बुधवार, 27 मई 2020

स्टुडंट फोरम : युवकांची सकारात्मक शैक्षणिक चळवळ !

विशेष लेख 🌱



कोरपना तालुका हा नेहमी अतिदुर्गम, मागास व दुर्लक्षित असा समाजमाध्यमात वारंवार उल्लेखला जातो. काही गावे पाहिली तर हे वास्तव आपण नाकारू शकत नाही. परिसराचा शैक्षणिक आलेख जोपर्यंत उंचावत नाही तोपर्यंत मातीच्या प्रगतीचा सुगंध दरवळत नाही. खरे तर इथली माती आणि माणसातला कणखरपणा 'श्रममेव जयते'चं प्रतिक. 'लाथ मारीन तिथे पाणी काढीन' ही धमक कुळामातीने लिपलेल्या घराच्या भिंतीत उपाशीपोटी संघर्ष करणाऱ्या, अनवाणी पायाने धावणाऱ्या कित्येक रांगड्या पोरात जाणवतो. परिस्थितीने माणूस मरत नाही, उलट घडतो. जगण्याला नवी दिशा मिळते. मात्र हे ओळखता येणं तितकंच कठीण. बरं हे ओळखून काय करायचं ? कशाला उगीच डोक्याला ताप ? अशा कित्येक प्रश्नांचा गुंता सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या युवकांनीच सोडवला. आधी स्वतःला सिद्ध केले आणि इतरांना सिद्ध करण्यासाठी तालुक्यात चळवळ उभारली, स्टुडंट फोरम ग्रुप !



खरंतर आपल्या गावगाड्यांनी मास्तर आणि पोलीसांच्यावर 'साहेब' पाहिले नाही. 'शिकून कोणाचं भलं झालं?' हा नारा उच्चशिक्षण घेण्यापूर्वीच आजूबाजूचे लोक मनावर झोडपून काढतात. इच्छेला जिवंतपणी मृत्यू देणं हे किती महाभयंकर असतं, हे कित्येक अर्धवट शिकून बेरोजगारीच्या विळख्यात सापडलेल्या चेहऱ्यावरून दिसते. शिक्षणाला जितकं महत्त्व, तितकंच त्या वर्तुळातील गुणवत्तेला. गुणवत्ता ही जन्मजात नसतेच. ती घडवावी लागते. हीच सर्वसामान्य मुलातील गुणवत्ता हेरून विधायकतेने घडवण्याचं काम कोरपना तालुक्यात स्टुडंट फोरम ग्रुप करत आहे.



खरं तर मला या ग्रुप विषयी फारशी माहिती नाही. पूर्ण माहिती घेऊन लिहावं, तर ती अतिशयोक्ती त्यांना भावत नाही. मागील काही वर्षापासून तालुक्यात युवकांची सकारात्मक चळवळ स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून घडते आहे, हे मी उघड्या डोळ्यांनी पाहतोय. स्पर्धा परीक्षेत ग्रामीण विद्यार्थी टिकत नाही, सर्व पैशाचा खेळ असतो, अशा कितीतरी तरुणांच्या मनातील संकुचीत अंधश्रद्धा अगदी दाभोळकरांच्या विवेकशील व तर्कनिष्ठ विचाराप्रमाणे या ग्रुपने दूर केल्या. बरं ही विद्यार्थी संघटना आंदोलने, उपोषणे करते असंही नाही. आंदोलने आणि उपोषणाने प्रश्न सोडवण्यापेक्षा कृतीयुक्त अभ्यासाने, सामाजिक उपक्रमाने परिवर्तन घडवून सोडवता येतात यावर त्यांची खरी श्रद्धा आहे. अशा डोळस श्रद्धा घेऊन जगणाऱ्या युवकांनी स्पर्धा परीक्षेत मेरीट येवून प्रशासनात सामाजिकतेला डोळसपणे न्याय दिला, हे अत्यंत महत्वाचे व दिलासादायक आहे.



स्टुडंट फोरम ग्रुपच्या माध्यमाने गटविकास अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, कर सहाय्यक,  पोलीस, शिक्षक, लिपिक असे अनेक तरूण शासनाच्या विविध खात्यात कार्यरत आहेत. ही तरुणाई एकत्र येऊन इतरांना घडवण्याचा वसा या ग्रुपच्या माध्यमाने चालवत आहे. विशेषता या ग्रुपचा कोणी अध्यक्ष नाही. सचिव नाही. प्रत्येक तरुण हा कार्यकर्ता म्हणून काम करतो. मुळात तरुणांमध्ये संस्काराची पेरणी हा ग्रुप करत असल्याने तणकट वाढण्यापेक्षा जोरदार पीक उभे राहताना दिसत आहे. इथे ग्रुप मधील कुणाचेही नाव घेणार नाही. कारण या ग्रुपची धारणा आहे की आमचा प्रत्येक सदस्य कुठेच कमी नाही. सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे. कुणीही लहान मोठा नाही. कुण्या एका व्यक्तीचे नाव मोठे होण्यापेक्षा ग्रुपमधील सर्व सदस्य मोठे व्हावे, ही वैचारिकता पुढे येणे अत्यंत प्रेरणादायी आहे.



'एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ' या तत्त्वाप्रमाणे स्टुडंट फोरम ग्रुप तालुक्यातील प्रत्येक धडपडणाऱ्या मुलांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे. गावागावातून अधिकारी निर्माण व्हावेत, यासाठी प्रयत्नरत आहे. भाकर तुकड्यासाठी संघर्ष करणाऱ्या घरात आनंदाचे दिवस यावेत, यासाठी घराघरातल्या पोरांना शिक्षणासाठी प्रवृत्त करण्याचे जे धनुष्य हाती घेतले ते पेलण्याचे धाडस हा ग्रुप करतो आहे. कुठलेही काम श्रेष्ठ किंवा नीच नसते. आपली प्रामाणिकता महत्त्वाची असते. प्रत्येक तरुणाईमध्ये विश्वास निर्माण करून आशावादी ठेवण्यासाठी हा ग्रुप सातत्याने विधायक कार्य करतो आहे. दरवर्षी तालुक्यातील विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासूनच स्पर्धा परीक्षा कळावी, यासाठी लाखो रुपयांची शिष्यवृत्ती स्पर्धा हा ग्रुप घेतो. तालुक्यातील हजारो विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होतात. तालुक्यांमध्ये स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ज्या युवकांनी यश संपादन केले, अशा यशस्वीतांचा सत्कार सोहळा घडवण्यात हा ग्रुप पुढाकार घेतो. युवकांना स्पर्धा परीक्षेचे शाश्वत धडे मिळावे यासाठी मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शनाचे कार्यक्रम हा ग्रूप राबवतो आहे. तालुक्यात विविध क्षेत्रात ज्यांनी अतुलनीय कार्य करून ज्या व्यक्तिमत्वांने समाजापुढे आदर्श निर्माण केला, त्यांना 'कोरपना भूषण' या अत्यंत प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्याचे धाडस मागील काही वर्षापासून या ग्रुपने केले आहे. 



तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शैक्षणिक क्रांती घडावी. सामाजिक परिवर्तन व्हावे. यासाठी हवे ते सकारात्मक उपक्रम घेण्यासाठी हा ग्रुप कधीच मागे पडला नाही. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, महाराष्ट्राची माय, सिंधुताई सपकाळ यांचा जाहीर मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजिन करून समाजजागृतीचे व्रत विशी-तिशीतील युवकांनी हाती घेतल्याचे स्पष्ट दिसते. या ग्रुपच्या माध्यमाने तालुक्यात प्रत्येक गावागावात काम करणारी शेकडो युवक मंडळी कार्यरत आहे. या ग्रुपकडे असणारी एवढी युवाशक्ती सध्या परिसरात कुठल्याही सामाजिक चळवळीची नाही. यामुळे बऱ्याचदा राजकीय पुढारी हा गृप स्वार्थासाठी आपापल्या पक्षात ओढण्याचा जरी प्रयत्न करत असले तरी राजकारणाला संस्काराचे धडे हा गृप शिकवून सोडतो. नवी पिढी घडवण्याचे, पेलण्याचे आव्हान स्विकारतो. युवक एकत्र आले तर काय चमत्कार होऊ शकतो? हे या ग्रुपने दाखवून दिले.



बऱ्याचदा छटाकभर काम करून किलोभर सांगणारे, समाजसेवेचा तोरा मिरवणारे आपल्याला आजूबाजूला सापडतात. या गृपमधील अधिकारी असलेली मंडळी स्वतःला मिरवतांना कधीही दिसत नाही. उलट एखाद्या उपक्रमात, कार्यक्रमात झाडू मारायला, खुर्च्या व्यवस्थित ठेवायला देखील कचरत नाही. प्रसिद्धीपेक्षा सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी काम करणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे, ही समकालीन जाणीव प्रत्येकात निर्माण होणे गरजेचे आहे. सध्या समाजात सामाजिक कार्यकर्ते म्हणून जो तो खोट्या प्रतिष्ठेने मिरवतो, त्यात या ग्रुपची मंडळी विनयतेने विद्यार्थी म्हणून जगतात. कार्यकर्ते म्हणून कृतीयुक्त वावरतात. 



अगदी ताजा अनुभव म्हणजे समाजसेवक डॉ. गिरीधरभाऊ काळे यांचा वाढदिवस दरवर्षी रक्तदान शिबिराने साजरा केला जातो. यंदा याच स्टुडंट फोरम ग्रुपने पुढाकार घेऊन कोरपणा येथे १ जून ला स्वेच्छेने रक्तदान शिबिराचे आयोजन केले. समाजसेवक डाॅ.गिरिधरभाऊची मानवीय सेवा म्हणजे या परिसराचं भुषण. त्यांचा सुवर्णमहोत्सवी ५० व्या वाढदिवसानिमीत्त संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी त्यांनी घेतली. मात्र सगळं करत असताना पुढाकार घेणार्‍यांची निवडक नावे पुढे येऊ नये, ही खबरदारी घेतली. नावासाठी जगणाऱ्या जगात कामासाठी जगणारी, धडपड करणारी, नव्या दमाची अशी तरुण पिढी जेव्हा-जेव्हा भेटते, तेव्हा तेव्हा भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलामांचं 'व्हिजन २०-२०' स्वप्न डोळ्यापुढे येते. 'सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ता हमारा' या गाण्याचा अर्थ अशा सकारात्मक काम करणाऱ्या तरुणाईच्या कर्मातून उठून दिसतो. स्टुंडट फोरम गृपच्या समस्त कार्यकर्त्यांना सलाम. यशोमय सदिच्छा.

स्वप्न पाहू खरे होत नाही कसे ?
कोळशाचे हिरे होत नाही कसे ?
यत्न सारे जरी व्यर्थ गेले तरी
कर पुन्हा कर अरे होत नाही कसे...






-अविनाश पोईनकर

मो. ७३८५८६६०५९


==================

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

दंडकारण्यातील आदिवासी बांधवाच्या जीवनाचं खरंखुरं धगधगत वास्तव : दंडकारुण्य

- राजू गरमडे, चंद्रपूर कवीमिञ, मुक्तपञकार, सामाजिक युवा कार्यकर्ते, आदिवासी भागात जाऊन कार्य करणारे अविनाश पोईनकर एका कार्यक्रमामध्ये भेटले....