गुरुवार, 30 जून 2022

कृष्णाजी नागपूरे : बहुआयामी समाज शिक्षक !



 गुरुजींनी ऐसे द्यावे धडे |

आपुला आदर्श ठेवूनी पुढे |

विद्यार्थी तयार होता चहुकडे |

राष्ट्र होईल तेजस्वी ||

वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी शिक्षकांकडून ही आशा व्यक्त केली. या आशेला समाजशिक्षक, तत्ववेत्ते कृष्णाजी नागपुरे गुरुजी खरे उतरले. पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात त्यांची बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून समाजमनाला ओळख आहे. कर्तृत्व-वक्तृत्व-नेतृत्वाचा त्रिवेणी संगम त्यांच्या कृतीत दिसतो. वंचित घटकातील समाज परिवर्तनाच्या लढाईत पुढे यावा, यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले. समाजचेतना रक्तात भिणली तर कार्यकर्ता उदयास येतो. गुरुजी हाडामासाचे सच्चे कार्यकर्ते आहेत. भटक्या-विमुक्त, मागासवर्गीय समाजासाठी, विशेषता हातावर आणून पानावर खाणारे भोई-ढिवर या मासेमारी करणाऱ्या समाजाचे ते आधारस्तंभ आहेत. विद्यार्थ्यांना घडवणारे मार्गदर्शक आहेत. चार भिंतीच्या पलीकडे असणाऱ्या वंचित समाजाची धुरा सांभाळणारे आदर्श मुख्याध्यापक आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील बहुआयामी पदर उलगडणे म्हणजे ज्ञानपीठाचा साक्षात्कार आहे. 

भांदक म्हणून ओळखले जाणारे ऐतिहासिक भद्रावती शहर. या शहराच्या पूर्वेला डोलारा नावाचा मोठा तलाव. हळदीच्या शेतीसाठी उपयुक्त वातावरण. या परिसरात असणा-या ढीवर समाजाच्या झिंगूजी वार्ड वस्तीत एका सामान्य शेतकरी कुटुंबात कृष्णा उर्फ कृष्णाजी नागपुरे गुरुजींचा जन्म झाला. १ जुलै १९३७ हा दिवस. वडील घुलारामजी नागपूरे व आई राईबाई आनंदविभोर झाले. आजोबांच्या नावावरून त्यांचे नाव किसन ठेवण्यात आले. कुटुंबात ते थोरले. त्यानंतर त्यांच्या पाठीमागे बहीण अंजनाबाई, भाऊ रामदास व रमेश त्यांचा जन्म झाला. स्वातंत्र्यापूर्वीचा काळ त्यांनी अनुभवला. बालपणात ते अत्यंत प्रामाणिक आणि निष्ठावान होते. तल्लख बुद्धिमत्ता विकसित होत होती. प्रत्येक गोष्ट त्यांच्या पटकन ध्यानात येत असे. लहानपणी रानोमाळ मित्रांसोबत फिरणे, पक्ष्यांची गुल्लारीने शिकार करणे, तलावात पोहायला जाणे हे त्यांचे छंद. वडिलांना शेतीकामातही ते सहकार्य करित असत. 

