२५

मुखपृष्ठ : सरदार जाधव 

किंमत २०० रु. संपर्क : ८४५४०४९०३६


••••


अस्मितेसाठीचा रोष, क्रोध आणि आक्रोशाची कविता : दंडकारुण्य











- दा.गो.काळे, शेगाव



अविनाश पोईनकर मुलनिवासी-आदिवासी माणसांच्या जल, जंगल व जमीन या मूलभूत हक्कांसाठी काम करणारे कार्यकर्ते कवी आहेत. २०१७ साली त्यांचा 'उजेड मागणारी आसवे' हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यात आपण म्हणून अभावग्रस्ततेचे प्रतिबिंब पडले होते. या असतेपणाला ओलांडून जाणारे दुसरेही जग अस्तित्वात आहे. ह्या सतत होत असलेल्या जाणिवांत 'दंडकारुण्य' तील व्यथा कुठेतरी दडलेल्या होत्या. त्याचा भावात्मक-करूणार्थ रिपोर्टाज म्हणजे ही कविता. हा रिपोर्टाज म्हणजे पत्रकारीतेतील ग्राउंड रिपोर्ट नाही. त्याला अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर एका कविने अनुभवलेला कारूण्याचा स्वर आहे. सौंदर्य गमावलेल्या लोकजीवनाचे त्यांच्या संस्कृतीचे अवशेष त्या कवितेला समृद्ध करीत जातात. कविता एकटी अनाथ कधीच नसते. तिला आपला इतिहास, संस्कृती, भाषा व समकालीन वास्तवाचे भान असते. लोकसंवेदना, वेदना आणि त्यातून आलेल्या विद्रोहाची भूमीही ती असते. आताच्या पार्श्वभूमीवर या कवितेचा विचार केला तर, 'दंडकारण्य' ऐवजी दंडक नावाचा राक्षस म्हणजे समकालीन व्यवस्थेचे प्रतीक मानता येतो. संर्वधन करणाऱ्या अरण्याऐवजी विस्थापित करणारे कारुण्य या कवितेच्या अनुषंगाने प्रतलावर आलेले आहे. त्या दृष्टीने कविने योजलेले 'दंडकारुण्य' हे शिर्षक अर्थपूर्ण आहे. या शिर्षकात कविता आणि तिच्या आशयाच्या जागा आहेत. त्या जागा शोधण्याची जबाबदारी म्हणून यातील कवी कार्यरत आहे. या पार्श्वभूमीवर कवी काय काम करीत असतो, याचे उत्तरही या कवितेतून मिळते.


कवी कवितेच्या माध्यमातून आपला म्हणून एक हस्तक्षेप नोंदवीत असतो. हा साहित्यादी कलांचा हस्तक्षेप म्हणजे मानवी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कसदार असे साधन असते. प्रत्येक काळातील सामाजिक अवस्थांचे दस्ताऐवजीकरण या कृतीतून सतत होत आलेले आहे. त्यादृष्टीने सतत संदर्भांचे भान ठेवून वर्तमानकाळ उसविणारी मानवी स्थित्यंतरांची सतत प्रगतणारी ही अवस्था म्हणता येते. त्यातून समकालीन समाज व्यवस्थेचे एक प्रारूप आपल्या समोर ठेवण्याची एक जबाबदारी साहित्याने पेललेली आहे. साहित्यातील विविध सामाजिक संदर्भातून प्रकटणा-या मानवी अवस्थांमधून आजच्या वर्तमानकालीन स्थितीगतीचा, त्याच्या असतेपणाच्या दिशा कळलेल्या आहेत. या विचारांमधून आलेल्या स्वतंत्र जाणिवांनी एका व्यवस्थेने नाकारलेले माणूसपण परत मिळविलेले आहे. हा इतिहास आहे. शब्द जेव्हा नकारांचे शस्र बनतात त्यावेळी ते आपली कृतीच करीत असतात. त्यातूनच होत असलेल्या अन्यायाची, नाकारलेपणाची जाणीव निर्माण झालेली असते. म्हणून साहित्यादी कलामधील निर्मिती अभिव्यक्तीचे साधन असले तरी, त्यातून आलेल्या कृतीशीलतेत परिवर्तनाच्या शक्यता अधिक असतात. ही गोष्ट नाकारता येत नाहीत. त्या दृष्टीने या परिवर्तनशील कवितेकडे पाहता येते. कारण ही कविता शब्दांचे अर्थ उबवीत बसलेली संहिता नाही. तिचा जाहिरनामा कृतीशील अशा शब्दांत सामावलेला आहे. येथे शब्द एकटे नाहीत. सामान्य माणसांतील आवाजांच्या प्रतिध्वनीत ते आहेत. म्हणून ही कविता आहे.


