बुधवार, 28 मई 2025

दंडकारण्यातील कुरूपकांड : ‘दंडकारुण्य’






- डॉ.प्रमोद मुनघाटे

जेष्ठ समीक्षक, नागपूर 

मोब. 7709012078





‘दंडकारुण्य’ हा अविनाश पोईनकर यांचा कवितासंग्रह. ‘दंडकारण्य’वरून ‘दंडकारुण्य’. दंडकारण्य हे भारतातील एका प्राचीन सांस्कृतिक संघर्षाचे प्रतीक आहे. उत्तरेकडील आर्यावर्त आणि दक्षिणेकडील दंडकारण्य यांच्यातील प्राचीन संघर्ष आजही नव्या स्वरूपात आहे. या संघर्षाचीच किती तरी रूपे पोईनकर यांच्या या संग्रहातील कवितांमधून प्रकट झाली आहेत.    


दंडकारण्य आणि ‘आर्यावर्त’ या संघर्षाचे वर्णन आजच्या वैचारिक भाषेत ‘डावे विरुद्ध उजवे’ असेही करता येईल. ‘उजव्या’ या विशेषणात ज्या धार्मिक कट्टरतेच्या, असहिष्णुतेच्या आणि वांशिक भेदभावाच्या छटा आहेत, त्या इथे अभिप्रेत आहेतच. आणि ‘डाव्या’ मध्ये या देशातील शोषित-पीडिताच्या बाजूने लढणाऱ्या संघटना, वर्गसंघर्षावरील त्यांचा विश्वास आणि अंतिम क्रांती याही गोष्टी जशाच्या तशा गृहीत आहेतच.        

        

भारताच्या मध्यभागातील दंडकारण्य (बस्तर आणि अबूझमाडदेखील) हे दक्षिणेचे प्रवेशद्वार. दंडकारण्यावर एकेकाळी रावणाचे राज्य होते. संशोधकांच्या मते, रामायणातील राम-रावण संघर्ष म्हणजे उत्तरेतील आर्य आणि दंडकारण्यातील आदिवासी यांच्यातील संघर्ष होय. रामाच्या रूपाने अनार्यांनी दंडकारण्यात अतिक्रमण केले आणि आपले साम्राज्य प्रस्थापित केले. दंडकारण्यात आजही आदिवासी जमातींकडून रावणाचे पूजन केले जाते. रावणाची मंदिरे आहेत. तो त्यांचा प्राचीन राजा म्हणून आजही त्याची कीर्ती गातात. रामायणात आर्यांसोबत राक्षस, वानर, निषाद, शबर, यक्ष, या जमातींचा उल्लेख येतो. या जमातींचे दंडकारण्यातील आजच्या आदिवासींशी कोणते नाते आहे, हेही मानववंशशास्त्रज्ञ सांगतात. त्यामुळे राम-रावण असे संघर्षाचे एकरेशीय स्वरूप बदलून गुंतागुंतीचे झाले आहे. ही गुंतागुंत ‘दंडकारुण्य’ संग्रहातील कवितांमधून अविनाश पोईनकर व्यक्त करू पाहतात.


दंडकारण्यातील भामरागड-सुरजागडमध्ये आज कॉर्पोरेट कंपनीच्या लोखंडखाणीशी तेथील आदिवासींचा संघर्ष सुरू आहे. प्राचीन काळात आर्यांच्या आक्रमणात क्षत्रियांसोबत ऋषीमुनी होते. आज कॉर्पोरेट कंपनीशी राजकीय सत्ता आहे. यामुळे संघर्ष सोपा नाही. प्राचीनकाळी धार्मिक पुराणे आदिवासींच्या कुरूपतेचे काव्य रचत असत, वर्तमानकाळात ती जागा वेबसाईट आणि कॉफीटेबल बुक्सनी घेतली आहे. आदिवासींजवळ काय आहे? काहीही नाही. शहरी नक्षलवादी म्हणून तोंड बंद झालेले विचारवंत आणि पत्रकार आहेत. नक्षल्यांचे खबरे म्हणून पकडले जाण्याच्या भयाची टांगती तलवार आहे. बाकी काही नाही.       

              

असलेच तर अविनाश पोईनकर सारख्या कवींच्या कविता आहेत. त्याच्या कवितेत दंडकारण्यातील आदिवासींच्या करुण कहाण्या आहेत, म्हणून त्याच्या संग्रहाचे नाव ‘दंडकारुण्य’ आहे. या कवीच्या कविता म्हणजे त्याचे स्वगत आहेत; किंवा विचारलेले प्रश्न. पण त्या प्रश्नांच्या उत्तराची हा कवी अपेक्षाही करीत नाही. कारण त्या प्रश्नोत्तरांची एक्सपायरी डेट कधीचीच संपली आहे. तो विचारतो, 


“दंडकारण्यातील

सागाने

ऐटीत नटलेय 

लंडनचे महाल. 

अयोध्येत

साकारलेय दिव्य राम लल्ला मंदिर

आणि कवाडांना सुटलाय सुगंध

याच मातीतील लाकूडफाटांचा. 

संसद भवनात

प्रवेश करताना नमन व्हावंच लागतं 

आमच्या संपदेतून साकारलेल्या दरवाजांपुढे. 

आमच्या दंडकारण्यातील 

कारुण्याची 

तुम्ही कशी ठरवू शकता किंमत?”


हे एकीकडे आणि दुसरीकडे चित्र पुढीलप्रमाणे आहे:


“साहेब, 

रिकाम्या हाताने आले 

जाताना ट्रकभर सामान घेऊन गेले.

साहेबाला नसतो कुठलाच नाका आणि टी. पी. 

मंगरूने तोडली 

खाटेसाठी एक सागाची डेर 

अन तस्कर आरोपात त्याचा आरपार बी. पी.” 


