पूर्व विदर्भातील झाडीबोली सर्वांर्थाने वाड्मयीन अंगाने बहरते आहे. बोलीचं वैभव जपणं आणि जोपासनं ही त्या-त्या प्रदेशातील साहित्यिकांची नैतिक जबाबदारी असते. ही जबाबदारी चंद्रपूरातील दिघोरी या गावाचे कवी सुनील पोटे यांनी केवळ जपली नव्हे, तर 'आंबील' या अक्षर कवितासंग्रहाने झाडीबोलीला श्रीमंत केले. 'आंबील' हा त्यांचा पहिलाच संग्रह. मात्र या संग्रहात नवतेच्या खाणाखुणा कुठेही दिसत नाही. अष्टाक्षरीत झाडीबोलीचं शब्दसौष्ठव घेऊन त्यांची कविता बोलीतून लुप्त होत जाणाऱ्या शब्दांची गुंफण करते, त्याची सुगंधी माळ थेट वाचक-रसिकांना मोहवून सोडते. मग आस्वाद घेण्याशिवाय पर्यायच उरत नाही.
जुन्या जान्या मडक्याची
तोंडी फोडून तयार
कडधान्ये तेथी भाजे
त्याले मनाचे ढोबर
आता मडके फोडून ढोबरी तयार करण्याचे दिवस गेले. ढोबर हा शब्द देखील नव्या पिढीपासून दुरावत चाललाय. नागपंचमीला लाया, दारया, फुटाने फोडण्यासाठी ग्रामीण भागात ही ढोबर आता क्वचित सापडते. कवीची पार्श्वभूमी ग्रामीण असल्याने अस्सल ग्रामवेणा या संग्रहातून क्षणोक्षणी अधोरेखित होते.
हाता आले किती फोड, कई जरले लुगडे
कष्टाळल्या पुस्तकाचे, सांग किती वाचू धडे
बाय मातीच्या चुलीत, रोज जारुन सोताले
अन्न शिजवून देते, खाया गरम पोटाले
'चूल' या कवितेतील त्यांची ही भावना सर्वहारा चूलीभोवतीचं वास्तव दाखवते. या संग्रहातील कविता गावरान मनाच्या आहेत. पिरमाचा चिखल करणा-या आहेत. चुरन्याची सिदोरी बांधणा-या आहेत. गवताचा वझा रेंगीवर वाहणाऱ्या आहेत. पोट रितचं गाडगं म्हणत कास्तकारांच्या वेदनांची सल उकल करणा-या आहेत. एकंदरीत या कवितासंग्रहात समाविष्ठ ६८ कवितांपैकी कोणत्याही कवितेच्या डोहात उतरले तरी लयबद्ध आशय आणि अभिव्यक्तीचं अक्षरमुल्य गवसते.
झाडीपट्टीची बोतरी, जशी मायेची चादर
घरापुट पांघराले, म्हणे आतशा वाकर
शाली सारका वापर, म्हाताऱ्याचे ती स्वेटर
झोप निवांत लागते, मनी अजून आदर
आता 'बोतरी' हा शब्द गावगाड्यातून हळूहळू हद्दपार होतोय. कवी मात्र आपल्या पारंपारिक संस्कृतीचा आदर करून या बोतरीची महती सांगतो. तुर दाळीच्या चवीष्ठ आरनाचा अभिमान व्यक्त करतो. मिक्सरच्या आधीच्या पाटावरुला युगात घेवून जातो. भूजल्या मासऱ्याच्या झोऱ्याचे गुणधर्म मांडतो. कवीचं अनुभवविश्व अस्सल व प्रामाणिक असल्याचा पुरावा या संग्रहातील प्रत्येक कविता देते, हे कवी आणि कवितेचं यश आहे.
