बुधवार, 15 मई 2019

राजू केंद्रे : वळवळ आणि चळवळीतून प्रेरणा देणारा कलंदर

• समाजभान - १


राजू केंद्रे : वळवळ आणि चळवळीतून प्रेरणा देणारा कलंदर
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


(झाडी प्रदेश व पर्यायाने विदर्भात नवी पिढी विविध क्षेत्रात काम करीत आहे. सामाजिक चळवळी व प्रवाहातून काही तरुण समाज परिवर्तनाच्या लढाईत थेट प्रबोधनाचा वसा घेत आहेत. सामाजिक दृष्टिकोनातून समाजाचं निर्मळ रूप साकारू पाहत आहेत. अशा पडद्यामागच्या तरुणाईच्या कर्तुत्वाची ओळख यानिमित्ताने उलगडता यावी म्हणून हे 'समाजभान' सदर.....)

•••


              प्रत्येक वेळेस तरुणांना शिवी हासडणारी मंडळी समाजात काही कमी नाही. 'तुला काय कळतं ?' हा शिक्का कित्येकांना तरुणाईच्या कपाळावर कोरावा वाटत असेल. पण ही तरुणाई गुलाम नाहीत. तरुणाईची भाषा हीच समाजाची खरी चेतना. वळवळ केल्याशिवाय चळवळ उभी होत नाही, चळवळीतून उभे होणारेच खरे कलंदर असतात. पर्यायाने समाजाला प्रेरणा देतात.

                   राजू जिजाबाई आत्माराम केंद्रे, वय वर्षे २५. समाज हा या तरुणाचा आत्मा. परिवर्तन हे त्याचे ध्येय. गोष्ट छोटी डोंगराएवढी असे त्याचे कर्तृत्व. विदर्भात बुलढाणा जिल्ह्यातील  लोणार तालुक्यात पिंप्री (खंदारे) या छोट्याशा गावातून पुढे सरसावलेला हा तरुण. शेतकरी कुटुंबातून धडपडणारा राजू आज समाजातील विविध प्रवाहांना फक्त स्पर्श करत नाही तर संवेदना ओळखून थेट काम करतो. देशात नामांकित तुळजापूर येथील टाटा इन्स्टिट्यूटमध्ये (TISS) 'ग्रामिण विकास' विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेला राजू स्वतःच्या गावापासून सुरुवात करून इतर गावात विकास प्रक्रियेचे धोरण आखतो. संपूर्ण राज्यात सोशल मीडियातून विधायक कामासाठी समविचारी युवकांची चळवळ उभी करतो. गावागावात वाचनालये निर्माण करतो. मेळघाटातील कोरकू आदिवासींचं सक्षमीकरण असो की चोर समजल्या जाणाऱ्या पारधीबेडा येथील लोकांना आत्मनिर्भर करणे असो, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हा तरुण शिक्षणासोबत सतत धडपडत आहे.

             दोन वर्षांपूर्वी राजू सोबत झालेली ओळख आणि त्याचं जवळून पाहिलेलं काम त्याच्या वयाला दुप्पट करणार होतं. दहावीत ८७% टक्के घेऊन बुलढाणा येथे शिक्षणासाठी आल्यावर राजूला आधी डॉक्टर होवून समाजासाठी झिजावं वाटलं. 'ताई मी कलेक्टर व्हयनू' हे पुस्तक वाचल्यावर यूपीएससी करून प्रशासनात यावं वाटलं. त्याच कोवळ्या वयात डॉ. प्रकाश आमटे यांचं 'प्रकाशवाटा', चंद्रकांत वानखेडे यांचे 'आपुलाची वाद आपणाशी', एकनाथ आव्हाड यांचे 'जग बदल घालुनी घाव', पी साईनाथ यांचे 'दुष्काळ आवडे सर्वांना' यासह मनाला चेतवणारी पुस्तके वाचून काढली.  पुस्तकातून माणूस घडतो तसा राजू घडत गेला. सतत वेगवेगळे प्रयोगशील उपक्रम राबवून काम करीत राहिला.