‘दंडकारुण्य’मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील जंगलातील आदिवासींच्या शोषणाची चित्रे आहेत. त्यांच्या जखमा आणि वेदनांची अनेक रूपे आहेत. तेथील आदिवासींचे जीवन त्यांचे उरले नाही, ते नक्षलवादी, पोलीस, सरकार, नेते, माध्यमे आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या हातातील खेळणे झाले आहे. त्यांच्या जीवघेण्या खेळात तेथील गोंड-माडियांचा श्वासच कोंडला गेला आहे. विकासाचे जोखड आदिवासींच्या जन्मावरच उठले आहे. कवी लिहितो, 


“बुकलू 

तुझ्या जन्माची गोष्ट 

तू नाही विसरू शकत.

तेव्हाही तुझी नाळ 

दगडाने ठेचली होतीस 

आता 

तुझा जन्मच ठेचला जातोय.”


किंवा 


“जणू 

भयभीत 

देहाचीच झालीय लाकडं 

आणि

जो तो पेटव पाहतोय 

आमची होळी”


आदिवासींच्या आजच्या लोकमानसाची ही वेदना आहे. त्यांच्या भोवतालचे ‘व्यवस्थे’चे जाळे इतके गुंतागुंतीचे आहे की कोण आपला आणि कोण शत्रू हेही त्यांना ओळखता येत नाही, आणि फिर्यादही कुठे करता येत नाही.  


“जीव मुठीत कैद असतो 

मांडू शकत नाही फिर्याद 

मागू शकत नाही दाद  

सभोवताल विणलंय खबऱ्यांचं जाळं 

यात अडकलाच 

कोणी निरपराध  

तर हातात बेड्या ठोकतील 

किंवा 

नसांतून उडतील लालभडक फव्वारे.”


ही फिर्याद कशाची आहे? आदिवासींचे अस्तित्वच संपल्याची. आज गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथील डोंगरं लाल-लाल माती आणि चिखलाने विद्रूप आणि कुरूप झाले आहेत. त्या लाल लाल रक्ताने तेथील आदिवासींच्या वस्त्यांना वेढा घातला आहे. कवी लिहितो, 


“खदाणीत 

अख्खा डोंगर गेला आमचा 

पूर्वज दैवतांच्या जागा, झाडं, कंदमुळं 

अहो पोट गेले आमचं 

रानोमाळ भटकणारे 

खदाणीच्या खड्ड्यात 

करतील उदरनिर्वाह?

आदिम जगण्याच्या नोंदी 

जर टिपता आल्या तुम्हाला 

तर सांगावं,

आमचं वैभव भकास करून 

खदाणीने जगात विकास कुठे झाला ?”    


एकूण ‘विकास’ हा या दंडकारण्यातील आजचा कळीचा मुद्दा आहे. आदिवासींना विकास हवा की नको कोणी विचारत नाहीत. सरकार आणि सत्ताधारीच ठरवतात विकासाची आवश्यकता आणि रुपरेषा. त्या निमित्त केलेल्या ‘इव्हेंट’मध्ये आदिवासींच्या मुली फक्त स्वागतगीतासाठी नाचवल्या जातात. त्याचे फोटो सर्वत्र प्रसिद्ध होतात. पण खाणींच्या विरोधात तीनशे दिवस उपोषण करणाऱ्या आदिवासींची दखल कोणतेच माध्यम घेत नाही आणि कोणताच पुढारी तिथे जात नाही. म्हणूनच अविनाश पोईनकर यांच्या ‘दंडकारुण्य’ला महत्त्व आहे. या कवितांचे महत्त्व वाङ्मयीन नसून राजकीय आणि सामाजिक आहे. कारण ‘दंडकारुण्य’च्या केंद्राचा अवकाश राजकीय आणि सामाजिकच आहे. कोणतेही वाङ्मय हे एक प्रकारे राजकीय कृतीच असते, या अर्थाने ‘दंडकारुण्य’हे संपूर्ण राजकीय कृतीच आहे. 


            

 ००      

‘दंडकारुण्य’: अविनाश पोईनकर

लोकवाङ्मय गृह, मुंबई, मार्च-२०२५

मुखपृष्ठ : सरदार जाधव 

किंमत २०० रु. संपर्क : ८४५४०४९०३६

'दंडकारुण्य'चे चित्कार




- नारायण लाळे, मुंबई 

मो. 9987924199






ज्या कविता संग्रहाचे शीर्षक उल्लेख करण्या इतके समर्पक आहे, मुखपृष्ठही संग्रहातील कवितांशी समरस झालेले आहे, संग्रहही जिवंत कवितांनी भरलेला आहे आणि ज्या संग्रहाला सशक्त विचारांची पाठराखण लाभलेली आहे, असा एक कवितासंग्रह माझ्या हाती आला आहे. त्या कवितासंग्रहाचे नाव आहे 'दंडकारुण्य'. या संग्रहाचे कवी आहेत अविनाश पोईनकर. संग्रहाचे मुखपृष्ठ केले आहे चित्रकार सरदार जाधव यांनी आणि संग्रहाची पाठराखण केली आहे, सुप्रसिद्ध कवी, सामाजिक कार्यकर्ते वाहरू सोनवणे यांनी. चांगले संग्रह निघत नाहीत किंवा चांगली कविता वाचायला मिळत नाही, अशा तक्रारींना 'दंडकारुण्य' हे बिनतोड उत्तर आहे! 

या कवितासंग्रहाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे, 'दंडकारुण्य'चा कवी अविनाश पोईनकर हा केवळ कवी नाही, तर तो एक धडाडीचा कार्यकर्ताही आहे. कवी आणि कार्यकर्ता असे एक अद्वैत संग्रहातील कविता वाचताना लक्षात येते. मराठी काव्य क्षेत्रात असे उदाहरण क्वचितच दृष्टीस पडते. दंडकारण्यातील आदिवासी भागातून हा कवी गेले कित्येक वर्ष मुक्त भटकंती करतो आहे. आदिवासींच्या सुखदुःखात समरस होतो आहे. त्यांचे रीतीरिवाज, कायदेकानून, अनुभवलेले जंगलविश्व, आदिवासींवर होणारे अत्याचार, त्यांच्यावर होणारे शहरी आक्रमण याचा समक्ष शोध घेतो आहे. अविनाश पोईनकर स्वतः एक चांगला कवी असल्यामुळे आदिवासींचे कारुण्य तो कवितेमधून मांडतो आहे. त्याचा हा कवितानुभव ऐकीव गोष्टींवर किंवा वर्तमानपत्रातील बातम्यांवर किंवा सरकारी फतव्यांवर बेतलेला नाही. आदिवासींचे जगणे अनुभवणारा हा कवी आहे. इतकेच नव्हे, तर कविता लिहून अरण्यरुदन करीत न बसता, तो 'कुठल्याशा शहरी फ्लॅटच्या कोपऱ्यात चिडीचुप बसलेल्या, शिकून सवरलेल्या' शहरी उदासीनतेला चेतावणी देतो आहे. शहरी जगण्याला आवाहन करतो आहे.

