• समीक्षा
- नरेशकुमार बोरीकर, चंद्रपूर : ९६०४९४४५९०
(प्रसिद्ध कवी, निवेदक व नाट्य अभिनेता)
•••••
जवळपास २०१५ मध्ये अविनाश पोईनकर या कोवळ्या कवीची भेट गडचांदूर जवळील बिबी या गावात घडली. २०१७ मध्ये 'उजेड मागणारी आसवे' हा पहिला काव्यसंग्रह त्याचा प्रकाशित झाला. तेव्हा प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन मी केले होते, हेही आठवतेय. तेव्हापासूनच 'बंदे मे है दम' असे सारखे वाटत होते. कारण मोहात पडण्याच्या वयात, बिघडण्याचा वयात याचा ओढा साहित्यिक तथा सामाजिक कार्याकडे असायचा. जणू काही मला बिघडायचे नाही तर घडायचे आहे, हे तो प्रत्येक क्षणी मनाला समजावित होता. त्यानंतर आजवर कित्येक भेटी घडत गेल्या आणि अविनाश नावाचा कवी कळत गेला. आजवर त्यांनी मानाच्या अनेक फेलोशिप, अभ्यासवृत्ती मिळविलेल्या आहे. कवी, लेखक, मुक्तपत्रकार व आदिवासी क्षेत्रात कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ते विदर्भच नाही तर महाराष्ट्रात सुपरिचित आहे. अलीकडेच अविनाशचा 'सुरजागड : विकास की विस्थापन?' हा हर्मिस प्रकाशनाने प्रकाशित केलेला नक्षलप्रभावित गडचिरोलीतिल खाणग्रस्त आदिवासींच्या संघर्षाचे वास्तव मांडणारा आदिवासींवरील सामाजिक संशोधन ग्रंथ प्रकाशित झाला आहे. हा ग्रंथ सध्या चांगला चर्चेत आहे. नुकताच लोकवाङ्मय गृह या रसिक मान्यताप्राप्त प्रकाशनातर्फे अविनाशचा 'दंडकारुण्य' काव्यसंग्रह प्रकाशित झालाय. या कवितासंग्रहाला देखील महाराष्ट्रातून चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे.
ज्या साहित्यातून 'सखोल जीवनदर्शन' होतं, ते चांगलं साहित्य. किंवा ज्यातून 'वास्तवाचं ज्ञान' होतं, ते चांगलं. कोणी असेही म्हणतात की ज्यातून सामाजिक वेदनेला वा अन्यायाला वाट मिळते, तेच चांगलं साहित्य. कोणाला असं वाटतं, की ज्यातून सध्याच्या समस्या मांडल्या जातात तेच चांगलं. तर कोणी असं समजतात की ज्यातून 'कलात्मक आनंद' मिळतो ते चांगलं साहित्य. वरील साहित्य कसोटीवर 'दंडकारुण्य' सर्वतोपरी खरं उतरतंय हे मला वाचनांती जाणवलंय. कामानिमित्त सन २०२० ते २०२३ या तीन वर्षांत अभूजमाड-दंडकारण्य भागातील मुक्त भटकंती, अनुभवलेले जंगलविश्व, हक्क आणि अधिकारांची होणारी गळचेपी, कॉर्पोरेट युगाचे आदिवासींच्या अधिवासावर होणारे अतिक्रमण, पोलीस- नक्षलवादांच्या जात्यात भरडला जाणारा निष्पाप-निरपराध आदिवासी, आदिवासी ग्रामसभा, व्यथा-वेदना, सण-उत्सव या बहुतांश गोष्टी 'दंडकारुण्य'च्या कवितांच्या छोटेखानी ७६ तुकड्यांत कवीने अतिशय प्रभावीपणे मांडले आहे. म्हणायला अगदी 'पाकेट साईज' असणारा 'दंडकारुण्य' खऱ्या अर्थाने 'छोटा पाकेट बडा धमाका' ठरतोय. काव्यसंग्रहाला चित्रकार सरदार जाधव यांचे दंडकारुण्याची खोली मांडणारे अर्थवाही मुखपृष्ठ आहे. एका बैठकीत वाचून संपणारा हा काव्यसंग्रह संवेदनशील वाचकांच्या मेंदूत नुसत्या मुंग्या नाही तर कित्येक जहरी इंगळ्या सोडून अस्वस्थ करणारा आहे.