"चहूबाजूंना बारमाही नद्या वाहताहेत, 

आम्हाला प्यायला पाणीच नाही. 

डोंगराआडून पायपीट करून आलोय 

खायला अन्न, झोपायची सोय नाही 

कलावंतांच्या आक्रोशाकडे केला कानाडोळा

बोलणा-यांना लावून दिलं ' ... वादी' लेबल. 

माडिया महोत्सवात 'माडीया' आलेच नाही 

तरी फरक पडत नसतो कुणालाही."


असे भयकोंडीचे वास्तव व्यवस्थेने निर्माण केले आहे. आम्ही येथील पर्यावरण वाचवतो. येथील निर्मितीच्या स्रोताला जपणारे हात आमचे आहेत. तरीही त्याचा उपभोग घेण्याचे स्वातंत्र्य आमचेकडून हिसकावून घेतल्या जात आहे. तुमच्या मुख्य प्रवाहात आमच्या संस्कृतीचा लोप होत आहे. आमच्या हस्तक्षेपाच्या अधिकाराचे हनन होत आहे. आमच्या संदर्भात आवाज उठवणा-या कलावंतांचा आक्रोश व काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या वादाचे लेबल लावून बदनाम केल्या जात आहे. ही आजची स्थिती आहे. वनवासी प्रश्नांना साद घालणारे आवाज अवरूद्ध करण्यात आले आहेत. वनवासींना मुख्य प्रवाहात आणणे म्हणजे, त्यांची संस्कृती, त्यांच्या बोली, रोजगार निर्माण करणाऱ्या जंगलाचे वैभव, वनौपजाचे बाजारीकरण करणे म्हणजे, त्यांच्या परंपरागत खाद्यसंस्कृती नाकारून प्रत्यक्षात भूकेचा अधिकार हिरावून घेण्यासारखा आहे. कारण परंपरागत अन्न व्यवस्था नाकारणे म्हणजे जाणूनबुजून कुपोषणाला बळी पाडण्यासारखे आहे. हा सगळा फंडा तेथील खनीज संपत्ती लुटण्यासाठी चाललेला अट्टाहास आहे. सरळ सरळ भांडवली व्यवस्थेला, कार्पोरेट कंपन्यांना आपली स्पेस निर्माण करून देणे होय. त्यातून आदिवासींच्या विस्थापनाचे मार्ग जातात. व्यवस्थेच्या ह्या विकासाच्या संकल्पनेत आमच्या मूलभूत अशा जीवनजाणिवांना मुठमाती देणे आहे. निसर्गाच्या चलनवलनात त्यांच्या असतेपणाचे प्रतिबिंब पडलेले आहे. ह्या गोष्टी विसरता येत नाही. विकासाच्या मुख्य प्रवाहात लोप होणारे अस्तित्व त्यांना जगू देणारे नाही.


"आम्ही पूजतो नद्या, नाले, डोंगरांना.

आम्ही पूजतो पाने-फुले-फळे-झाडांना. 

आम्ही पूजतो निर्मिकाच्या सजीव सृष्टीला. 

आम्ही पूजतो दैवत म्हणून आमच्या पूर्वजांना. "


ह्या कवितेचे अर्थ मुख्य प्रवाहातील तथाकथित दैववादी संस्कृतीला नाकारणारे आहे. सृष्टीत जिवंत असणारे सगळे स्रोत म्हणजे त्यांच्या जीवनाकडे जाणारे मार्ग आहेत. ते अदृश्य नाहीत. त्यांच्या निर्मिकाच्या संकल्पना सगुण अशा परंपरांना जवळ जाणाऱ्या आहेत. महात्मा फुले सारख्या सुधारकांच्या विचारांची मूळं आदिवासींच्या संस्कृतीत सापडतात असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही. पोथ्या-पुराणांमधून रचलेल्या मिथकांऐवजी आपल्या पूर्वजांना दैवत मानणारी संस्कृती नक्कीच नव्या विचारांची असेल यात शंका नाही. परंतु आज व्यवस्थेने मांडलेला खेळ आपल्या हक्कासह जगणे हिसकावून घेणारे आहे. आज त्यांच्या वाट्याला काय आले आहे?