खरा कवी बैठक मारून कविता लिहीत नसतो किंवा चोवीसतास कविताच लिहीत नसतो. इतर वेळेस खरा कवी काय करतो किंवा त्याने काय करायला पाहिजे, याचा उद्गार या संग्रहातून ध्वनीत झालेला दिसतो. कवीने आपल्या उर्वरित वेळात कार्यकर्ता म्हणून जगणे गरजेचे आहे. संग्रहातील मनोगतात हा विचार अविनाश पोईनकर यांनी व्यक्त केला आहे आणि स्वकृतीने सिद्धही केला आहे. संग्रहातील, आदिवासींच्या सुखदुःखाला अधोरेखित करणाऱ्या कविता विध्वंसक मार्गाने न जाता तथाकथित शहरी डोळ्यांमध्ये अंजन घालणाऱ्या आहेत. मानवी चेतना जागवणाऱ्या आहेत. 

संग्रहातील कुठल्याही कवितेला शीर्षक नाही. शीर्षकाच्या चौकटीत या संग्रहातील कविता बसत नाहीत. कारुण्याला आणखी कुठले शीर्षक देणार? बहुधा या उद्देशानेच संग्रहाचे 'दंडकारुण्य' हे शीर्षक प्रत्येक कवितेला समर्पक ठरते.

निसर्गाने ज्यांना जगणे शिकवले त्या आदिवासींचे सुखदुःख सांगणाऱ्या या कवीता आहेत. या कविता आभासी नाहीत किंवा कुठली पोझ घेऊन लिहिलेला नाहीत. या कवितांमध्ये आदिवासींच्या दुःखाचे चित्कार आहेत. त्याच वेळी आदिवासींच्या श्रीमंतीची गोष्टही ही कविता स्वाभिमानाने सांगते. आणि 'एफ फॉर फाईट आणि आर फॉर राईट' या अभ्यासक्रमाची प्रतीक्षा करते. वेदनांचे भांडवल करणाऱ्या या कविता नाहीत, तर ज्यांच्या दारात कधी सावली पडली नाही त्या दारातले कारुण्य टिपणाऱ्या या कविता आहेत. 'दंडकारुण्य'मधील कविता अल्पाक्षरी असली, तरी 'कारुण्याची तुम्ही कशी ठरवू शकता किंमत?' किंवा 'धाक बंदुकीचा / दंडकारण्यात / कोणत्या युद्धात / कोण आहे?' व्यवस्थेतच्या अंगावर चालून जाणारे काही प्रश्न या कवितेने उभारले आहेत. दुर्गी, बिजुला, गुत्तो, जन्नी, गोई या आदिवासी स्त्रीशक्तीचे कर्तुत्व सांगतानाच कवी त्यांना सावध करतो आहे आणि 'मातृसत्तेच्या हातात / हवीय गोफन, तिरकामटा' अशा तयारीचा इशाराही देतो आहे. 'दंडकारुण्य' मधील बऱ्याच कविता आदिवासींचे व्यक्तीचित्रण करणाऱ्या आहेत. त्यानिमित्ताने आदिवासींवर येणारी संकटं, त्यांची होणारी फसवणूक, त्यांनी केलेला विरोध, त्यांचे बलिदान, अनेक जखमा घेऊन त्यांचे जगणे, अशा आदिम होऊ लागलेल्या प्रश्नांना अविनाश पोईनकरच्या कवितेने बाणाच्या टोकावर आणून ठेवले आहे. हा बाण 'दंडकारुण्य' वस्तीतील आदिवासींचा आहे.

कवी, कार्यकर्ता अविनाश पोईनकर आणि त्याच्या कुटुंबीयांनी आदिवासींच्या कारुण्यावर फुंकर घालण्याचे निरपेक्ष, अथक प्रयत्न चालवले आहेत, त्याला यश प्राप्त व्हावे, ही सदिच्छा. अविनाशच्या हातांना आणखी काही कवीकार्यकर्त्यांचे हात लाभोत, ही आशा.












••••


दंडकारूण्य । अविनाश पोईनकर

 लोकवाङ्मय गृह प्रकाशन, मुंबई 

▪ पाने : ९२ । किंमत : २००/- 



▪अमेझॉन लिंक : https://www.amazon.in/dp/9393134618

▪ ऑनलाईन खरेदीसाठी वेबसाईट लिंक : https://lokvangmaybooks.in/product/%e0%a4%a6%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a5%a4-%e0%a4%85%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b6-%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%88%e0%a4%a8/

▪ संपर्क : ८४५४०४९०३६ । ०२२-२४३७६०४२


••••


शुक्रवार, 23 मई 2025

गडचिरोलीच्या श्रीमंत जंगलावर कोट्याधिशांनी केलेल्या बलात्काराचा पंचनामा







- डॉ. योगेश दूधपचारे

 (पर्यावरणीय कार्यकर्ता, ग्रीन प्लॅनेट सोसायटी, चंद्रपूर)


