सोमवार, 21 मार्च 2022

युथाॅलाॅजी -२ : कृषी विकासाचं 'अमीत' पाऊल..


'शेती म्हणजे आयुष्याची माती' असा काहीसा सूर सध्या आहे. 'शेतकरी नवरा नको ग बाई' हे बोचरे वास्तव सतत मनाला डिवचतात. सव्वाशे एकर जमीन असणारे यवतमाळातील चिलगव्हाणचे साहेबराव पाटील कुटुंबासह आत्महत्या करतात, पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून त्यांची नोंद होते, यातून शेती निष्ठावंताच्या वेदना अधोरेखित होते. शेतकऱ्यांना आता त्यांचा मुलगा शेतकरी व्हावा असे सहसा वाटत नाही. जगाच्या पोशिंद्याबाबत असं का व्हावं ? अस्मानी-सुलतानी संकटात शेतकऱ्यांच्या होरपळीचे नवे नवे दृष्टांत पुढे येतात, तेव्हा अस्वस्थतेचे ढग कोरडे ठप्प होतात. या समग्र चिंतनात एक आशेचा सूर काही शेतकरीपुत्र मातीला अन् माणसांना जगवण्याला देताहेत, 'कृषी विकास' हे त्यातलंच एक सकारात्मक पाऊल ! 

अमित दिलीपराव नाफडे हे तरुण व्यक्तिमत्व. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधून समाजकार्याचे शिक्षण घेतलेल्या या तरूणाने आपली माती आपली माणसं जवळ केली. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील तळणी हे त्यांचं गाव. कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमाने त्यांनी सन २००० पासून प्रत्यक्ष जमिनी स्तरावर शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी स्वतःला झोकून दिले. शेतकऱ्यांना काळानुसार योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण उपलब्ध करून दिले व त्यांच्या भक्कम पाठीशी उभे राहिले तर त्यांचे मानसिक खच्चीकरण होणार नाही, यातून सकारात्मक कामाला गती येईल, यावर त्यांचा विश्वास आहे. पहिल्या टप्प्यात संस्थेचा स्वयंसेवक ते सीईओ असा त्यांचा प्रवास आहे. दुसऱ्या टप्प्यात सेंद्रिय शेती, बचत गट आणि जलसंवर्धन यावर प्रकल्प राबवायला त्यांनी सुरुवात केली. तिसऱ्या टप्प्यात शेतकरी उत्पादन कंपनी मजबूत करण्यावर भर दिला. कृषी विकासच्या माध्यमातून महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यात शेतीविषयक नवे तंत्रज्ञान व शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचे ते काम करत आहेत. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश व गुजरात या राज्यातही त्यांचे काम विस्तारले. एक लाखांपेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांसोबत या संस्थेच्या माध्यमातून ते प्रत्यक्ष काम करतात. यासाठी २५० पूर्णवेळ कार्यकर्त्यांची त्यांची टीम कार्यरत आहे. 

शेतकऱ्यांच्या शेती पद्धती, पीक लागवड, त्यांच्या मालाची गुणवत्ता, आधारभूत भाव, मार्केट उपलब्धता, पाण्याची मुबलक सुविधा, कृषीपूरक व्यवसाय यासाठी विविध उपाययोजना आखणे, प्रशिक्षणातून शेतकऱ्यांना सन्मानाने जगायला दिशादर्शक पाठबळ देणे, यासाठी आपलं कार्यकर्तृत्व समर्पीत करणे हीच त्यांची खरी ओळख. वातावरण बदलानुसार शेतीतील मातीचे परीक्षण करून कोणते पीक कधी घ्यावे? त्याचे मार्केट लिंकेज कसे करावे ? याबाबत दक्षतेने ते काम करतात. यासाठी प्रत्यक्ष ग्राउंडवर राबणारा हा तरुण आहे. सोलापुरातील सुरुडी गाव पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत राज्यात प्रथम आले. त्यासाठी प्रत्यक्ष जलसंजीवनी प्रकल्पातून पानलोटाचे काम कृषी विकासने केले. त्याचा परिणाम या गावाला नुकताच राष्ट्रीय जलशक्ति पुरस्कार मिळाला. 

शेतकऱ्यांचा विकास हा शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून होऊ शकतो, यासाठी प्रत्यक्ष पुढाकार त्यांनी घेतला. जवळपास ७५ शेतकरी कृषी उत्पादक कंपन्यांची त्यांनी महाराष्ट्रात स्थापना केली. यासाठी मॉडेल म्हणून त्यांनी स्वतः जय सरदार कृषी विकास शेतकरी उत्पादन कंपनीला पुढे केले. याद्वारे ते प्रत्यक्ष शेतमाल खरेदी करतात. मालाची गुणवत्ता ठरवतात. या कंपनीद्वारे शेतकऱ्यांना पहिल्यांदाच बोनस दिला गेला. हा देशातला पहिला प्रयोग ठरला. १ जाने २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकरी कृषी उत्पादन कंपनींना १४ कोटीचे प्रोत्साहन अनुदान दिले. यात १ कोटींचे प्रोत्साहन अनुदान कृषी विकास संस्थेने स्थापन केलेल्या शेतकरी उत्पादक कंपनींना दिले. हे त्यांच्या निरंतर कार्याचे फलित आहे. खुद्द पंतप्रधानांनी त्यांच्या 'मन की बात' कार्यक्रमात अमित नाफडे व त्यांच्या कृषी विकास टीमच्या कामाची ओळख देशवासीयांना करून दिली. हैद्राबादची मॅनेज इन्स्टिट्यूट तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाद्वारे शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यवस्थापन अभ्यासक्रम पदविका पहिल्यांदाच या संस्थेमार्फत महाराष्ट्रात अमीत नाफडे या तरुण कर्तृत्वाच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. ही खरे तरुणाईतील प्रवाही उर्जा आहे. 

अमित नाफडे हे स्वतः शेतकरी आहेत. आपल्या शिक्षणाचा उपयोग नवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन 'विकेल ते पिकेल' यावर भर देणे ते महत्त्वाचे मानतात. शेतकरी केवळ शेतीवर जगू शकत नाही, त्याला जोडधंदा हवा यासाठी शासकीय योजनांसह विशेष प्रकल्पातून ते डेअरी, पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देतात. आज कृषी विकासमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची गुणवत्ता स्वतः तपासता येते. त्यांची फसवणूक होणार नाही याचं लोकशिक्षण त्यांना प्राप्त झालं. यात प्रत्यक्ष हजारो महिलांचा सहभाग वाढला. शेतीमधील बदलांचे प्रात्यक्षिक आता शेतकरीच अनुभवतात. खरे तर ही आधुनिक क्रांती आहे. 

कृषी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची चळवळ सक्षम करण्याची गरज ते अधोरेखित करतात. आज लाखो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या शेतीतील प्रयोगामुळे, मार्गदर्शनामुळे समाधानाचे गाणे तरळत असते. कृषी विकासावर काम करणा-या या संस्थेचा अग्रक्रमाने देशपातळीवर नामोल्लेख होतो. कृषी क्षेत्रातील त्यांच्या परिवर्तनात्मक कामाला राज्य व राष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे, यामागे त्यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा आहे. जागतिकीकरणाच्या अंदाधुंदीत मातीत राबणाऱ्या कष्टकऱ्यांचे हात येणारा काळ निश्चितच मजबूत करेल. त्या हातावरच्या रेषेत अमित नाफडे आणि कृषी विकास हे नाव कायम गोंदलेले राहील.


- अविनाश पोईनकर




कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

दंडकारण्यातील आदिवासी बांधवाच्या जीवनाचं खरंखुरं धगधगत वास्तव : दंडकारुण्य

- राजू गरमडे, चंद्रपूर कवीमिञ, मुक्तपञकार, सामाजिक युवा कार्यकर्ते, आदिवासी भागात जाऊन कार्य करणारे अविनाश पोईनकर एका कार्यक्रमामध्ये भेटले....