तेव्हा भद्रावतीत ग्रामपंचायतीचे मारोतराव टिकले सरपंच होते. त्यांचे भाऊ भाऊराव टिकले हे शिवणकाम करायचे. त्यांच्याकडे बालपणी गुरुजी जाऊन गप्पागोष्टी करायचे. त्यांच्या कामाचे निरीक्षण करायचे. यातच त्यांनी शिवणकला हस्तगत केली. त्या काळात शिक्षणाला तसे फारसे महत्त्व नव्हते. त्यातही भोई-ढीवर समाजातील मुलांचा तर शाळेशी दूरदूरपर्यंत संबंध नव्हता. बुद्धिचातुर्य आणि कौशल्य त्यांच्यात विकसित होत असल्याने शिक्षणासाठी त्यांनी वडिलांकडे आग्रह धरला. वयाच्या १३ व्या वर्षी शाळेच्या पहिल्या वर्गात प्रवेश केला. तेव्हा भद्रावतीत जनपद शाळा होती. येथे सातवीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतले. त्यांच्या प्रेरणेने भावंडही शिक्षणाच्या प्रवाहात आले. सातवी पास झाल्यावर वयाच्या विशीत त्यांचे लग्न वरोरा तालुक्यातील चिकणी गावातील धोंडूजी डोंगरे यांची विवेकी कन्या लीला हिच्याशी झाला. लीलावती या नागपुरे घराण्याची सून झाली. त्या चौथा वर्ग शिकलेल्या. सुरुवातीच्या काळात नागपुरे गुरुजीं शिवणकाम करायचे. कैकाडी महाराजांचे शिष्य रामानंद स्वामी यांचे भद्रावतीत किर्तन होते. त्या कार्यक्रमात 'आपणच आपले वाली व्हा' हे पुस्तक त्यांच्या हाती लागले. शिक्षक प्रशिक्षण प्रवेशाच्या तयारीसाठी ते प्रेरक ठरले. लगेच पुढील वर्षी चंद्रपुरातील जुबिली हायस्कूलमध्ये १९५५ ते १९५७ दोन वर्षाचे शिक्षक प्रशिक्षण पूर्ण केले. ते चित्रकलेत ही पारंगत होते. क्रीडा आणि संगीत त्यांची आवड होती. सुधीर फडके यांचे गीतरामायणाचे गाणे तेव्हा खूप गाजत गाजायची. त्यांनी हार्मोनियमचा सराव केला. चंद्रपुरात विविध ठिकाणी गीतरामायणाची कार्यक्रमे केली. हे कार्यक्रम पुढे जिल्हाभर विस्तारले. यातच आपण मॅट्रीक पास व्हावे म्हणून त्यांनी १७ नंबरचा फॉर्म भरला. तयारी सुरू केली. त्यात ते विदर्भ बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन मधून पहिले मेरिट आले. 'चांद्याचा किसन नागपुरे विदर्भातून पहिला आला' ही वार्ता सर्वत्र पोहोचली. शिक्षक वर्तुळात त्यांची आदर्श प्रतिमा निर्माण झाली. 

चंद्रपूरातील प्राथमिक शाळांच्या क्रीडा स्पर्धाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आले होते. ३३ प्राथमिक शाळेतील एक हजार मुले शिस्तीने रांगेत क्रीडांगणावर उपस्थित होती. किल्ल्याच्या एका उंच व्यासपीठावर महाराजांची बसण्याची व्यवस्था होती. यावेळी कवायतीची जबाबदारी गुरुजींकडे होती. कवायतीच्या सुरुवातीलाच 'हिंदुस्तान देश महान, तत्पर रहे सदा सेवा मे, अर्पण कर दे प्राण, त्या करोगे परोपकार, देशोद्धार चमत्कार' मुलांकडून सादर करून घेतलेल्या घोषणांनी मैदान दुमदुमले. माहितीचे सादरीकरण बघून राष्ट्रसंतांनी प्रशंशा केली. 'इतके शिस्तशीर संचालन व कवायत मला याआधी जपान मध्ये बघायला मिळाले होते. त्यानंतर आता इथे चंद्रपूरात पाहायला मिळत आहे.' अशा शब्दात भाषणातून गौरव केला.

प्राथमिक शाळेत नोकरी करतानांच त्यांनी चंद्रपूरच्या जनता महाविद्यालयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. भूगोल या विषयात विद्यापीठात सर्वाधिक गुण घेऊन प्राविण्य मिळवले. तिथेच त्यांनी बि.एड या माध्यमीक अध्यापक पदविकेचे शिक्षण घेतले. त्यावेळी शासकीय माध्यमिक शाळा म्हणून ज्यूबिली हायस्कुलचा नावलौकिक होता. न्यू इंग्लिश ही सर्वात जुनी खाजगी शाळा. इथे भूगोल व मराठी विषयाचे शिक्षक मदनराव धनगर यांचे वडील हरिभाऊ धनगर हे निवृत्त झाले होते. त्यांच्या रिक्त जागेवर शिक्षकांची नेमणूक करण्यासाठी मुलाखती घेण्यात आल्या. विविध क्षेत्रात पारंगत असल्याची प्रमाणपत्रे गुरुजींकडे होती. शिवाय गुणवत्ताही. त्यांचं कर्तृत्व चंद्रपुरात शिक्षकी वर्तुळात परिचित होतं. १९६८ मध्ये गुरुजींची मराठी व भूगोल विषयासाठी माध्यमिक शिक्षक म्हणून निवड झाली. 