••


गडचिरोलीच्या जंगलांची श्रीमंती जगविख्यात आहे. या श्रीमंतीची लूट ब्रिटिश काळातच सुरू झाली आहे. लंडनच्या बंकिंघम पॅलेसला वापरलेला लाकूड त्या काळात इथूनच नेण्यात आला. ब्रिटिश काळातच सुंदर लाकडामुळे या जंगलाला 'ग्लोरी ऑफ आलापल्ली' असे सार्थ नाव मिळाले. आधुनिक काळात सुद्धा भारताच्या संसदेची नवीन इमारत बनली तेव्हा सरकारला गडचिरोली जिल्ह्यातील सागवानाचीच आठवण झाली. प्रभू श्रीरामाचे मंदिर जेव्हा बनले तेव्हाही मंदिरातील दरवाजांसाठी लाकूड हवा होता, तेव्हा दंडकारण्यातील याच श्रीमंत जंगलांनी प्रभू श्रीरामाच्या मंदिराला साथ दिली. परंतु या जंगलांची श्रीमंती आणि सुंदरता धनाड्यांच्या डोळ्यात खुपली. श्रीमंतांनी गरिबांच्या या सुंदर जंगलांवर कायदेशीर 'बलात्कार' केला आहे. देशभरातील जंगलांवर हा श्रीमंतांचा आणि उद्योजकांचा बलात्कार भविष्यातही होतच राहावा, यासाठी आता कायदेच बदलविले गेले आहेत. गडचिरोलीच्या जंगलांचा झालेला हा खून इतका मोठा आहे; की दक्षिण गडचिरोलीतील सर्व नद्यांचे पाणी जंगलांच्या रक्ताने लाल झाले आहे. वनविभागाला सोबत घेऊन आणि कायद्याचा स्पष्ट आधार घेऊन  श्रीमंतांनी  गडचिरोली जिल्ह्यातील जंगलांच्या केलेल्या खुनाचा 'पंचनामा' चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासींचे अभ्यासक, मुख्यमंत्री फेलोशिप मिळविलेले स्कॉलर, अविनाश पोईनकर यांनी त्यांच्या 'सुरजागड : विकास की विस्थापन?' या पुस्तकात मांडला आहे. या संशोधन पुस्तकाला प्रा.सुरेश द्वादशीवार यांनी दिलेली प्रस्तावनेत सरकारचा वन संरक्षणातील नाकर्तेपणा, या भागात येणाऱ्या इतरही लोखंडाच्या खाणी आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या रेखाटल्यात. आदिवासींचा आणि लोकांचा आवाज उजागर व्हावा, ही भूमिका लेखकाने मांडली. नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ.कुमार सप्तर्षी, मानवाधिकार कार्यकर्ते एड.असीम सरोदे, समीक्षक डॉ.प्रमोद मुनघाटे या आधुनिक काळातील समाजसुधारकांनी आणि कार्यकर्त्यांनी या पुस्तकाला पाठबळ लिहिलेले आहे.


संपूर्ण भारतभर पर्यावरणाच्या संदर्भात निर्माण झालेल्या समस्या, विविध राष्ट्रीय उद्यानात आणि व्याघ्र प्रकल्पात सुद्धा खोदल्या जाणाऱ्या कोळशाच्या, डोलोमाईट, लाईन स्टोन, युरेनियम, लोखंडाच्या खाणी या सगळ्यांचा तेथील पर्यावरणावर, जंगलांवर आणि वन्यजीवांवर वाईट परिणाम होतोच. पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकनात या सर्व गोष्टींची बारीक सारीक तपासणी होते. परंतु अशा प्रकल्पांचा आणि खाणींच्या परिसरातील आदिवासींवर आणि लोकांवर कसा परिणाम होतो, याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. कायद्यानेच आता विविध खाणींचा 'सामाजिक प्रभाव मूल्यांकन'  करून घेणे आवश्यक आहे, हे शासनाचेच काम आहे. शासनाने ते काम न केल्यामुळे अविनाश पोईनकर या संशोधकाच्या पुस्तकरुपी प्रभाव मूल्यांकनाला मोठे महत्त्व आले आहे. लेखक अविनाश पोईनकर यांनी या पुस्तकातून खाणींचा आदिवासींच्या जगण्यावर होणाऱ्या परिणामांचा खोलवर पंचनामाच केलाय. या पंचनाम्यात भारताच्या स्वातंत्र्य युद्धात येथील आदिवासींचे योगदान, आदीम माडिया आदिवासींची संस्कृती, त्यांचे आराध्य दैवत ठाकूरदेव यांची हिसकावलेली जमीन, सामूहिक वन हक्काचे दावे आणि सुरजागडची खाण, पेसा कायद्यातील तरतुदींचा झालेला खून, ग्रामसभेचे हिसकावलेले अधिकार, आदिवासी महिलांचे होणारे लैंगिक शोषण, या भागातील विकली गेलेली पत्रकारिता, लोकप्रतिनिधींची निष्क्रियता आणि जनतेचे जगण्याचे प्रश्न असे विविध मुद्दे या पंचनाम्यात मांडले आहेत. भारताच्या विविध भागात विकासाच्या नावाखाली आदिवासींची जमीन हिसकावली गेली आहे. मागील शेकडो पिढ्यांपासून ज्या जंगलामध्ये आदिवासी निवास करीत आहेत, ज्या डोंगरांची ते पूजा करीत आहेत; त्याच जमिनीत ते आता 'ट्रेसपासर्स' बनले आहेत. त्यांच्या स्वतःच्या जमिनीवर ते आता पाय ठेवू शकत नाहीत. त्यांच्यावरच चोरीचे आरोप लावले जात आहेत. शांततापूर्ण मार्गाने धनाड्यांच्या या कायदेशीर बलात्काराला त्यांनी विरोध केला. अनेक दिवस सत्याग्रह, उपोषणे केलीत. परंतु आदिवासींचा आवाज गडचिरोलीच्या जंगलांतून २५  गावांच्या बाहेरही जाऊ शकला नाही. धनाड्यांनी त्यांचा हा आवाज नोटांच्या वजनाखाली दाबून टाकला. एखाद्या बंदिस्त कोठडीतून एखाद्या अत्याचारित स्त्रीची अब्रू वाचवण्यासाठी तिने केलेली केविलवाणी आर्त हाक ऐकू यावी, अशीच काहीशी स्थिती अविनाश पोईनकर यांनी शोधपत्रकारितेच्या अंगाने या पंचनाम्यात मांडली आहे. 