![]() |
कवी नरेशकुमार बोरीकर आणि अविनाश पोईनकर |
आदिवासींच्या कारुण्याचे दशावतार वाचतांना, तुर्कस्तानच्या समुद्र काठावर वाळूत तोंड खूपसून पडलेल्या तीन वर्षाच्या मृत एलनचं चित्र आपल्या मनात उभं राहतं. कवीने हिरव्या सृष्टीच्या समृद्धीसाठी जीवाचे रान करणाऱ्यांना व त्यासाठी पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्यांना हा काव्य संग्रह समर्पित केलाय. आदिवासी एकता चळवळ आणि साहित्य या माध्यमातून समाज चेतवणारे सुप्रसिद्ध कवी तथा सामाजिक कार्यकर्ते वाहरू सोनवणे यांची पाठराखण काव्यसंग्रहास अस्सल पाठबळ देणारी आहे. या काव्यसंग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही सुप्रसिद्ध साहित्यिकाची प्रस्तावना नाही. अन्यथा प्रस्तावनेतच काव्यसंग्रहात 'आगे क्या है...' हे वाचकांना कळलं असतं. त्यामुळे पुढे वाचायचे कि ठेवायचे ही बाब नाही, आणि वाचक 'अथपासून इतिपर्यंत' दंडकारुण्य वाचत जातो.
कवी पहिल्याच कवितेत लिहितो...
ए फॉर ॲप्पल
बी फॉर बॉल
सी फॉर कॅट
डी फॉर डॉग
आताशा इतकच शिकवलं जातंय आम्हाला.
काही वर्षांनी बदललाच अभ्यासक्रम तर
एफ फॉर फाईट आणि आर फॉर राईट
हे येईल का आमच्या अभ्यासक्रमात?
या कवितेत प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धची आदिवासीच्या मनात शिलगणारी एक सुप्त ठिणगी जाणवतेय.
आणखी कवी पुढे म्हणतो...
स्वातंत्र्यापूर्वी अनादी काळापासून
आम्ही जगत आलोय घनदाट जंगलात
निसर्गानेच शिकवलं जगण्याचं शहाणपण आम्हाला
आम्ही निसर्गाशिवाय
कधीच मागीतलं नाही काही कुणाकडे
मुठभर दानत दाखवून
आम्हाला कोण करू पाहतोय विभक्त ?
या कवितेत निसर्गाचे शिष्य असणाऱ्या एकजूट आदिवासीला आमिष दाखवून एकता तोडू पाहणाऱ्या यंत्रणेविरुद्ध सावध राहा, हा इशारा कवीने कवितेतून दिलाय.
पुढील कविता प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
'पेरमाने बांधला नाही का गाव?
भूमीयाने पूजली नाही का माती?
गायताने घेतली नाही का काहीच भूमिका?
कोतलाने दिला नाही का काहीच निरोप?
पुजारी असे कसे झाले निपचित?
म्हणे बाहेर जल जंगल जमिनीवर
होऊ लागलय आक्रमण
वेशीबाहेरची रोगराई
म्हणून तर आली नसावी गावात?
कवितेतील पेरमा, भूमीया, गायता ही अबुजमाड भागातील माडिया समाजातील पारंपारिक नेतृत्व करणारी गावातील मान्यवर मंडळी. दरवर्षी यांच्या हस्ते गावात सुखशांती नांदावी, रोगराईचे अरीष्ट टळावे म्हणून आदिवासी प्रथेनुसार गाव व इलाक्यात पूजा केली जाते. मात्र यावेळी आदिवासींच्या जल-जंगल-जमीनीवर अतिक्रमण करत लोहखनिज मिळवण्यासाठी विविध प्रकल्पांची उभारणी होत आहे. हा आदिवासींचा विकास नाही तर झपाट्याने लागण होत असलेला व जल-जंगल-जमीन गिळंकृत करून आदिवासींना देशोधडीला लावणारा रोग आहे, असे सावध सूचन ही कविता करते.
पेट्रोल, डिझेल ही प्रतिके घेऊन कवी पुढील तेवीस शब्दांच्या कवितेत आदिवासींचे अस्सल शुद्धपण रेखाटतो..