           राजू ची काम करण्याची पद्धत फार निराळी आहे. वयाच्या विशीत अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथे काही मित्रांसह बालमृत्यू व कुपोषणमुक्तीवर काम करण्यासाठी 'मेळघाट मित्र धडक मोहीमेत' २०१२ साली सहभाग घेतला. अजूनही प्रत्येक पावसाळ्यात राज्यभरातील तरुण धडक मोहिमेत सहभागी होऊन जमेल ते करतात. धडक मोहीम म्हणजे सामाजिक क्षेत्रातलं एक मुक्त विद्यापीठ. २० वर्षापासून सुरू असलेल्या या मोहिमेचा राजू सात वर्षांपासून समन्वयक आहे. यात हजार पेक्षा जास्त युवकांनी सहभाग नोंदवला आहे. बालमृत्यू, कुपोषण सोबतच राजू ने हाती घेतले ते लोकांचे प्रश्न. यासाठी आंदोलने केली. वारंवार बैठका घेतल्या. न्याय व हक्कासाठी माहितीच्या अधिकाराचे शस्त्र वापरले. ग्रामसभा सक्षमीकरण, हक्काच्या शासकीय योजना, रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी व्हावी यासाठी राजू प्रत्यक्ष राबत आहे. आदिवासी संस्कृती त्यांचा सच्चेपणा राजूसह धडक मोहिमेत सहभागी युवकांच्या जीवनात परिवर्तन करणारे ठरले.

              'हात लगे निर्माण में, नही मागणे नही मारणे' या कर्मयोगी बाबा आमटे यांच्या संकल्पनेतील सोमनाथ शिबिरासह राजूने देशभरातील ५० पेक्षा जास्त विविध विषयावरील शिबिरात सहभागी होऊन स्वतःचा वैचारिक बाज काबीज केला. हल्ली तरुणांना तयार करण्यासाठी राजू स्वतः शिबिरे आयोजित करतो. देशातील निवडक युवकांसह जागृती सेवा संस्थेकडून भारतभर जागृती यात्रेत राजूचा सहभाग होता‌. देशातील सामाजिक प्रवाहांना वळण देणारे वेगवेगळे स्थळ, व्यक्ती यांच्या भेटीगाठी घेत, चर्चा करत राजूची वैचारिक जडणघडण भक्कम झाली आहे.

            राजूने 'मुख्यमंत्री फेलोशिप' च्या माध्यमातून दीड वर्ष यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील इंद्रठाना ग्रामपंचायत अंतर्गत 'पारधीबेडा' येथे केलेले काम उल्लेखनीय आणि दिशादर्शक ठरले. जन्मजात चोर व गुन्हेगार समजल्या जाणाऱ्या पारधी समाजातील या वस्तीत कधी प्रशासन पोहोचले नाही. तेथील भकास चित्र पाहून राजू अस्वस्थ व्हायचा. पारधी बेड्यातच राजूने मुक्काम ठोकला. ही साधी भोळी माणसं किती प्रेमळ आहे, आणि लोक यांना चोर का समजतात ? हा माणुसकीला गहिवर आणणाऱ्या प्रश्नासह राजूने पुढचे पाऊल टाकले. स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, शासकीय योजना थेट या लोकांपर्यंत पोचवणे, माहिती देणे हे राजूचे नित्यक्रम. ३१ डिसेंबरच्या रात्री 'थर्टी फर्स्ट पार्टी' ही दारूने नव्हे तर दूध पिऊन पारधीबेड्यात राजूने साजरी केली. कु.श्वेता रंगारी ही दहा वर्षाची चौथ्या वर्गात शिकणारी मुलगी. राजूच्या स्वच्छ संस्काराने तिने आपल्या वडिलांपुढे हट्ट धरला, 'बाबा, जोपर्यंत तुम्ही घरी शौचालय बांधणार नाही तोपर्यंत मी शाळेत जाणार नाही.' मुलीच्या हट्टापायी वडिलांना शौचालय बांधावे लागले. हे यश आहे राजूच्या कार्यपद्धतीचे. अंजूता भोसले हिची ही अशीच कहाणी. पारधी समाजातील ती पहिली 'एस.टी चालक' म्हणून नोकरीस लागली.  पारधीबेड्याच्या जागेचा प्रश्न, शाळा, अंगणवाडी राजूने आपल्या संकल्पनेतून अत्याधुनिक केले. गावाचा विकास फक्त रस्ते आणि गटारीतून होत नाही तर मानवी मनाच्या विकासातून होतो हे राजू ने सिद्ध केले. राजूच्या प्रयत्नानेच आज पारधीबेड्यात प्रशासन थेट पोहोचले आहे.

              महात्मा गांधींनी म्हटले होते, 'लोकांकडून आधी शिका. लोकांसाठी नाही तर लोकांसोबत काम करा.' या वाक्यावर राजूचा ठाम विश्वास आहे. वयाच्या बावीशीत ग्रामीण विकासाचे शिक्षण घेतल्यावर स्वत:च्या गावात काम करावं, या उद्देशाने ऑगस्ट २०१५ मध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक लढवण्याचे ठरवले. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व पुढाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. गावातील राजकारण आणि गटबाजी तसे सामाजिक प्रतिष्ठेचे विषय. युवकांचे आदर्श गाव पॅनल उभे केले. १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर कामाचा जाहीरनामा लिहून राजूने ग्रामपंचायतीला दिला. 'आम्ही राजकारण नव्हे समाजकारणातून गावाचा कायापालट करू' या उद्देशाने स्टॅम्प पेपरवर जाहीरनामा लिहून देणारी पिंप्री ग्रामपंचायत निवडणूक ही राज्यात पहिली ठरली. राज्यभरातील मित्रांनी या तरुणांना निवडणुकीसाठी मदत केली. राजू आणि त्याचे युवकांचे पॅनल मात्र या राजकारणाच्या खेळात बळी ठरले. निवडणूक हरले, पण राजू हरला नाही. तरुणातील नेतृत्वाच्या विकासासाठी तो अजूनही झटत आहे.