१९७२ च्या सुमारास भारतात चंडीप्रसाद भट्ट आणि सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वात 'चिपको' आंदोलन झाले. या आंदोलनात जंगलातील लोकांचा विजय झाला. या घटनेने स्फूर्ती घेऊन दक्षिण अमेरिकेत 'चिको मेंडीस' चे आंदोलन झाले, आफ्रिकेत वंगारी माथाई हिने वृक्षारोपणाची चळवळ उभी केली. एकीकडे भारतातील पर्यावरणीय चळवळींच्या नोंदी जागतिक स्तरावर घेतल्या जात असताना अचानक मागील काही वर्षांत भारतात सगळेच काही बदललेले दिसून येत आहे. आदिवासींचे हित जोपासण्यासाठी तीस वर्षांपूर्वी 'पेसा' हा कायदा आणला गेला. भारतीय घटनेची निर्मिती होतानाच पाचव्या व सहाव्या अनुसूचीची निर्मिती केली. अनुसूचित क्षेत्रातील लोकांना विशेष अधिकार दिले गेलेत. हे कमी होतात म्हणून पुन्हा २००६ ला वनाधिकार कायदा आणला गेला. आदिवासी माणसाला 'माणूस' म्हणून उभे करण्यासाठी या सगळ्या गोष्टीं त्यांना कायद्याने आणि घटनात्मक मार्गाने देण्यात आल्यात. परंतु या सर्व गोष्टी आत्ता हिसकावण्याचे दिवस आले आहेत, असे दिसते. गडचिरोलीच्या आदिवासींना आधीच या कायद्यांची आणि त्यांच्या अधिकारांचीही माहिती नाही. सुरजागड परिसरातील बऱ्याच आदिवासींनी अजूनही गडचिरोली पाहिली नाही. शंभर-दोनशे वर्षांच्या पूर्वी होणारी वस्तूंची देवाण-घेवाण करून ते आपला चरितार्थ आजही चालवतात. अशा अडाणी आणि अत्यंत गरीब लोकांना पैशांचे आमिष दाखवले जात आहे. त्यांच्या अडानपणाचा सौदा केला जातो आहे. काहींना दहा हजार रुपये महिन्याची सेक्युरिटी गार्डची नोकरी दिली जात आहे. अत्यंत गरीब आदिवासींना दहा हजार रुपये सुद्धा जास्त वाटतात. लोखंडाच्या खाणी आणि त्या खाणींचे मालक संपूर्ण जिल्हाच विकत घेऊ शकतील, एवढ्या ताकदीचे आहेत. त्यांच्या जबड्यात गरीब वर्ग अडकला आहे. त्यांच्यातीलच काही शिकलेल्या लोकांनी त्यांच्या मानवीय अधिकारांची बाजू मांडली. लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारला, पत्रकारांना त्यांचा आवाज जगापुढे मांडायची विनंती केली, न्यायालयात याचिका दाखल केली, जागतिक मानवी हक्क परिषदेत येथील आदिवासींचा आवाज मांडला, परंतु हे सर्व प्रयत्न व्यर्थ होताना दिसत आहेत. दररोज सुरजागडचे डोंगर पोखरले जाते आहे. पर्यावरणीय मंजुरी नसताना सुद्धा तब्बल १२ वर्षापर्यंत  ही खाण सुरूच राहिली. शासनाच्या कोट्यावधी रुपयांचा महसूल कंपनीने बुडवला. तरीही जिल्हा प्रशासन, पर्यावरण मंत्रालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या मोठे जबडे धारकांचे काहीही करू शकले नाही. यांच्या जबड्यात फक्त गरीब आदिवासीच नाहीत, संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सुद्धा आहे, हे लेखक अविनाश पोईनकर यांनी मांडलेल्या पंचनाम्यातून स्पष्ट होते. 


या पंचनाम्यातून आणखीही एक गोष्ट स्पष्ट होते; लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या मागायचे दिवस गेले आहेत. याच जंगलाला वाचवण्यासाठी कर्मयोगी बाबा आमटे यांनी यशस्वी आंदोलन केले होते. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी निशस्त्र आंदोलन केले आणि ब्रिटिशांनाही नमते व्हावे लागले. जवळच्या चंद्रपूर मधील लोकांनी आंदोलन केले आणि त्यांनी ताडोबाला वाचवले. सत्याग्रह आणि आंदोलन करायचे दिवस गेलेत, कारण आता सरकार ऐकून घेत नाही; असे या पंचनाम्याला वाचल्यानंतर समजते. आदिवासींचा आवाज ऐकू नका, आदिवासींच्या दुःखाकडे पाहू नका, त्यांच्या जंगलांच्या संरक्षणासाठी काहीही बोलू नका, ही भूमिका जिल्हा प्रशासन आणि राज्यकर्त्यांनी घेतली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गडचिरोली मध्ये असताना खाणींविरोधात येथील १०० गावातील ७०० पेक्षा जास्त आदिवासींचे आंदोलन सुरू होते. आदिवासींच्या या आंदोलनाकडे त्यांनी ढुंकूनही पाहिले नाही. ह्या वेदना आणि दुःखाश्रू अविनाश पोईनकर यांनी या भागात प्रत्यक्ष राहून, त्याचे दस्तावेजीकरण 'सुरजागड : विकास की विस्थापन?' या पंचनाम्यात मांडल्या आहेत. पर्यावरणाचा अभ्यास करणारे विद्यार्थी आणि प्राध्यापक, पर्यावरणात काम करणारे संशोधक, चळवळीत काम करणारे कार्यकर्ते, या सर्वांसाठी हे पुस्तक 'बायबल' आहे. प्रत्यक्ष जमिनीस्तरावरील हा ग्राउंड रिपोर्ट वाचून गरीब आदिवासींच्या थोड्याशा वेदना वाचकांनाही होतील, असा मला विश्वास आहे. 


