- राजू गरमडे, चंद्रपूर
कवीमिञ, मुक्तपञकार, सामाजिक युवा कार्यकर्ते, आदिवासी भागात जाऊन कार्य करणारे अविनाश पोईनकर एका कार्यक्रमामध्ये भेटले. त्यांनी त्यांची 'सुरजागड : विकास की विस्थापन?' आणि 'दंडकारुण्य' ही प्रकाशित झालेली दोन पुस्तके दिलीत. 'उजेड मागणारी आसवे' या कवितासंग्रहानंतर म्हणजेच २०१७ नंतर आलेली ही त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. तसेच 'विमल गाडेकर : व्यक्ती आणि वाड़मय' या ग्रंथाचे संपादन सुद्धा त्यांनी केलेले आहेत.
'दंडकारुण्य' हा कवितासंग्रह म्हणजेच आदिवासी भागामध्ये कार्य करीत असताना त्यांच्यासोबत राहून, त्यांचं आयुष्य जवळून पाहून जे त्यांना दिसलं, अनुभवता आलं, तेच त्यांच्या कवितेत उतरलेलं आहे. विकासाच्या कोसोदूर असलेला आणि कागदोपत्री असलेल्या विकासाच्या योजनांपासून अनभिज्ञ असलेला हा आदिवासी बांधव कायमच शासन आणि नक्षलवाद्यामध्ये पिचला गेलेला आहे. त्यांचे हक्क, अधिकार मिळविताना त्यांना संघर्षाशिवाय दुसरा मार्ग नाही. जंगल हे त्यांच्या जगण्याचं साधन. पण तेही आता विकासाच्या गोंडस नावाखाली तोडल्या जात असेल तर मग त्यांनी जगावं कसं? शिक्षण, वीज, नोकरी यापासून ते अजूनही दूरच आहे. हे त्यांचं वास्तव कवी अविनाश पोईनकर यांच्या कवितेमधून उजागर झालेलं आहे. त्यांची कविता ही आदिवासींच्या जगण्याचं प्रतिबिंब आहे. जो जगतो कसा, राहतो कसा, खातो कसा आणि भयाच्या दशहतीखाली राहतो की स्वतंत्र राहतो? हे त्यांची कविता वाचकांना सांगत आहेत.
एकून ७६ कविता या संग्रहात आहे. काही कविता ४-५ ओळीच्याच आहेत. पण आशयाने मात्र परिपुर्ण आहे. दीर्घ कवितेमधून अभिव्यक्त होणाऱ्या आशयापेक्षाही या कवितेमधून सामाजिक वास्तव आणि आदिवासी बांधवांचं जगणंच अधोरेखित होत आहे. वेदना, अन्याय आणि अत्याचाराने वेढलेला हा आदिवासी बांधव कवीने आपल्या कवितेमध्ये बंदिस्त केलेला आहे.
तुमच्या विकासासाठी आम्ही कट्टीबद्ध आहोत. तुमचा विकास करणे हे आमचे कर्तव्यच आहे. आम्ही तुमच्या प्रश्नांना शासनदरबारी मांडण्याचा प्रयन्न करु, असे आश्वासन या आदिवासी बांधवाना दर पाच वर्षानी मिळत असते. पण, निवडणूका झाल्या की सगळं काही शांत होऊन जातं, पुढल्या पाच वर्षापर्यंत. हेच होऊन राहिले आहे त्यांच्याबाबतीत. कित्येक वर्षापासून...
बोट कधीचेच कापून टाकलयं आम्ही
आता बोटावरच्या शाईवर
उरला नाही विश्वास
ऐनवेळी अरण्यात येतात
महाभंयकर विविधांगी पूर
अन् निघतात गुदमरलेले सूर
विकासाच्या योजना
धगधगत असतीलच चुलीत
तर द्या शिजवून
कोसरी किंवा धानाचा भात
तसंही दर पाच वर्षाने ठरलेलाच असतो
आमचा घात
जंगल हे जगण्याचं साधन. त्यांचं रक्षण करणे, संवर्धन करणे ही आजच्या काळाची गरज आहे. पण, जिथे जंगलाच्या रक्षकालाच जीव मुठीत घेऊन जगावे लागते, तिथे जंगल तरी सुरक्षित राहणार का ?
वनरक्षकाला कोंबलं जंगलात
अन् मारलं
मांडी फुटेस्तोवर
लंपास केलं
त्याच्या ड्युटीचं साहित्य
'पुन्हा दिसलास तर जीव गमावशील'
या धमक्यांचा आवाज
गगनभेदी होतोय
कळते पण वळत नाही
नेमकं जंगल कोण खातोय ?
अन्याय, अत्याचाराने पिचलेला आदिवासी बांधव जगतोच मुळी भीतीच्या सावटाखाली. कुणाकडे करावी तक्रार? दाद मागण्याचा अधिकारच नाही मुळी त्यांना. कित्येक निरपराध आदिवासी नाही केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत आहे.