" जीव मुठीत कैद असतो 

मांडू शकत नाही फिर्याद 

मागू शकत नाही दाद 

सभोवताल विणलयं खब-यांचं जाळं " 


ह्या जीवघेण्या वास्तवातून आजचा आदिवासी काफीला जात आहे. आदिवासी म्हणून त्यांचे संविधानिक अधिकार हिरावून घेतल्या गेले आहेत. त्यांच्या जगण्यासाठीच्या मूलभूत हक्कावरच टाच येत असेल तर, त्यांच्या स्वातंत्र्याच्या संकल्पना कोणत्या व्यवस्थेने अवरूद्ध केल्या आहेत. दगडाने ठेचलेल्या नाळेसारखा त्यांचा जन्मच ठेचल्या जाणारी परिस्थिती आहे. प्रत्यक्षात जीवनाची होळी झालेली आहे. ही गोष्ट विसरता येत नाही. त्यासाठी लढण्याचा आशावादही त्यांच्यात नाही, असे म्हणता येत नाही.


" हमारे गाव में हमारा राज

जल-जमीन-जंगल हमारा है l "

हा आशावाद जिवंत असला तरी तो केवळ हद्दीपुरताच ऐकू येतो. त्यांच्यासाठी प्राणपणाने काम करणाऱ्या अरूंधती राॅय, महेश राऊत सारख्या समाज सेवकांना देशद्रोही ठरवले जाण्याची परिस्थिती आहे. या अवकाशात जगणाऱ्या बायांचे दुःख पिळवटून टाकण्यासारखे आहे. आपण जगत आहोत की, नाईलाजाने हे जगणं ओढत आहोत. या सगळ्या वेदनांची लक्तरे या कविने वेशीवर टांगली आहेत. 


" बाळंतपणाच्या वेदनांनी जितकं सोललं शरीर

त्याहून दुप्पट रोजनिशी सलत राहते 

कुरूप झालेल्या पायात खंडीभर काटे 

रस्ते हरवलेले पाय आपोआप फसतात रोवणीत "


तसे या व्यवस्थेच्या रोवणीत सगळ्या आदिवासींचे जगणे फसले आहे. त्यांना बाहेर काढण्याचे रस्ते त्यांच्यापर्यंत जावू देणारे नाही. तरीही एक कवी म्हणून, सामाजिक बांधिलकी समजून एक आपला हस्तक्षेप ठेवण्याचा प्रयत्न हा कवी करतो आहे. हा हस्तक्षेप फक्त वरवरचा नाही. हा बंद पुस्तकातील आवाज नाही. हा कवी म्हणजे व्यवस्थेकडे निर्देश करणारे उघडे पुस्तक आहे. त्यांच्या जगण्यात ह्या कवितांचा अंश सापडतो. त्या दृष्टीने ही कवितांची वही कोरडी नाही. त्यांच्या जगण्याला समांतर गेली आहे. कवितेसाठी खूप खूप शुभेच्छा.



‘दंडकारुण्य’: अविनाश पोईनकर

लोकवाङ्मय गृह, मुंबई, मार्च-२०२५

मुखपृष्ठ : सरदार जाधव 

किंमत २०० रु. संपर्क : ८४५४०४९०३६

--------------------------------

दंडकारण्यातील आदिवासी बांधवाच्या जीवनाचं खरंखुरं धगधगत वास्तव : दंडकारुण्य

- राजू गरमडे, चंद्रपूर कवीमिञ, मुक्तपञकार, सामाजिक युवा कार्यकर्ते, आदिवासी भागात जाऊन कार्य करणारे अविनाश पोईनकर एका कार्यक्रमामध्ये भेटले....