••


 सुरजागड : विकास की विस्थापन?

 लेखक : अविनाश पोईनकर 

 हर्मिस प्रकाशन, पुणे.

 पृष्ठ : १७०, किंमत :२००/- रू. 


••

सोमवार, 19 मई 2025

'दंडकारुण्य' : सौंदर्य, औदार्य आणि क्रौर्य अधोरेखित करणारा काव्यसंग्रह

• समीक्षा 

- नरेशकुमार बोरीकर, चंद्रपूर : ९६०४९४४५९०

(प्रसिद्ध कवी, निवेदक व नाट्य अभिनेता) 

•••••


जवळपास २०१५ मध्ये अविनाश पोईनकर या कोवळ्या कवीची भेट गडचांदूर जवळील बिबी या गावात घडली. २०१७ मध्ये 'उजेड मागणारी आसवे' हा पहिला काव्यसंग्रह त्याचा प्रकाशित झाला. तेव्हा प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन मी केले होते, हेही आठवतेय. तेव्हापासूनच 'बंदे मे है दम' असे सारखे वाटत होते. कारण मोहात पडण्याच्या वयात, बिघडण्याचा वयात याचा ओढा साहित्यिक तथा सामाजिक कार्याकडे असायचा. जणू काही मला बिघडायचे नाही तर घडायचे आहे, हे तो प्रत्येक क्षणी मनाला समजावित होता. त्यानंतर आजवर कित्येक भेटी घडत गेल्या आणि अविनाश नावाचा कवी कळत गेला. आजवर त्यांनी मानाच्या अनेक फेलोशिप, अभ्यासवृत्ती मिळविलेल्या आहे. कवी, लेखक, मुक्तपत्रकार व आदिवासी क्षेत्रात कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ते विदर्भच नाही तर महाराष्ट्रात सुपरिचित आहे. अलीकडेच अविनाशचा 'सुरजागड : विकास की विस्थापन?' हा हर्मिस प्रकाशनाने प्रकाशित केलेला नक्षलप्रभावित गडचिरोलीतिल खाणग्रस्त आदिवासींच्या संघर्षाचे वास्तव मांडणारा आदिवासींवरील सामाजिक संशोधन ग्रंथ प्रकाशित झाला आहे. हा ग्रंथ सध्या चांगला चर्चेत आहे. नुकताच लोकवाङ्मय गृह या रसिक मान्यताप्राप्त प्रकाशनातर्फे अविनाशचा 'दंडकारुण्य' काव्यसंग्रह प्रकाशित झालाय. या कवितासंग्रहाला देखील महाराष्ट्रातून चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे.

ज्या साहित्यातून 'सखोल जीवनदर्शन' होतं, ते चांगलं साहित्य. किंवा ज्यातून 'वास्तवाचं ज्ञान' होतं, ते चांगलं. कोणी असेही म्हणतात की ज्यातून सामाजिक वेदनेला वा अन्यायाला वाट मिळते, तेच चांगलं साहित्य. कोणाला असं वाटतं, की ज्यातून सध्याच्या समस्या मांडल्या जातात तेच चांगलं. तर कोणी असं समजतात की ज्यातून 'कलात्मक आनंद' मिळतो ते चांगलं साहित्य. वरील साहित्य कसोटीवर 'दंडकारुण्य' सर्वतोपरी खरं उतरतंय हे मला वाचनांती जाणवलंय. कामानिमित्त सन २०२० ते २०२३ या तीन वर्षांत अभूजमाड-दंडकारण्य भागातील मुक्त भटकंती, अनुभवलेले जंगलविश्व, हक्क आणि अधिकारांची होणारी गळचेपी, कॉर्पोरेट युगाचे आदिवासींच्या अधिवासावर होणारे अतिक्रमण, पोलीस- नक्षलवादांच्या जात्यात भरडला जाणारा निष्पाप-निरपराध आदिवासी, आदिवासी ग्रामसभा, व्यथा-वेदना, सण-उत्सव या बहुतांश गोष्टी 'दंडकारुण्य'च्या कवितांच्या छोटेखानी ७६ तुकड्यांत कवीने अतिशय प्रभावीपणे मांडले आहे. म्हणायला अगदी 'पाकेट साईज' असणारा 'दंडकारुण्य' खऱ्या अर्थाने 'छोटा पाकेट बडा धमाका' ठरतोय. काव्यसंग्रहाला चित्रकार सरदार जाधव यांचे दंडकारुण्याची खोली मांडणारे अर्थवाही मुखपृष्ठ आहे. एका बैठकीत वाचून संपणारा हा काव्यसंग्रह संवेदनशील वाचकांच्या मेंदूत नुसत्या मुंग्या नाही तर कित्येक जहरी इंगळ्या सोडून अस्वस्थ करणारा आहे. 


कवी नरेशकुमार बोरीकर आणि अविनाश पोईनकर


आदिवासींच्या कारुण्याचे दशावतार वाचतांना, तुर्कस्तानच्या समुद्र काठावर वाळूत तोंड खूपसून पडलेल्या तीन वर्षाच्या मृत एलनचं चित्र आपल्या मनात उभं राहतं. कवीने हिरव्या सृष्टीच्या समृद्धीसाठी जीवाचे रान करणाऱ्यांना व त्यासाठी पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्यांना हा काव्य संग्रह समर्पित केलाय. आदिवासी एकता चळवळ आणि साहित्य या माध्यमातून समाज चेतवणारे सुप्रसिद्ध कवी तथा सामाजिक कार्यकर्ते वाहरू सोनवणे यांची पाठराखण काव्यसंग्रहास अस्सल पाठबळ देणारी आहे. या काव्यसंग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही सुप्रसिद्ध साहित्यिकाची प्रस्तावना नाही. अन्यथा प्रस्तावनेतच काव्यसंग्रहात 'आगे क्या है...' हे वाचकांना कळलं असतं. त्यामुळे पुढे वाचायचे कि ठेवायचे ही बाब नाही, आणि वाचक 'अथपासून इतिपर्यंत' दंडकारुण्य वाचत जातो.