           सर्वसामान्य कुटुंबातील मुले शिक्षणातूनच पुढे येऊ शकतात. शिक्षणासाठी काम करावं, यासाठी राजूने 'एकलव्य' नावाची चळवळ उभी केली. त्याची सुरुवात स्वतः गावात सहा-सात वर्षांपासून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी व युवक वर्गासाठी घरी छोटसं ग्रंथालय सुरू करून केली. राजूच्या कार्यपद्धतीवर राज्यातील युवकांचा विश्वास असल्याने एक नवी फळी 'एकलव्य' च्या माध्यमातून राज्यभर उभारण्यात राजूला यश आले. युवकांना घेऊन 'पुस्तक संकलन केंद्र' उभे केले. यवतमाळ, पुणे, मुंबई, औरंगाबाद, ठाणे, अहमदनगर, उस्मानाबाद, अमरावती या शहरात एकाच दिवशी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करून ३० हजार पुस्तके गोळा केली. यातून राजूने तीस गावात वाचनालये उभी करण्यासाठी पुस्तके देऊन सहाय्य केले. सहा शाळा डिजिटल करण्यासाठी मदत केली आहे. यंदा एक लाख पुस्तके गोळा करण्याचे उद्दिष्ट आहे. याची दखल म्हणजे एकलव्य मॉडेलला 'पीपल चॉईस अवार्ड' ने देखील महाराष्ट्र शासनाने सन्मानित केले. 

               राजू हा सध्या यवतमाळ येथील सावित्री ज्योतीबा समाजकार्य महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करतोय. येथेही त्याने दोन वर्षा आधी एकलव्य अकादमीची सुरुवात केली. ग्रामीण विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणातील टक्का वाढावा, समाज परिवर्तनासाठी तरुण कार्यकर्ते निर्माण करावे यासाठी 'एकलव्य' ही महाराष्ट्रात चळवळ म्हणून आता उदयास येत आहे. आर्थिक दुर्बलता, पालकांचे ठराविक करियर बाबत अट्टाहास व इतर कारणे ओळखून एकलव्य अकादमी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी 'सपोर्ट सिस्टीम' म्हणून राज्यभर काम करत आहे. याचा सकारात्मक परिणाम म्हणजे देशातील प्रतिष्ठित विद्यापीठे आणि शैक्षणिक सस्थांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवण्यसाठी एकलव्य टीम मदत करत आहे. जवाहरलाल नेहरू यूनिवर्सिटी दिल्ली, टाटा सामाजिक विज्ञान संस्था, भारतीय प्रौद्योगिकी संस्था (IIT) मधील सामाजिक विज्ञान आणि मानव विद्याशाखा भारतीय, दिल्ली विद्यापीठ, आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई, अजीम प्रेमजी विद्यापीठ बंगळूरू, कर्वे समाजकार्य संस्था पुणे, निर्मला निकेतन मुंबई, गांधी रिसर्च सेंटर या नामांकित महाविद्यालये, विद्यापीठात एकलव्य चे विद्यार्थी प्रवेश घेऊन यशस्वी होत आहे. पहिल्या बॅच मध्ये ७ विद्यार्थ्यांना टाटा सामाजिक विज्ञान संस्था आणि अजीम प्रेमजी विद्यापीठ बंगळूरू येथे पाठवण्यात यश आले. दुसर्‍या बॅच मध्ये ६० विद्यार्थ्यांनी टाटा सामाजिक विज्ञान संस्था आणि अजीम प्रेमजी विद्यापीठ बंगळूरुसाठी प्रवेश परीक्षा दिली. जवळपास ३० विद्यार्थांनी या संस्थांमध्ये प्रवेश मिळवला. २० विद्यार्थी टाटा सामाजिक विज्ञान संस्था आणि १० अजीम प्रेमजी विद्यापीठ बंगळूरु येथे निवड झाले. १५ विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत. नवीन बॅच मध्ये ७५ पेक्षा जास्त विद्यार्थी तयारी करत आहे. ग्रामीण तरुणांना दर्जेदार आणि  रोजगारक्षम शिक्षणाची गरज ओळखून राजूने घेतलेला पुढाकार सच्चा शैक्षणिक प्रबोधनकाराचं द्योतक आहे. पुढील दशकभरात एकलव्य अकादमीच्या माध्यमातून किमान २००० समाजाचे डॉक्टर,  विकासाचे दूत उच्च शिक्षण घेऊन स्वतः घडतील व समाजाला घडवून एकलव्याच्या चळवळीत वाटा उचलतील, असे राजू बोलून दाखवतो.