झाडीबोली साहित्य चळवळीचे पितामह डॉ.हरिश्चंद्र बोरकर, आचार्य ना.गो.थुटे, हिरामण लांजे, राजन जयस्वाल, अंजनाबाई खुणे यासह झाडीपट्टीतील प्रतिभावंत कवींच्या पंगतीत सुनील पोटे यांची कविता शोभून दिसणारी आहे. ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांचे ब्लर्ब आणि कवींना ऊर्जा पुरवत फुलवणारे चळवळे अभ्यासू कवी अरुण झगडकर यांची प्रस्तावना या कवितासंग्रहाला सौंदर्य बहाल करते. पंढरपूरच्या समिक्षा पब्लिकेशनने या संग्रहाची उत्तमोत्तम निर्मिती केली आहे. खरेतर कवितासंग्रह कितीही चांगला असला तरी योग्य वितरणाअभावी चोखंदळ वाचक, समीक्षकापर्यंत पोहोचत नाही, हे दुर्भाग्य आहे. आंबील हा कवितासंग्रह नव्या लेखकांच्या कलाकृतीकडे डोळसपणे पाहण्याचा दृष्टिकोण प्रदान करणारा आहे.
'आंबील' या नावाने कवितासंग्रह प्रकाशित करून या शब्दाचा खरेतर कवीने गौरव केला आहे. आंबील हे विशेषता झाडीपट्टीत गहू, तांदूळ, मका, ज्वारीच्या पिठापासून बनवला जाणारा पुष्ठीदायक अन्नपदार्थ. सर्वसामान्य शेतकरी, कामगार, शेतमजूर कुटुंबाचा आंबील हा जगण्याचा भाग असतो. उष्माघातापासून बचावासाठी आंबील या पातळ पेयाची मजाच न्यारी. कवी हे प्राथमिक शिक्षक आहेत. त्यामुळे त्यांच्या कवितेची भाषाशैली साधी सरळ, सोपी आणि रसाळ आहे. हा कवितासंग्रह वाचतांना बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा आपण आस्वाद घेतोय, याचा क्षणभर भास होतो. बिंद्राबन, बहुला, उकर, भाटो, पांद, भुलाई, संदूक, ढोली, झाडन्या, सेनी, दंडार, ढगल्या, रोवना, चुरना यासारख्या बोलीतील चपखल सौंदर्यशाखा कवी कवितेतून उजागर करतो. गावगाड्यातील दैनंदिन जीवनातील अस्सल प्रतिमा, प्रतीके वापरून ही कविता शब्दांचा मोहोळ बनवते, अन मधाचा गोडवा वाटत जाते.
झाडीपट्टीच्या बोलीले, यक अनोकी झालरं
नसे सुटी नी चिल्लर, झाडीबोली कलदार
कोणी म्हणो गावंढळ, कोणी म्हणोत गावटी
बोलीमंदी झाडीबोली, जणू रुपवान नटी
कोणतीही भाषा उच्च-नीच नसते. आपल्या माईची बोलीभाषा ही सर्वोच्च असते. आपल्या माईच्या भाषेचे सेवक होणे अन् भाषेला जगवणे हा काव्यस्वर कवी सुनील पोटे यांनी अगदी मनःपूर्वक जपला आहे, नव्हे बोलीला श्रीमंत केले आहे. 'आंबील' या झाडीबोलीतील कवितासंग्रहाला टाळून पुढे जाता येणार नाही, इतक्या सामर्थ्याची काव्यबीजे यात आहेत. यासाठी रसिक-वाचकांनी कवीच्या या आंबीलीची न्यारी चव घेणे महत्त्वाचे आहे.
•••••
'आंबील'
कवितासंग्रह
कवी : सुनिल पोटे, ८३२९३५९८९४
समीक्षा पब्लिकेशन, पंढरपूर
मूल्य : १०० रुपये
•••••
• रसग्रहण
- अविनाश पोईनकर, चंद्रपूर
संपर्क : ७३८५८६६०५९
••••••••••••••••••••••••••••
खूप छान लिहिलं सर 👌👌🌹
जवाब देंहटाएं👍👍सुंदर
जवाब देंहटाएंअविनाश दादा... खूप छान लेखन केले. खरोखरच आंबील हा कवितासंग्रह ग्रामीण भागातील प्राचीन काळापासून चालत आलेल्या रूढी परंपरा गुणवैशिष्ट्ये प्रतिनिधित्व करते आणि ते तुम्ही आपल्या समीक्षण आतून मांडलेले आहात.
जवाब देंहटाएंअविनाश दादा
जवाब देंहटाएंअतिशय खोलात जाऊन रसग्रहण केलात.मला कवितेतून जे मांडायचे होते ते चपखलतेने वर्णिलात.आपले शतकोटी आभार
फारच सटिक रसग्रहण. फार सुंदरतेने व्यक्त झालात आपण आंबील वर...
जवाब देंहटाएं