कवी पहिल्याच कवितेत लिहितो...

ए फॉर ॲप्पल

बी फॉर बॉल

सी फॉर कॅट

डी फॉर डॉग

आताशा इतकच शिकवलं जातंय आम्हाला.

काही वर्षांनी बदललाच अभ्यासक्रम तर

एफ फॉर फाईट आणि आर फॉर राईट 

हे येईल का आमच्या अभ्यासक्रमात?


या कवितेत प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धची आदिवासीच्या मनात शिलगणारी एक सुप्त ठिणगी जाणवतेय.

आणखी कवी पुढे म्हणतो...

स्वातंत्र्यापूर्वी अनादी काळापासून 

आम्ही जगत आलोय घनदाट जंगलात

निसर्गानेच शिकवलं जगण्याचं शहाणपण आम्हाला

आम्ही निसर्गाशिवाय 

कधीच मागीतलं नाही काही कुणाकडे

मुठभर दानत दाखवून

आम्हाला कोण करू पाहतोय विभक्त ?


या कवितेत निसर्गाचे शिष्य असणाऱ्या एकजूट आदिवासीला आमिष दाखवून एकता तोडू पाहणाऱ्या यंत्रणेविरुद्ध सावध राहा, हा इशारा कवीने कवितेतून दिलाय.

पुढील कविता प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. 


'पेरमाने बांधला नाही का गाव?

भूमीयाने पूजली नाही का माती?

गायताने घेतली नाही का काहीच भूमिका?

कोतलाने दिला नाही का काहीच निरोप? 

पुजारी असे कसे झाले निपचित?

म्हणे बाहेर जल जंगल जमिनीवर 

होऊ लागलय आक्रमण

वेशीबाहेरची रोगराई

म्हणून तर आली नसावी गावात?


कवितेतील पेरमा, भूमीया, गायता ही अबुजमाड भागातील माडिया समाजातील पारंपारिक नेतृत्व करणारी गावातील मान्यवर मंडळी. दरवर्षी यांच्या हस्ते गावात सुखशांती नांदावी, रोगराईचे अरीष्ट टळावे म्हणून आदिवासी प्रथेनुसार गाव व इलाक्यात पूजा केली जाते. मात्र यावेळी आदिवासींच्या जल-जंगल-जमीनीवर अतिक्रमण करत लोहखनिज मिळवण्यासाठी विविध प्रकल्पांची उभारणी होत आहे. हा आदिवासींचा विकास नाही तर झपाट्याने लागण होत असलेला व जल-जंगल-जमीन गिळंकृत करून आदिवासींना देशोधडीला लावणारा रोग आहे, असे सावध सूचन ही कविता करते. 


पेट्रोल, डिझेल ही प्रतिके घेऊन कवी पुढील तेवीस शब्दांच्या कवितेत आदिवासींचे अस्सल शुद्धपण रेखाटतो..


पेट्रोल, डिझेल 

गाडीच पिते

माणूस प्यायला असता तर

सुरू झालं असतं 

जागतिक महायुद्ध!

बरं झालं 

आमचं जंगल आहे शाबूत 

आणि पाणी आहे शुद्ध..


पुढील कवितेच्या ओळी वाचून वाचक अस्वस्थ होतो...


'जैविक धन 

मिळेल त्याला दिलं 

कवडीमोल भावात

आणि चवीसाठी घेतलं केवळ मीठ.

कुणास ठाऊक कोणत्या व्यवस्थेची 

दरवेळी लागत असावी दीठ ?


प्रश्नचिन्हाद्वारे संपणारी ही कविता आदिवासीच्या जगण्यावर अनेक प्रश्नांचे जणू बाण सोडतेय. हिरडा, बेहडा, आवळा, टेंभरं, खिरण्या, येरोण्या, चारं, बोरं, मध आदी महत्प्रयासाने मिळवलेला रानमेवा फक्त चवीपुरत्या मीठासाठी कवडीमोल भावाने द्यावा लागतो. हाच रानमेवा मोठ्या दुकानात, मॉलमध्ये नंतर शेकडोपट किंमतीने विकल्या जातो. आदिवासी नावाचा अफाट हिरव्या सृष्टीचा पालक तेव्हा शहरी संस्कृतीच्या खिजगनतीतही नसतो. 


आजची सत्ता वंचितांच्या, दलितांच्या, आदिवासींच्या विरूद्ध असलेली सत्ता आहे. तिला भाषा, साहित्य, तत्वज्ञान, कला परंपरेतले धवल सौंदर्य याचं वावडं आहे. त्यामुळे जागं राहणं गरजेचं वाटतं. याच आशयाच्या कवितेत कवी म्हणतो... 


सरकार, 

तुमच्या साहेब लोकांना दिलाच नाही 

एखाद्या महिन्याचा पगार 

तर किती होतील आक्रोश-आंदोलने? 

इथे घामाची मेहनत 

दरसाल करपली जाते पाण्याखाली 

तरी कुणीच कसे करत नाहीत आंदोलने? 

दुखण्याला मलमपट्टी करणारे 

कुणीच कसे गवसत नाही? 

सरकार... 

    

नीब्बर शासन व्यवस्थेला माणुसकीचे पुन्हा पुन्हा स्मरण करून देणं, हेच कवीचं आणि कोणत्याही कलावंतांचं काम आहे. यात ते कवीने केलंय. आता भान असलेल्या नागरिकांचे कर्तव्य वाचकांना करायचं आहे, हे कवी इथे अदृश्यपणे सुचवतोय.

'दंडकारुण्य' मध्ये देवाजी, लालसू, कन्ना, चिन्ना, बुकलू, अनिता, रमेश, शांती, सायबी, प्रकाश पुसू विडपी, मंगरू, अरुंधती रॉय, महेश राऊत, मीरा, संगीता जोगा मडावी, मंगला आदी व्यक्तीचित्रे येतात. त्यात काही कवितेत वेदनेचा चित्कार तर काही कवितेत विद्रोहाचा हुंकार आहे. 