               वयाच्या पंचविशीत काम करणारा हा कार्यकर्ता परिस्थितीचे कारणे सांगत बसत नाही.  प्राध्यापकी करताना त्याचे सामाजिक भान चौफेर असते. मागील वर्षी केरळ येथे झालेल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रा.दरणे व ८५ विद्यार्थ्यांच्या टीमसह राजू धावून गेला. दोन आठवडे पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला. यवतमाळातील शेतकरी आत्महत्या आणि दुष्काळ हा पाण्याशी निगडित असणारा प्रश्न. यंदा सहा तालुक्यातील बारा गावात ७० विद्यार्थ्यांना सोबत घेऊन पाणी फाउंडेशनच्या  मोहिमेत फावडी, कुदळ हातात घेऊन स्वतः श्रमदान केले. साहित्य संवर्धनाच्या बाबतीतही राजू चे योगदान महत्त्वपूर्ण आहे. यंदा यवतमाळ येथे पार पडलेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात राजूचा सक्रिय सहभाग होता.  ३०० स्वयंसेवकांच्या सहाय्याने 'स्वयंसेवक समिती प्रमुख' म्हणून संमेलनाच्या यशस्वीतेत खारीचा वाटा उचलला. राजूला अजून बराच पल्ला गाठायचाय. संताच्या भूमीचा सजग वारसा विचार आणि कृतीतून राजू सारखे असंख्य तरुण संवर्धन करीत आहे. गरज आहे समाजाने त्यांना पाठबळ देण्याची !



-अविनाश पोईनकर
    बिबी, चंद्रपूर
मोब. ७३८५८६६०५९
avinash.poinkar@gmail.com

===========================

16 टिप्‍पणियां:

  1. सुरेख लिव्हल भाउ
    सलाम राजुच्या कार्याला

    जवाब देंहटाएं
  2. खूप छान ।
    अप्रतिम भाऊ👌👌👍

    जवाब देंहटाएं
  3. राजू केंद्रे यांनी केलेले महत्त्वपूर्ण कार्य खरेच उल्लेखनिय आहे.

    जवाब देंहटाएं
  4. राजू सरांचे कार्य अतुलनीय आहे...माझ्यासाठी तर तर आदर्श आहेत ...🙏🙏😊

    जवाब देंहटाएं
  5. उत्तम कार्य आहे.... चळवळ मोठी होत राहो हीच प्रार्थना

    जवाब देंहटाएं
  6. Amazing work...by amazing person.. Long way to go raju da😍

    जवाब देंहटाएं
  7. राजू भाऊ तुमच्या कार्याला सलाम आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा

    जवाब देंहटाएं
  8. खुप सुंदर, प्रा राजु केंद्रे जिल्हा समन्वयक संतोष गवळे सरयांच्या मुळे माझे मित्र झाले, पाणी फाउंडेशनच तालुका समन्वयक म्हणून त्यांनी माझे कडे सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालय येथील विद्यार्थी यांना चार दिवसीय प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी प्रस्ताव दिला मी जिल्हा समन्वयक अशोक बगाडे सर यांना दिला त्यांनी झेप नल चिन्मय सर यांची परवानगी घेऊन खडकी येथे मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक, समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची खास बँच घेतली, त्याचा फायदा झाला अनेक तालुक्यात प्रशिक्षणाथी विद्यार्थी मुक्कामी राहुन श्रमदान करण्यासाठी मदत केली ,वातावरण निर्माण केले,

    जवाब देंहटाएं
  9. अप्रतिम लिहले तुम्ही ,,व राजू यांच्या कार्याला सलाम

    जवाब देंहटाएं
  10. Aaplya karyasathi mapasum khup khup shubhechchya sir and salute sir #longwaytogo#...

    जवाब देंहटाएं

दंडकारण्यातील आदिवासी बांधवाच्या जीवनाचं खरंखुरं धगधगत वास्तव : दंडकारुण्य

- राजू गरमडे, चंद्रपूर कवीमिञ, मुक्तपञकार, सामाजिक युवा कार्यकर्ते, आदिवासी भागात जाऊन कार्य करणारे अविनाश पोईनकर एका कार्यक्रमामध्ये भेटले....