१९६८ ते १९९५ हा न्यू इंग्लिश शाळेतील त्यांचा शिक्षकी सेवाकाळ. या काळात त्यांनी शाळेतील मुलांना विषय ज्ञानासोबत संगीताचे ज्ञान दिले. मुलात राष्ट्रभक्ती जागवली. १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात केली. गुरुजींनी महात्मा गांधी, लोकमान्य टिळक यांच्यावर गाणी लिहिली. ती गाणी चित्रपटातील प्रसिद्ध चालीवर बसवून मुलांकडून ते म्हणवून घेत. नामांकित संगीतकार वसंत देसाई यांच्या गीतांच्या चाली त्यांनी आत्मसात केल्या. शाळेत आयोजित एका कार्यक्रमात संगितकार देसाई आले, तेव्हा त्यांनी पाठ्यपुस्तकातील कविता त्यांच्या चालीत बसवून विद्यार्थ्यांकडून सादर केल्या. स्वागत गीते, स्नेहसंमेलने, संचालने त्यांचे केवळ शाळेपुरते मर्यादित राहिले नाही तर बाहेरही कार्यक्रमात ते मंच गाजवू लागले. १९८२ साली चंद्रपूरातील १८ ते २० विद्यालय मिळून दहा मिनिटांची देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाची स्पर्धा नेहरू शाळेच्या पटांगणावर झाली. 

कोणे कोणे जाकर में देख आया |

सारे जग भारत मुझे एक नजर आया |

पहिल्याच वर्षी त्यांच्या कल्पनेतून साकारलेल्या 'विविधतेतील ऐक्य भावना' या विषयावर आधारित कव्वालीचे मुलांनी सादरीकरण केले. त्यात त्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. पुढे त्यांचे संगीतात प्रयोग सुरूच राहिले. कलावंत मनाला बहरवू लागले. याच कार्यकाळात त्यांनी हिस्लाॅप नाईट महाविद्यालयात देखील आठ वर्षे नोकरी केली. येथे देखील १९८७ ते १९९४ काळात सतत स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून मुलांच्या कलागुणांना वाव दिला. गुरुजींच्या स्वभावातील गुणविशेष, मनमिळावूपणा, प्रामाणिकपणा व चांगुलपणा यामुळे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांना बोलावणे यायचे. कौतुक व्हायचे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी हजारो सुसंस्कारी विद्यार्थी घडवले. आदर्श व विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्याची वाटचाल कायम न्यू इंग्लिश हायस्कूलच्या इतिहासात अधोरेखित झाली आहे.

गुरुजींनी व्यायाम क्षेत्रात खरे तर क्रांती केली. ते आजही पाण्यावर २० प्रकारचे योगासने करतात, हे अफलातून आहे. जलतरणाचे त्यांचे विशेष कौशल्य, संगीत, वाचन, चित्रकला, स्काऊट, देशी खेळ, गीत गायन, कवायती हे छंद त्यांनी जोपासले नव्हे, तर ते जगले आहेत. गुरुजी सिद्धहस्त साहित्यिक आहे. त्यांनी समाजप्रबोधनपर गाणी लिहिली. ती तालासुरात गायली. संगीतिकाचे लेखन, दिग्दर्शन केले. भोई समाज स्मरणिकेचे ते दरवर्षी संपादन करतात. 'भोई समाजातील महान व्यक्तीचित्रे, संगीतिका व गीते' हे त्यांचे पुस्तक म्हणजे भोई समाजाला त्यांनी दिलेली दिशा आहे. समाजातील क्रांतिकारी व्यक्तिमत्त्वांची गाथा या पुस्तकातून त्यांनी उजागर केली आहे. 