पेट्रोल, डिझेल
गाडीच पिते
माणूस प्यायला असता तर
सुरू झालं असतं
जागतिक महायुद्ध!
बरं झालं
आमचं जंगल आहे शाबूत
आणि पाणी आहे शुद्ध..
पुढील कवितेच्या ओळी वाचून वाचक अस्वस्थ होतो...
'जैविक धन
मिळेल त्याला दिलं
कवडीमोल भावात
आणि चवीसाठी घेतलं केवळ मीठ.
कुणास ठाऊक कोणत्या व्यवस्थेची
दरवेळी लागत असावी दीठ ?
प्रश्नचिन्हाद्वारे संपणारी ही कविता आदिवासीच्या जगण्यावर अनेक प्रश्नांचे जणू बाण सोडतेय. हिरडा, बेहडा, आवळा, टेंभरं, खिरण्या, येरोण्या, चारं, बोरं, मध आदी महत्प्रयासाने मिळवलेला रानमेवा फक्त चवीपुरत्या मीठासाठी कवडीमोल भावाने द्यावा लागतो. हाच रानमेवा मोठ्या दुकानात, मॉलमध्ये नंतर शेकडोपट किंमतीने विकल्या जातो. आदिवासी नावाचा अफाट हिरव्या सृष्टीचा पालक तेव्हा शहरी संस्कृतीच्या खिजगनतीतही नसतो.
आजची सत्ता वंचितांच्या, दलितांच्या, आदिवासींच्या विरूद्ध असलेली सत्ता आहे. तिला भाषा, साहित्य, तत्वज्ञान, कला परंपरेतले धवल सौंदर्य याचं वावडं आहे. त्यामुळे जागं राहणं गरजेचं वाटतं. याच आशयाच्या कवितेत कवी म्हणतो...
सरकार,
तुमच्या साहेब लोकांना दिलाच नाही
एखाद्या महिन्याचा पगार
तर किती होतील आक्रोश-आंदोलने?
इथे घामाची मेहनत
दरसाल करपली जाते पाण्याखाली
तरी कुणीच कसे करत नाहीत आंदोलने?
दुखण्याला मलमपट्टी करणारे
कुणीच कसे गवसत नाही?
सरकार...
नीब्बर शासन व्यवस्थेला माणुसकीचे पुन्हा पुन्हा स्मरण करून देणं, हेच कवीचं आणि कोणत्याही कलावंतांचं काम आहे. यात ते कवीने केलंय. आता भान असलेल्या नागरिकांचे कर्तव्य वाचकांना करायचं आहे, हे कवी इथे अदृश्यपणे सुचवतोय.
'दंडकारुण्य' मध्ये देवाजी, लालसू, कन्ना, चिन्ना, बुकलू, अनिता, रमेश, शांती, सायबी, प्रकाश पुसू विडपी, मंगरू, अरुंधती रॉय, महेश राऊत, मीरा, संगीता जोगा मडावी, मंगला आदी व्यक्तीचित्रे येतात. त्यात काही कवितेत वेदनेचा चित्कार तर काही कवितेत विद्रोहाचा हुंकार आहे.
दंडकारण्यात स्त्रीप्रधान संस्कृती आहे. यातील विविध महिलांचे व्यक्तीचित्रण कवितेत टिपतांना कवी सुतवाच करतो....
दुर्गी,
बिजूला,
गुत्तो,
जन्नी,
गोई,
आता असायला हवं आपण सावध
समृद्ध काळाला चावा घेताहेत
आतल्या आत इंगळ्या
जंगलभर पसरताहेत विष
मातृसत्तेच्या हातात हवी गोफण, तिरकामटा
आणि
कोणी भिडलाच तर
विजयाचा चित्कार फोडायला हाकुमी...
कवीने तिरकामटा हे आदिवासीचे शस्त्र व हाकुमी वायुवाद्य प्रतिक रूपात इथे घेतलयं. इथे कविता आदिवासींना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मागते. जर तसे नाही झाले तर क्रांतीनेही तो अधिकार मिळविण्यासाठी प्रतिबद्ध आहे, हे ठणकावून सांगते. कवी अविनाश आपल्या कवितेतून 'समाज जागल्याची' भूमिका बजावताना दिसतात.