जीव मुठीत कैद असतो
मांडू शकत नाही फिर्याद
मागू शकत नाही दाद
सभोवताल विणलयं खबर्यांच जाळं
यात अडकलाच
कोणी निरपराध
तर हातात बेड्या ठोकतील
किंवा
नसांतून उडतील लालभडक फव्वारे
आदिवासी हा जगंलात राहतो. तेच त्यांचं घर. शिक्षणाच्या प्रवाहापासून कोसोदूर. दवाखान्यात जाण्यासाठी धड रस्तेही नाही. नदी-नाले पार करुन उपचारासाठी, प्रसूतीसाठी जावे लागते. त्यांच्या मूक वेदनांचा आवाज शासनदरबारापर्यत कधी पोहोचणार का ?
शांती,
नदी - नाल्यांच्या अरण्यातून
तीस कि.मी.खाटेवर उचलून नेऊन
तुझं झालं ' सिझर '
आता गावात तुझे दोर झाले सैल
वाहतेय त्यातून रक्त - पाणी
तुझ्या रडण्याचा आवाज
पोहोचू शकत नाही इस्पितळापर्यंत
तुझ्या पोटातील धागे
तुझ्यासकट झाले गायब
आदिवासींच्या जगण्याला, त्यांच्या संघर्षाला, त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराला अनेक कवी, लेखकांनी वाचा फोडली. कुणी कविता केल्या तर कुणी कथा लिहिल्या. पुस्तके काढली. अभिमानाने कवी म्हणून मिरविले. पुरस्कारही मिळाले. ते सारं काही ज्यांच्यामुळे मिळाले त्यांच्या घरापर्यंत तरी ते गेले आहेत? की, एसी मध्ये बसून त्यांच्या वेदनांचा बाजार मांडला. त्यांचं जगणं समजून न घेता. त्यांच्या पाठीला तरी त्यांचे लिहिणारे हात लागले असतील काय? तरीही आपण त्यांचा उदोउदो करायला लागतो.
लिहिल्या कविता
काढली पुस्तके
भराभर डझनभर झालीत पुस्तके
शेकडोंनी घेतले पुरस्कार
अकादमी, ज्ञानपीठापर्यंत
मारली मजल दर - मजल
ज्यांच्या वेदनांचा मांडला बाजार
ज्यांच्या दारात ना कधी पडली सावली
बेदखल झालेल्या आक्रोशाचे
ना कधी झालात भाग
तरीही आम्ही
तुमच्या लेखनीचे गुणगाण गातोय
आदिवासींचं जगणं मांडणारी ही कविता म्हणजे त्यांचं धगधगत वास्तव मांडणारी आणि त्यांच्या मागे लागलेल्या दडपशाहीची कर्मकहाणीच आहे.
ते येतात
जाळपोळ करतात
निघून जातात
इथला
आदिवासी
जळतच राहतो
निरंतर....
बुकलू.. अनिता.. शांती.. विनोबा.. प्रकाश पुसू विडपी.. अरुंधती राॅय.. महेश राऊत.. मालू कोपा बोगामी.. संगीता जोगा मडावी.. मंगला.. यांच्याही वेदनाची दखल कवीने घेतली आहे.
'दंडकारुण्य' या कवितासंग्रहातील कविता ही आदिवासींच्या जगण्याचे कंगोरे ऊलगडणारी आणि जसं जीवन ते जगतात, ज्या गोष्टींचा त्यांना पदोपदी सामना करावा लागत आहे, ती वास्तविकता मांडणारी आहे. शिवाय कवीची आंतरिक तळमळ आणि प्रामाणिक भाव कवितेमधून व्यक्त झालेला आहे. आदिवासी बांधवाच्या कल्याणासाठी, विकासासाठी, न्यायासाठी, तन-मन-धनाने काम करीत असलेल्या या कवीच्या कवितेची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जाईलच, यात तीळमात्रही शंका नाही.
लोकवाड्मय गृह, मुंबई या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या या कवितासंग्रहाला लाभलेलं सरदार जाधव यांचं मुखपृष्ठही खुप बोलकं आणि लक्षवेधी आहे. सामाजिक कार्यकर्ते, आदिवासी कवी व विचारवंत वाहरू सोनवणे यांनी कवितेची पाठराखण केलेली आहे. अविनाश पोईनकर हे एक कवी आणि एक सच्चा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून घेत असलेल्या कष्टाला, प्रयन्नाला यश प्रात्त होत राहो, अशी प्रार्थना करतो. आणि शुभेच्छा देतो.
•••
कवितासंग्रह :- दंडकारुण्य
कवी :- अविनाश पोईनकर
प्रकाशक :- लोकवाड्मय गृह,मुंबई.
प्रथमावृत्ती :- मार्च २०२५
मुखपृष्ठ :- सरदार जाधव
पाठराखण :- वाहरू सोनवणे
पृष्ठ :- ९१
मूल्य :- ₹ २००/-
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें