१.
'हमारे गाव में हमारा राज'
'जल-जमिन-जंगल हमारा है |'
या घोषणांचा टाहो
आमच्या हद्दीपुरताच ऐकू येतोय
हद्दीबाहेर डरकाळी फोडली तर
आपल्या कातड्याच्या ढोलाचा आवाज
दूरदूरपर्यंत ऐकू जाईल....
२.
खबरदार
तुम्हा उघड्या- नागड्या लोकांना
आंदोलन करता येतं रस्त्यावर ?
कोरोनाच्या जमावबंदीचे आदेश धडकतील
डाव्या विचारसरणीचा शिक्कामोर्तब करतील
आणि मग तुम्हीही असाल नजरकैदेत.
आमचा आंदोलनजीवी पुढारी
कुठे झाला अचानक गायब
दिशा भटकवत.... ?
३.
खदाणीत
अख्खा डोंगर गेला आमचा
पुर्वज दैवतांच्या जागा, झाडं, कंदमुळं
अहो पोट गेलयं आमचं...
रानोमाळ भटकणारे खदाणीच्या खड्यात
करतील उदरनिर्वाह ?
आदिम जगण्याच्या नोंदी
जर टिपता आल्या तुम्हाला
तर सांगावं,
आमचं वैभव भकास करुन
खदाणीने जगात विकास कुठे झाला ??
४.
आम्ही साले गांडू
ना इकडचे, ना तिकडचे
फक्त बोंबलत सुटतो
आणि होत राहते मुस्कटदाबी कधीही.
'यहाँ बोलना मना है !'
तरीही
बोलत राहीलोच क्रांतीची भाषा
तर तुम्ही कधीही होवू शकता 'देशद्रोही'.
- अविनाश पोईनकर
•••••••••••••••••••
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें