सोमवार, 9 जुलाई 2018

पावसाचे गाणे...


ध्यानी मनी ओलावते
पावसाचे गाणे
शेत शिवारात डोले
वट्यातले दाणे..

लगबग वावरात
टिबण्याची घाई
धु-याकाठी नाल्यामध्ये
उतरले भोई...

वखराला जुंपलेले
हंबरते बैल
सरत्याच्या बुळाखाली
बिजांकुरे सैल...

भाजी भाकरीला चव
घामातून येते
अंग जरी गारठले
ऊब माती देते...

रातच्याला घरामधी
जिव्हाळ्याचे बोल
जग सारे पोसण्याला
डोळे जाई खोल...

कधी अवकाळी पाणी
माना डोलावते
पेरणीच्या संकटात
जीव खालावते...

भुईभोग सोसूनही
मान सदा ताठ
मातीवर भरवसा
जगण्याचा पाठ...

हंगामाच्या बाजारात
पुरतील दाणे
याच एका आशेसाठी
पावसाचे गाणे...

 - अविनाश पोईनकर
     बिबी, जि.चंद्रपूर
     7385866059

====================

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

दंडकारण्यातील आदिवासी बांधवाच्या जीवनाचं खरंखुरं धगधगत वास्तव : दंडकारुण्य

- राजू गरमडे, चंद्रपूर कवीमिञ, मुक्तपञकार, सामाजिक युवा कार्यकर्ते, आदिवासी भागात जाऊन कार्य करणारे अविनाश पोईनकर एका कार्यक्रमामध्ये भेटले....