आई एक नाव असतं
घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं !
कवी फ.मु.शिंदे यांनी आई म्हणजे घराघरातलं जणू विद्यापीठच, ही भूमिका मांडली.
ममतेचा, प्रेमाचा, वात्सल्याचा धागा म्हणजे आई
जगी कोण आहे ज्याला नसे माई ?
प्रत्येक गोष्टीचा जन्म असतो. त्या जन्माची कहानी असते. त्या कहाणीची जननी म्हणजे आई. रामायन-महाभारत ते तुकारामगाथा पासून राष्ट्रसंताच्या ग्रामगितेपर्यंत सर्व महामानवांनी आईची थोरवी विषद केली. प्रत्येकाच्या जगण्यात आई हा धडा जिव्हाळ्याचा असतो. प्रत्येक बाळासाठी मग तो लहान-मोठा-चोर-डाकू कुणीही असो, आईचं काळीज मात्र सतत सारखंच काळजाच्या कप्प्यातून द्रवत असते.
तुझे नाव घेता मला धीर येतो
तुझ्या सावलीने फुलारुन जातो
तुझे पंख मजला उजेडात नेई
तुझी थोरवी या समुद्रात नाही...
बाप नावाचं आभाळ जसं असतं, तसंच माय नावाचा अथांग समुद्र देखील असतो. जो सर्वांना सामावण्याचा गुणधर्म कधीच सोडत नाही. जन्माला येणारं प्रत्येक बाळ आईच्या छायेत वाढते. मोठे होते. तीची कुस म्हणजे निस्सीम करुणेचं नातं सदोदीत दृढ करते. खरेतर आई या विषयावर काय आणि किती लिहावं ? हा प्रश्र्न सतत पडतो. जगातील सर्व लेकरांना ज्याची त्याची आईच सर्वश्रेष्ठ असते. आईशिवाय जगणे म्हणजे जगणेच अर्धवट. 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' असे म्हणतात ते मुळीच नव्हे !
हल्री प्रत्येक क्षेत्रात धकाधकीचं जीवन चाललंय. स्पर्धा चाललीय. यात नातेसंबंध, भावना, प्रेम हळूहळू दुय्यम होत आहेत. लग्नानंतर मुलांच्या संसारात विघ्न नको म्हणून आई सहज बाजूला होत असल्याचे आपण पाहतो. मात्र तिच्या ओलावलेल्या डोळ्यातील लेकरांसाठी केलेली साधना आपल्याला शोधता येत नाहीत. वृद्धाश्रमात आनंदाने वावरणारी माय आपण सहज पाहतो, पण तीची आतली वेदना आपल्याला ओळखता येत नाहीत. लेकरांच्या हितासाठी स्वत:चं काळीज हातात देणा-या मायेच्या पुराणकथा आपण ऐकल्यात. मात्र मायेला गुरुस्थानी ठेवून एकलव्य खरोखरच तयार होत आहेत का ? हा काळानूसार विचार करणे अगत्याचे झाले आहे.
स्वार्थाने बरबटलेल्या दुनियेत माय निस्वार्थ प्रेमाची उधळण अखेरच्या श्वासापर्यंत करत असते. मायेचं विश्व लेकरांच्या सुखासाठी प्रदर्शना घालण्याएवढचं असतं. कष्टकरी मातीत बीज पेरतो आणि त्याची जोपासणा करतो, तशी माय तळहाताला फोडं येवोत वा पायाला भेगा पडोत, तीच्या खपल्या सतत केवळ मुल-बाळ-घरासाठी उजळत असते. खरे तर आई असते तोपर्यंत आपल्याला मायेचं महत्त्व फार कळतं असं नाहीच. जेव्हा ती नसते तेव्हा मात्र आपलं काळीज सतत रक्तबंबाळ असतं. सात्वनाचा, धीराचा पाठीवर कुणाचा तो हात देखील नंतर शोधूनही मिळत नाही. 'सेवा परमो धर्म' असं म्हणतात, त्याची उतराई जीवंतपणीच मायेच्या सानिध्यात राहून फुलपाखरांसारखं भिरभिरत, चाफ्यासारखं सुगंध देत बहरण्यात आहे.
शेवटी इतकं नक्कीच,
आई असते संताहूनी संत
आसरा घेई तो भाग्यवंत !
-अविनाश पोईनकर
(१० जुलै २०२१, हेमलकसा)

माय माऊली ही खरंच निस्वार्थ प्रेमाची उधळण असते... फारच छान..
जवाब देंहटाएं