दंडकारण्यात स्त्रीप्रधान संस्कृती आहे. यातील विविध महिलांचे व्यक्तीचित्रण कवितेत टिपतांना कवी सुतवाच करतो.... 

       

दुर्गी, 

बिजूला, 

गुत्तो, 

जन्नी, 

गोई, 

आता असायला हवं आपण सावध 

समृद्ध काळाला चावा घेताहेत 

आतल्या आत इंगळ्या 

जंगलभर पसरताहेत विष 

मातृसत्तेच्या हातात हवी गोफण, तिरकामटा 

आणि 

कोणी भिडलाच तर 

विजयाचा चित्कार फोडायला हाकुमी... 


कवीने तिरकामटा हे आदिवासीचे शस्त्र व हाकुमी वायुवाद्य प्रतिक रूपात इथे घेतलयं. इथे कविता आदिवासींना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मागते. जर तसे नाही झाले तर क्रांतीनेही तो अधिकार मिळविण्यासाठी प्रतिबद्ध आहे, हे ठणकावून सांगते. कवी अविनाश आपल्या कवितेतून 'समाज जागल्याची' भूमिका बजावताना दिसतात. 


हे गड, या पहाडी 

सारेच कसे निसटून जाताहेत हातातून 

आणि तू 

गावातून शिकून सावरलेला 

चिडीचूप बसला आहेस 

कुठल्याशा शहरी फ्लॅटच्या कोपर्‍यात... 


हिरवीसृष्टी सोडून शहरी प्रवाहात आलेल्या, सोकावलेल्या भिडस्त आदिवासी बांधवास कवी समज देतो आणि जंगलाशी जुळलेली नाळ तोडू नकोस असे सांगतो.


हसदेव

सुरजागड

सारंडा

नियमगिरी 

बैलाडीला

बक्सवाहा 

मुंडारी खुटकट्टी 

पुन्हा किती हिरव्या समृद्धीचे बळी घेणार आहोत? 

कळत असूनही वळत नाहीय

आपण आपलाच बळी देणार आहोत... 


देशभर जल-जंगल-जमीन वाचवण्यासाठी आदिवासींची आंदोलने आणि लढे सुरू आहे, तोच स्वर या कवितेतून कवीने मांडलाय. सृष्टीत जे जे काही आहे, प्राणी-पशू-हवा-पाणी-खनिजं ते ते सगळं आपल्या उपभोगासाठीच आहे; अशी आक्रमक मग्रूरी खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणामुळे आलीय. या खाउजा संस्कृतीमुळे मानवी मेंदूतील विवेकबुद्धी आणि तर्काचा भाग बधीर झालाय. विकासाच्या बेगडी आवरणाखाली समस्त मानवजातीचा विनाश फळफळतोय. हा सुज्ञपणा येणे, समजणे आज गरजेचे आहे. 


अनेक वर्षांपासूनच्या आदिवासींनी जतन केलेल्या वनवैभवाचे आणि नंतर अलीकडच्या विपन्नावस्थेचे वर्णन करताना कवी म्हणतो... 


दंडकारण्यातील सागाने 

ऐटीत नटलेय लंडनचे महाल

अयोध्येत साकारलेय दिव्य राम लल्ला मंदिर 

आणि कवाडांना सुटलाय सुगंध 

याच मातीतील लाकुडफाट्यांचा. 

संसदभवनात प्रवेश करतांना 

नमन व्हावच लागतं 

आमच्या संपदेतून साकारलेल्या दरवाजांपुढे. 

आमच्या दंडकारण्यातील कारुण्याची 

तुम्ही कशी ठरवू शकता किंमत ? 


सांप्रत सत्तेच्या छाताडावर मारलेला भाला ठरावी अशी ही कविता आहे. असंख्य तरूणांची अस्वस्थता दिसत नाही, पण ती आहे. कारण विरोधाचा कोणताही स्वर ऐकू-दिसू द्यायचा नाही, अशा व्यवस्थेत या तरूणांना भविष्य दिसतय. मात्र 'अविनाश पोईनकर' सारखा एखादा तरूण कवी असल्या भविष्याच्या चक्रव्यूहाचं आभासी आवरणं आपल्या शब्दसामर्थ्याने भेदतोय. पुढच्या पिढ्यांच्या भविष्याचा विचार करत इतरांनाही वास्तवाची दाहक जाणीव करून देतो. हे आदिवासींसाठी तर आहेच पण साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रासाठीही कौतुकास्पद गोष्ट आहे. स्वातंत्र्याचा संकोच झालेल्या या काळात सत्य हाच जर द्रोह मानल्या जात असेल तर कवी आणखीच ठामपणे सत्य की जय म्हणणारा असावा. कविता लिहिणं हे सत्याचा उच्चार करणंच आहे. माणूस म्हणून प्रिय असलेले स्वातंत्र्य, समता, करूणा, न्याय यांच्यासाठी मौन सोडून आता बोलावं लागेल. याप्रसंगी शायर मुनीर नियाजी यांचा शेर आठवतो... 

'बेचैन बहोत फिरना, घबराये हुएं रहना 

इक आगसी जज्बोंकी, दहकाएं हुएं रहना... 


'दंडकारुण्य' काव्यसंग्रहासाठी युवाकवी अविनाश पोईनकर यांचे मनभरून अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी सदैव मन, मेंदू आणि मनगट कणखर असावे, या शुभेच्छांसह... 




•••

लोकवाङ्मय गृह प्रकाशन, मुंबई 

पृष्ठ - ९१, मूल्य - २००

संपर्क - ८४५४०४९०३६

•••



दंडकारण्यातील आदिवासी बांधवाच्या जीवनाचं खरंखुरं धगधगत वास्तव : दंडकारुण्य

- राजू गरमडे, चंद्रपूर कवीमिञ, मुक्तपञकार, सामाजिक युवा कार्यकर्ते, आदिवासी भागात जाऊन कार्य करणारे अविनाश पोईनकर एका कार्यक्रमामध्ये भेटले....