आपण ज्या समाजातून आलो त्या भटक्या विमुक्त समाजासाठी आपले देणे आहे, ही जाणीव त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात भोई-ढीवर समाजातील कार्यकर्त्यांची चळवळ उभी केली. चंद्रपूर जिल्हा भोई समाज सेवा संघाची स्थापना केली. १९९५ पासून ते या समाज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. भोई समाजातील मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावी म्हणून चंद्रपुरात एकलव्य मुलांचे वस्तीगृह दिमाखात उभे आहे. समाजातील शेकडो मुलांनी इथे राहून शिक्षण घेतले. अभ्यास करुन शासकीय स्तरावर नोकरी मिळवली. माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्यामार्फत भोई संघटनेला हे वसतिगृह मिळवून देण्यात गुरुजींनी मुख्य भूमिका निभावली. भनारा-भनारी-भनारे या उपजातींचा भोई समाजात समावेश करण्यात यावा, त्यासाठी त्यांनी मंत्रालयात पत्रव्यवहार करुन मुख्य भूमिका घेतली. त्यास न्याय मिळवून दिला. युवक-युवतींचे परिचय मेळावे, सामूहिक विवाह सोहळा भोई बांधवांच्या सहकार्याने आयोजित करून जिल्ह्यात आदर्शाची पेरणी केली. सामाजिक विषयांवर कार्यशाळा घेवून जागृतीचे धडे दिले. दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचे आयोजन चंद्रपूर जिल्हा भोई समाजाच्या वतीने करण्यात येते, त्याचे मुख्य सूत्रधार गुरुजी असतात. समाजाच्या विविध समस्या सोडवण्यासाठी विविध आंदोलने व मोर्चे यांचे आयोजन व संघटन बांधणी गुरुजी या वयातही तितक्याच ताकदीने करतात. शैक्षणिक जनजागृतीच्या चळवळी चालवतात. हे निश्चितच सोपे नाही. 

वयाच्या ८५ व्या वर्षात त्यांची क्रियाशील कामाची गती अत्यंत व्यापक, धडपड्या स्वभावाची आहे. मातृशक्तीचा ते आदर करतात. त्यांना चार मुली आहेत. चारही मुलींना त्यांनी उच्च शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले. माणूस म्हणून जगण्याचे स्वातंत्र्य दिले. गुरुजींचे सुसंस्कार केवळ कुटुंबापुरते मर्यादित राहीलेले नाही, त्यांच्या संपर्कात येणाऱ्या अखिल मानवजातीला मानवता शिकवणारे ठरले. या वयात त्यांच्या हाताची बोटे जरी क्विंचीत हलत असली तरी ते हातात पेन घेऊन लिहितात. संस्थेचे कामकाज करतात. अतिशय मृदू स्वभावाने जणू संतवाणीतून प्रबोधनाचे, कौतुकाचे, मार्गदर्शनाचे फव्वारे उडवतात. कोणतीही संघटना, समाज म्हटला की विरोध होतो. आरोप-प्रत्यारोप होतात. गुरुजी मात्र संवेदनशीलपणे साऱ्या गोष्टींना सामोरे जातात. रागावणे, भांडणे हे त्यांना कधी जमलेच नसावे. म्हणूनच भोई समाजाची चळवळ जिवंत आहे. या ऋषितुल्य व्यक्तिमत्वास मानाचा मुजरा. सलाम. गुरुजींचे शताब्दी वर्ष साजरे करण्याचे भाग्य आम्हास लाभावे, ही सुह्दय प्रार्थना !


- अविनाश पोईनकर, चंद्रपूर

संपर्क : ७३८५८६६०५९

 

••• ••• ••• ••• ••• ••• ••• •••



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

दंडकारण्यातील आदिवासी बांधवाच्या जीवनाचं खरंखुरं धगधगत वास्तव : दंडकारुण्य

- राजू गरमडे, चंद्रपूर कवीमिञ, मुक्तपञकार, सामाजिक युवा कार्यकर्ते, आदिवासी भागात जाऊन कार्य करणारे अविनाश पोईनकर एका कार्यक्रमामध्ये भेटले....