हे गड, या पहाडी
सारेच कसे निसटून जाताहेत हातातून
आणि तू
गावातून शिकून सावरलेला
चिडीचूप बसला आहेस
कुठल्याशा शहरी फ्लॅटच्या कोपर्यात...
हिरवीसृष्टी सोडून शहरी प्रवाहात आलेल्या, सोकावलेल्या भिडस्त आदिवासी बांधवास कवी समज देतो आणि जंगलाशी जुळलेली नाळ तोडू नकोस असे सांगतो.
हसदेव
सुरजागड
सारंडा
नियमगिरी
बैलाडीला
बक्सवाहा
मुंडारी खुटकट्टी
पुन्हा किती हिरव्या समृद्धीचे बळी घेणार आहोत?
कळत असूनही वळत नाहीय
आपण आपलाच बळी देणार आहोत...
देशभर जल-जंगल-जमीन वाचवण्यासाठी आदिवासींची आंदोलने आणि लढे सुरू आहे, तोच स्वर या कवितेतून कवीने मांडलाय. सृष्टीत जे जे काही आहे, प्राणी-पशू-हवा-पाणी-खनिजं ते ते सगळं आपल्या उपभोगासाठीच आहे; अशी आक्रमक मग्रूरी खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणामुळे आलीय. या खाउजा संस्कृतीमुळे मानवी मेंदूतील विवेकबुद्धी आणि तर्काचा भाग बधीर झालाय. विकासाच्या बेगडी आवरणाखाली समस्त मानवजातीचा विनाश फळफळतोय. हा सुज्ञपणा येणे, समजणे आज गरजेचे आहे.
अनेक वर्षांपासूनच्या आदिवासींनी जतन केलेल्या वनवैभवाचे आणि नंतर अलीकडच्या विपन्नावस्थेचे वर्णन करताना कवी म्हणतो...
दंडकारण्यातील सागाने
ऐटीत नटलेय लंडनचे महाल
अयोध्येत साकारलेय दिव्य राम लल्ला मंदिर
आणि कवाडांना सुटलाय सुगंध
याच मातीतील लाकुडफाट्यांचा.
संसदभवनात प्रवेश करतांना
नमन व्हावच लागतं
आमच्या संपदेतून साकारलेल्या दरवाजांपुढे.
आमच्या दंडकारण्यातील कारुण्याची
तुम्ही कशी ठरवू शकता किंमत ?
सांप्रत सत्तेच्या छाताडावर मारलेला भाला ठरावी अशी ही कविता आहे. असंख्य तरूणांची अस्वस्थता दिसत नाही, पण ती आहे. कारण विरोधाचा कोणताही स्वर ऐकू-दिसू द्यायचा नाही, अशा व्यवस्थेत या तरूणांना भविष्य दिसतय. मात्र 'अविनाश पोईनकर' सारखा एखादा तरूण कवी असल्या भविष्याच्या चक्रव्यूहाचं आभासी आवरणं आपल्या शब्दसामर्थ्याने भेदतोय. पुढच्या पिढ्यांच्या भविष्याचा विचार करत इतरांनाही वास्तवाची दाहक जाणीव करून देतो. हे आदिवासींसाठी तर आहेच पण साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रासाठीही कौतुकास्पद गोष्ट आहे. स्वातंत्र्याचा संकोच झालेल्या या काळात सत्य हाच जर द्रोह मानल्या जात असेल तर कवी आणखीच ठामपणे सत्य की जय म्हणणारा असावा. कविता लिहिणं हे सत्याचा उच्चार करणंच आहे. माणूस म्हणून प्रिय असलेले स्वातंत्र्य, समता, करूणा, न्याय यांच्यासाठी मौन सोडून आता बोलावं लागेल. याप्रसंगी शायर मुनीर नियाजी यांचा शेर आठवतो...
'बेचैन बहोत फिरना, घबराये हुएं रहना
इक आगसी जज्बोंकी, दहकाएं हुएं रहना...
'दंडकारुण्य' काव्यसंग्रहासाठी युवाकवी अविनाश पोईनकर यांचे मनभरून अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी सदैव मन, मेंदू आणि मनगट कणखर असावे, या शुभेच्छांसह...
•••
लोकवाङ्मय गृह प्रकाशन, मुंबई
पृष्ठ - ९१, मूल्य - २००
संपर्क - ८४५४०४९०३६
•••



कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें